08 August 2020

News Flash

अरुंधती दर्शन न्याय

आकाश दर्शनात, एक मोठा चौकोन आणि त्याला तीन ताऱ्यांची शेपटी अशा पतंगासारख्या दिसणाऱ्या सात ठळक ताऱ्यांनी बनलेल्या सप्तर्षीची आकृती सहज ओळखता येते.

शब्दबोध डॉ. उमेश करंबेळकर

वसिष्ठ ऋषींची पत्नी अरुंधती हिला सती मानले आहे. आकाशातील सप्तर्षीच्या ताऱ्यांबरोबर अरुंधतीलाही स्थान देण्यात आले आहे. पण या अरुंधती शब्दावरून मराठीतीलएक विशेष शब्दसंग्रहही ओळखला जातो. तो म्हणजे अरुंधती दर्शन न्याय.

आकाश दर्शनात, एक मोठा चौकोन आणि त्याला तीन ताऱ्यांची शेपटी अशा पतंगासारख्या दिसणाऱ्या सात ठळक ताऱ्यांनी बनलेल्या सप्तर्षीची आकृती सहज ओळखता येते. भारतीयांनी सात ताऱ्यांना सात ऋषी मानले आहे. ऋतु, पुलह, अगस्त्य, अत्री, अंगिरा, वसिष्ठ आणि मरीची हे ते सात ऋषी. शेपटीच्या तीन ताऱ्यांमधील मधला तारा वसिष्ठाचा. वसिष्ठाकडे नजर रोखून पाहिल्यास एक छोटीशी तारका त्याच्याजवळच लुकलुकताना दिसते. त्याचे नाव वसिष्ठ पत्नी अरुंधती.  अशा तऱ्हेने अरुंधतीचा छोटा अस्पष्ट तारा शोधण्यासाठी प्रथम जवळचा वसिष्ठ हा ठळक तारा दाखवावा लागतो. यावरून अरुंधती दर्शन न्याय तयार झाला.

अरुंधती दर्शन न्याय म्हणजे प्रथम स्थूल वस्तू दाखवून त्याच्या अनुषंगाने सूक्ष्म वस्तू दाखवणे. याच अर्थाचा दुसरा शाखाचंद्रन्यायदेखील अनेकदा वापरला जातो. जसे द्वितीयेचा चंद्र दाखवताना ‘तो पाहा त्या फांदीवर आहे’ असे सांगणे म्हणजे शाखाचंद्रन्याय होय. समर्थ रामदासांनीही मनाच्या श्लोकामध्ये याचा वापर केलेला आहे.

आता अरुंधती दर्शन न्यायाचे व्यवहारातील उदाहरण बघू. पक्षीनिरीक्षण करताना बरोबरच्या नवख्या पक्षीनिरीक्षकाला फुलटोचा, शिंजीर, सुभग, टिट यांसारखा छोटा पक्षी किंवा रंगगोपनामुळे चटकन दिसू न शकणारा पक्षी दाखवण्यासाठी प्रथम तो पक्षी ज्या झाडावर बसलाय ते झाड दाखवून नंतर त्या झाडाच्या ज्या फांदीवर पक्षी बसला ती फांदी दाखवली जाते आणि असे करत करत त्या पक्ष्यापर्यंत नवख्या पक्षीनिरीक्षकाची नजर पोहोचेल, असे पाहिले जाते. हाच तो अरुंधती दर्शन न्याय. परंतु हल्ली आपल्यातील अनेकांचा मूळ सुलभ मराठीचाच वापर इतका कमी झाला आहे की, अरुंधती दर्शन न्यायासारख्या गोष्टी ओळखणे, अधिकच अवघड. तरीही नवे काही समजणे हे कोणत्याही भाषाप्रेमीसाठी आवडीचेच. म्हणूनच हा अरुंधती दर्शन न्याय समजून देण्याची धडपड.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2019 4:37 am

Web Title: arundhati darshan justice akp 94
Next Stories
1 भारत आणि जग
2 भारत आणि शेजारील देश
3 कोरियातील अभिनव विद्यापीठ
Just Now!
X