19 January 2020

News Flash

एमपीएससी मंत्र : सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा

या लेखामध्ये नागरिकशास्त्र, सामान्य विज्ञान आणि भूगोल या घटकांच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

फारुक नाईकवाडे

सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षेतील सामान्य अध्ययन घटकातील सामाजिक आणि आर्थिक सुधारणा आणि इतिहास या घटकांवर मागील लेखामध्ये चर्चा करण्यात आली. या लेखामध्ये नागरिकशास्त्र, सामान्य विज्ञान आणि भूगोल या घटकांच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे.

नागरिकशास्त्र

*    राज्यघटनेच्या निर्मितीची प्रक्रिया, तिच्यावरील वेगवेगळ्या विचारसरणींचा व कायदे तसेच राज्यघटनांचा प्रभाव यांचा आढावा घ्यायला हवा. घटनेच्या सरनाम्यातील तत्त्वज्ञान, हेतू समजावून घ्यावे.

*    घटनेतील सगळ्या कलमांचा अभ्यास आवश्यक नाही. मूलभूत हक्क, राज्याची नीतीनिर्देशक तत्त्वे, मूलभूत कर्तव्ये या बाबतची कलमे बारकाईने अभ्यासावीत. प्रशासकीय, आíथक, न्यायिक आणि इतर बाबतीत केंद्र शासन व राज्य शासन यांच्यामध्ये अधिकारांची विभागणी कशा प्रकारे झाली आहे, त्याबाबतची कलमे नीट समजून घ्यायला हवी. याबाबत घटनेच्या सातव्या अनुसूचीचा संदर्भ घ्यावा.

*    केंद्र आणि राज्य शासनाचे अधिकार, काय्रे, कायदा निर्मितीची प्रक्रिया, विधेयके, त्यांचे प्रकार या बाबीही महत्त्वाच्या आहेत.

*     उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांविषयीची महत्त्वाची कलमे, न्यायाधीशांच्या नेमणुका, पदावरून दूर करणे, अधिकार, कार्यपद्धती इत्यादी बाबींचा आढावा घ्यावा.

*    घटनात्मक पदे अभ्यासताना संबंधित कलम, काय्रे, अधिकार, नेमणुकीची पद्धत, पदावरून काढण्याची पद्धत, सध्या त्या पदावरील व्यक्तीचे नाव हे मुद्दे पाहावेत.

*    स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत ७३वी आणि ७४वी घटनादुरुस्ती यांमधील महत्त्वाच्या तरतुदी समजून घ्याव्यात. विशेषत: घटकराज्यांना दिलेले अधिकार तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांची रचना, काय्रे, जबाबदाऱ्या, अधिकार, उत्पन्नाची साधने, राज्य निवडणूक आयोग आणि राज्य वित्त आयोग या बाबी लक्षात घ्याव्या. याबाबत स्थापन करण्यात आलेल्या महत्त्वाच्या समित्या, त्यांच्या ठळक शिफारशी यांचा आढावा घेणे आवश्यक आहे. नागरी स्थानिक शासनातील महानगरपालिका, नगर परिषद आणि कटक मंडळे यांचे स्वरूप, रचना, काय्रे, अधिकार व जबाबदाऱ्या या अनुषंगाने अभ्यास करावा. नागरी स्थानिक शासन प्रकारासाठीचे निकष समजून घ्यायला हवेत.

सामान्य विज्ञान

*      रसायनशास्त्राचा अभ्यास करताना पुढील मुद्दय़ांवर भर देणे आवश्यक आहे.

द्रव्य, त्यांचे स्वरूप आणि त्यांच्या अवस्था, मूलद्रव्ये आणि त्यांची वैशिष्टय़े, अणूंची संरचना व त्याविषयी विविधशास्त्रज्ञांनी मांडलेले सिद्धांत, अणूंची मांडणी करण्यासाठी बनविलेली आवर्तसारणी आणि तिच्यामध्ये होत गेलेले बदल, आधुनिक आवर्तसारणी व तिची ठळक वैशिष्टय़े, काही महत्त्वाच्या मूलद्रव्यांच्या संज्ञा, धातू, अधातू, धातू सदृश धातुके, संयुग व त्यांची निर्मिती, आम्ल, आम्लारी व क्षार तसेच त्यांच्यामधील प्राथमिक अभिक्रिया, कार्बनी व अकार्बनी संयुगे, मिश्रण व त्यांची निर्मिती.

*    बल, दाब, कार्य, ऊर्जा, शक्ती, उष्णता, तापमान, पदार्थाचे अवस्थांतर, मापन पद्धती (राशी व एकके) हे लहान घटक वस्तुनिष्ठ अभ्यासाठी सोपे ठरतात. या घटकांची टिपणे ढोबळ मुद्दय़ांच्या स्वरूपात पुरेशा ठरतात. त्यामुळे सर्व मिळून एक ते दोन पानांमध्ये मावतील इतकी टिपणे काढली तरी चांगली तयारी होते.

*    प्रकाश, ध्वनी, भिंग, धाराविद्युत, चुंबकत्व, गती व गतिविषयक समीकरणे हे मोठे व महत्त्वाचे घटक आहेत. यांवर थिअरी, समीकरणे आणि उपयोजित अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे या मुद्दय़ांच्या तयारीसाठी संज्ञा आणि संकल्पनांचे आकलन अत्यंत महत्त्वाचे आहे.

*    प्राणी व वनस्पतींच्या वर्गीकरणाच्या पद्धती व संबंधित शास्त्रज्ञ, विविध संच व विभाग व त्यातील प्राणी/वनस्पती व त्यांची वैशिष्टय़े हा अभ्यास कोष्टक मांडून वस्तुनिष्ठ पद्धतीने करावा.

*    मानवी अवयव संस्थांमधील अवयव, त्याची रचना, कार्ये अशा मुद्दय़ांचा नेमका अभ्यास करावा.

*    जिवाणुजन्य, विषाणुजन्य, कवकजन्य, आदिजीवजन्य, संसर्गजन्य, असंसर्गजन्य, लैंगिकदृष्टय़ा पारेषित होणारे, आनुवंशिक आजार समजून घ्यावेत. या रोगांचा त्यांची लक्षणे, कारणीभूत घटक, प्रसार, बाधित होणारे अवयव, उपचारपद्धती अशा मुद्दय़ांच्या अनुषंगाने अभ्यास करावा. यासाठीही कोष्टक तयार करता येईल.

*    कबरेदके, प्रथिने, मेद ही तीन स्थूल पोषणद्रव्ये आणि जीवनसत्त्वे, खनिजे व क्षार ही सूक्ष्म पोषणद्रव्ये – या पोषणद्रव्यांपासून मिळणारी ऊर्जा, त्यांचे महत्त्वाचे घटक, कमतरता व आधिक्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या इ. मुद्दय़ांच्या आधारे अभ्यास करावा.

भूगोल

*    अभ्यासक्रमामध्ये महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह भारताचा सामान्य भूगोल असा उल्लेख असला तरी सन २०१७मध्ये बहुतांश प्रश्न हे महाराष्ट्राच्या भूगोलावर आधारित होते. मात्र तरीही भूगोल घटकाचा अभ्यास हा संपूर्ण भारतातील प्राकृतिक भूगोल आणि महाराष्ट्राचा आर्थिक, सामाजिक भूगोल अशा मुद्दय़ाांच्या आधारे करणे व्यवहार्य ठरते.

*    भूगोलातील वातावरण, हवामानाचे घटक, मान्सूनची, वाऱ्यांची निर्मिती, भूरूप निर्मिती, भूकंप, वादळांची निर्मिती, प्रमाण वेळ अशा पायाभूत संकल्पनांचा अभ्यास आवश्यक आहे.

*    भारतातील हवामान, हवामान विभाग, पर्जन्य, पठारे, पर्वतरांगा, नद्यांची खोरी-त्यांचा आकार, विकसित बंदरे, व्यापारी बंदरे, लोकसंख्या वितरण या उपघटकांचा अभ्यास करावा. यातील हवामान, हवामान विभाग, मान्सून, मृदा समस्या यांचा संकल्पनात्मक अभ्यास आणि इतर मुद्दय़ांचा कोष्टकामध्ये टिपणे काढून अद्ययावत अभ्यास करणे आवश्यक आहे. या घटकाच्या तयारीसाठी सर्वाधिक अधिकृत स्रोत आहे, इंडिया इयर बुक मधील संबंधित प्रकरणे.

*    महाराष्ट्रातील मृदा, हवामान, पर्जन्य व हवामान विभाग, पर्वतरांगा, नद्या, खाडय़ा, बंदरे, राष्ट्रीय महामार्ग आणि त्यांच्या काठावर वसलेली शहरे, इतर महत्त्वाची शहरे – त्यांची टोपण नावे, धबधबे, पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे, खनिज संपत्तीचे वितरण, पिके, शेती, उद्योग, वाहतूक, संदेशवहन आणि लोकसंख्या वितरण (घनता, साक्षरता, लिंगगुणोत्तर, रोजगार, ग्रामीण – नागरी वितरण) या बाबींचा अभ्यास आवश्यक आहे.

पुढील लेखामध्ये बुद्धिमापन चाचणी घटकाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येईल.

First Published on November 8, 2019 12:00 am

Web Title: assistant motor vehicle inspector pre examination abn 97
Next Stories
1 आर्थिक विकास अनुदाने आणि संबंधित मुद्दे
2 सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा
3 आर्थिक विकास गरिबी आणि बेरोजगारी
Just Now!
X