विद्यापीठ विश्व : प्रथमेश आडविलकर

विद्यापीठाची ओळख – ऑस्ट्रेलियामधील ‘युनिव्हर्सटिी ऑफ न्यू साउथ वेल्स’ (यूएनएसडब्लू) हे त्या देशातील तिसऱ्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे. सिडनेमधील केनसिंग्टन या उपनगरी भागामध्ये स्थित असलेले हे जागतिक दर्जाचे विद्यापीठ क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सटिी रँकिंगनुसार जगातले पंचेचाळीसव्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे. १९४९ साली या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. यूएनएसडब्लू विद्यापीठ हे शासकीय संशोधन विद्यापीठ आहे.

यूएनएसडब्लूच्या शिक्षणात संशोधनाचा होत असलेला वापर, विद्यापीठाने औद्योगिक क्षेत्राशी विणलेले उत्कृष्ट जाळे आणि विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीय स्वरूप यांमुळे विद्यापीठामधील पदवी आणि पदव्युत्तर या दोन्ही स्तरांवरील अभ्यासक्रमांचे अध्यापन त्यांच्या उच्च गुणवत्तेसाठी ओळखले जाते. यूएनएसडब्लू विद्यापीठ एकूण अडतीस हेक्टरच्या कॅम्पसमध्ये पसरलेले आहे. यूएनएसडब्लूचा केनसिंग्टनमधील मुख्य कॅम्पस हा अप्पर कॅम्पस आणि लोअर कॅम्पस अशा दोन भौगोलिक परिसरांमध्ये विभागाला गेला आहे. यूएनएसडब्लूमध्ये साठ हजारांहून अधिक पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण पूर्ण करत आहेत.

अभ्यासक्रम – यूएनएसडब्लू विद्यापीठातील पूर्ण वेळ पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचे असून पदव्युत्तर अभ्यासक्रम वेगवेगळ्या कालावधीचे आहेत. विद्यापीठामध्ये एकूण नऊ प्रमुख विभाग (फॅकल्टी अ‍ॅण्ड स्कूल्स) कार्यरत आहेत. सर्व पदवी, पदव्युत्तर आणि डॉक्टरल अभ्यासक्रम या नऊ विभागांच्या माध्यमातून चालतात. यामध्ये आर्ट्स अ‍ॅण्ड सोशल सायन्सेस, आर्ट्स अ‍ॅण्ड डिझाइन, बिल्ट एन्व्हायर्नमेंट, सायन्सेस, लॉ, इंजिनीअरिंग, बिझनेस, मेडिसिन आणि एडीएफए (ऑस्ट्रेलियन डिफेन्स फोर्स अ‍ॅकॅडमी) या नऊ प्रमुख स्कूल्सचा समावेश आहे. यांमधील बहुतांश विभाग विविध राष्ट्रीय संशोधन केंद्र वा संस्थांना संलग्न आहेत. विद्यापीठातील बहुतांश विद्यार्थी आर्ट्स, सायन्सेस आणि अभियांत्रिकी या शाखांमधील विषयांना प्राध्यान्य देतात. विद्यापीठातील सर्व विभागांच्या अंतर्गत एकूण शंभराहून अधिक पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी अभ्यासक्रम चालतात. विद्यापीठातील ऑफलाइन अभ्यासक्रम हे फॉल आणि िस्प्रग या दोन सत्रांमध्ये चालतात तर ऑनलाइन अभ्यासक्रम वर्षभर उपलब्ध असतात. यूएनएसडब्लू हा ‘ग्रुप ऑफ एट’ या ऑस्ट्रेलियन विद्यापीठांच्या संघटनेची संस्थापक सदस्य आहे.

विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी त्या-त्या पदवी वा पदव्युत्तर स्तरासाठी आवश्यक असलेली प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे विद्यार्थ्यांसाठी गरजेचे आहे.

सुविधा – यूएनएसडब्लू विद्यापीठ आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी पाठय़वृत्ती, शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्कामध्ये सवलत, शॉर्ट टर्म लोन, लिमिटेड बर्सरी असिस्टन्स, कॅम्पस जॉब्ज, वर्क-स्टडी प्रोग्राम इत्यादी माध्यमांतून आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. या सर्व आर्थिक सोयीसुविधा विद्यापीठाने पात्रतेच्या निकषांनुसार दिलेल्या आहेत. विद्यापीठातील पदवी वा पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांपकी बहुतांश विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून शिष्यवृत्ती दिली जाते. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या परिसरात निवासाच्या सोयींसाठी भरपूर पर्याय देण्यात आले आहेत. यूएनएसडब्लूच्या कॅम्पसमध्येच सुपरमार्केटपासून ते फार्मसीपर्यंत सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना स्टुडंट सोसायटीज, विविध क्लब्स, स्कूल असोसिएशन्स, डिपार्टमेंटल ग्रुप्स, मिडिया, अ‍ॅडव्होकेसी, इंटर्नशिप यांसारख्या शिक्षणेतर सुविधाही उपलब्ध आहेत.

वैशिष्टय़

यूएनएसडब्लूच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये ऑस्ट्रेलियासह जगभरातील अनेक ख्यातनाम शास्त्रज्ञ, राजकारणी, उद्योजक, क्रीडापटू इत्यादींचा समावेश आहे. सध्याचे पंतप्रधान मॉरिसन, क्रिकेटपटू मार्क टेलर इत्यादी प्रसिद्ध चेहरे या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी होत. ऑस्ट्रेलियन रिसर्च कौन्सिलच्या २०१७च्या अहवालानुसार, देशातील सर्व विद्यापीठांमध्ये शासनाकडून यूएनएसडब्लूला सर्वाधिक संशोधन निधी देण्यात आलेला आहे.

 

ऑस्ट्रेलियामध्ये अभियांत्रिकी शाखांमधील नानाविध अभ्यासक्रम करायचे असतील तर यूएनएसडब्ल्यू हे माझ्या मते सवरेत्कृष्ट विद्यापीठ आहे. अभियांत्रिकीमधील अभ्यासक्रम हे ‘कोर्सवर्क’ तसेच ‘रिसर्च’ म्हणजे संशोधन अभ्यासक्रम आहेत. यांतील संशोधन अभ्यासक्रम हे अतिशय स्पर्धात्मक आहेत. संशोधन अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शक संशोधकास अपेक्षित संशोधनाचा दर्जा राखण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागेल. मात्र, फक्त संशोधन अभ्यासक्रमच नव्हे तर कोर्सवर्क अभ्यासक्रमामधील दररोजचे वर्गदेखील तेवढेच आव्हानात्मक आहेत. परीक्षेतील प्रश्न विश्लेषणात्मक स्वरूपाचे असतात. एकंदरीत संपूर्ण पदवी कालावधीदरम्यान विद्यार्थ्यांना अत्यंत काटेकोरपणे आणि नियोजन करून अभ्यास करावा लागतो. मात्र या सगळ्या गोष्टींचा फायदा पदवी मिळताना होतोच. विद्यापीठ आणि औद्योगिक क्षेत्राच्या सहकार्याने होणाऱ्या नोकरीच्या संधींमध्ये मात्र या पदवीचा नक्कीच विशेष लाभ होतो.

– देबरून सेनगुप्ता, माजी विद्यार्थी, एमएस- इलेक्ट्रिकल इंजिनीअिरग, यूएनएसडब्लू, ऑस्ट्रेलिया.

संकेतस्थळ:https://www.unsw.edu.au/

itsprathamesh@gmail.com