13 December 2019

News Flash

करिअरमंत्र

बायोटेकच्या जोडीला केमिस्ट्री व बॉटनी हे विषयसुद्धा अभ्यासात आहेत. त्यासंदर्भात हा चौकसपणा खूप उपयोगी राहील.

संग्रहित छायाचित्र

डॉ. श्रीराम गीत

  • सर, मी बायोटेकची पहिल्या वर्षांची विद्यार्थिनी आहे. पदवीनंतर मला खासगी/ सरकारी क्षेत्रात कोणत्या नोकऱ्या उपलब्ध असतील?

साक्षी सूरकर

साक्षी, कृपया अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित कर. सातत्याने डिस्टिंक्शन मिळवले तरच तुला पदवीनंतर लग्गेच नोकरी हा प्रकार हाती लागायची थोडीफार शक्यता आहे. बायोटेक हा विषय खरे तर संशोधनाची सुरुवात म्हणून सुरू होतो. तो खूप लांबचा रस्ता असतो. मात्र हुशार व जागरूक पदवीधरांना काही संशोधन प्रकल्पांवर मदतनीस म्हणून काम मिळू शकते. सरकारी क्षेत्रात सामान्य किंवा शास्त्र पदवीधर यापलीकडे फारशा वेगळ्या संधी नाहीत. शास्त्र शाखेत पदवी घेणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्यांने अभ्यासाचा उपयोग, वापर, संदर्भ कुठे कुठे आहे याची जागरूकपणे चौकसपणे सतत चाचपणी करणे अत्यंत महत्त्वाचे असते. बायोटेकच्या जोडीला केमिस्ट्री व बॉटनी हे विषयसुद्धा अभ्यासात आहेत. त्यासंदर्भात हा चौकसपणा खूप उपयोगी राहील.

 

मी अर्थशास्त्र विषय घेऊन ५० टक्के मार्कानी बी.ए. झालो. मात्र अर्थशास्त्र विषयात ५० पैकी ३३ मार्क मिळाले आहेत. मी पुढे काय करू शकतो? – दीपक गवई आपले शिक्षण, पदवी कोणत्या माध्यमातून झाले आहे? त्याचा उल्लेख नसल्याने उत्तरावर मर्यादा आहेत. कॉम्प्युटरवरची किमान कामे, म्हणजे इंग्रजी, मराठीमध्ये उत्तम शिकण्याला प्राधान्य द्या. टेलिबँकिंगच्या सर्व पद्धती नीट माहिती करून घ्या. त्याच वेळी इन्शुरन्स, पर्यटन व आदरातिथ्य या तीन क्षेत्रांविषयी त्यात काम करणाऱ्या व्यक्तीकडून सखोल माहिती घ्या. यथावकाश या तीनपैकी एकामध्ये उमेदवारी करत किंवा कोर्स करून तुमचा शिरकाव नक्की होऊ शकतो. तीनही क्षेत्रांत प्रचंड वाव आहे, मुख्य म्हणजे मार्क वा टक्केवारी यापेक्षा कष्ट, सचोटी व उत्तमता यांना जास्त महत्त्व दिले जाते. याशिवाय विविध बँकांच्या परीक्षा देणे हा एक रस्ता आहे. मात्र त्यातून निवडीची शक्यता फार तर २ ते ५ टक्के एवढीच राहिली आहे. नीट विचारांती निर्णय घ्यावा.आपले प्रश्न पाठवताना वाचकांनी सोबत आपली शैक्षणिक पात्रता, परीक्षेतील गुण याविषयी आवश्यक माहिती जरूर पाठवावी. त्यामुळे अधिक नेमके उत्तर देण्यास मदत होईल.  career.mantra@expressindia.com 

First Published on August 14, 2019 5:16 am

Web Title: bayotek economics mpg94
Just Now!
X