आपण देशा-परदेशात पर्यटनाला जातो त्यावेळी तिथे पर्यटनस्थळांची यादीच असते. त्यात एखाद्यातरी संग्रहालयाचा उल्लेख असतो. पण अनेकजण तिथे जाणे टाळतात. कलासंग्रहालय तर दूरच राहिले मग. कारण बहुतांश भारतीय पर्यटकांना त्यात रस नाही. पाश्चिमात्य विश्वात मात्र असे नाही. तिथे संग्रहालयांची संस्कृती आहे. चांगली परंपरा आहे. तिथे अनेक लहान गावांत, शहरांत स्थानिक विषयांना, कलेला वाहिलेले संग्रहालय असते. मग मोठय़ा शहरातील संग्रहालये अगदीच वेगळी असतात. काही खासगी तर काही सार्वजनिक असतात. या संग्रहालयांची, त्यातील संग्रहाची, त्याच्या एकमेकांशी असलेल्या संदर्भाची साखळी तयार होते. स्थानिक माहितीसाठी तसेच देशाच्या इतिहासाच्या माहितीसाठी संग्रहालय पाहणे महत्त्वाचे ठरते.

अ‍ॅमस्टरडॅममध्ये रक्स म्युझिअम आहे. हे डच नॅशनल म्युझिअम आहे. त्यात सुमारे १० लाख वस्तू आहेत. येथे रेम्ब्रां या प्रसिद्ध चित्रकाराचे ‘नाइट वॉच’ हे चित्रसुद्धा आहे. जेव्हा या संग्रहालयाची पुनर्रचना करण्यात आली तेव्हा हे चित्र दुसऱ्या भागात हलवलं होतं. ते जेव्हा त्याच्यासाठी बांधलेल्या खास दालनात नेले, तेव्हा लोकांनी दोहोबाजूंना उभे राहून एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे त्या चित्राचे स्वागत केले. कारण तेथील व्यक्तींच्या भावना त्या संग्रहालयाशी, चित्राशी जोडल्या गेल्या होत्या. आपल्याकडील अनास्थेच्या धर्तीवर हे चित्र अगदीच अनोळखी.

आपल्याकडेसुद्धा अनेक चांगली संग्रहालये आहेत. त्यातील काही खासगी संग्रहालयातून तयार झाली आहेत. उदा. पुण्याचे दिनकर केळकर संग्रहालय, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (जे आधी प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम म्हणून ओळखले जायचे) तसेच भाऊ  दाजी लाड संग्रहालय (जिजामाता उद्यानाच्या परिसरातील) रिझव्‍‌र्ह बँकेचे मॉनेटरी म्युझियम, मणी भवन, पिरामल म्युझियम ऑफ आर्ट, बेस्ट म्युझियम, नेहरू सायन्स सेन्टर अशी अनेक उत्तम संग्रहालये आहेत.

संग्रहालयाचे ५५ प्रकार नोंदवले गेलेले आहेत. त्यात संग्रहित असलेल्या आणि प्रदर्शित केलेल्या वस्तूंचे मूल्य हे त्या विषयाच्या अभ्यासावर ठरते. संग्रहालयात कलात्मक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि वैज्ञानिकदृष्टय़ा महत्त्वाच्या ठरलेल्या वस्तू जतनतज्ज्ञ आणि लोकशिक्षण आणि अभ्यासासाठी मांडल्या जातात. ही मांडणी प्रदर्शनाच्या रूपाने होते जी कायमची किंवा काही काळापुरती असते. ही मांडणी कोण करते? तर ती क्युरेटर करतो. क्युरेटर ही व्यक्ती संग्रहालयातील वस्तूंचा अभ्यास करते. त्याचा इतिहास, ती संग्रहालयात कशी पोहोचली, ती एका विशिष्ट प्रदेश, देश, आदींच्या कोणत्या कालखंडातील इतिहासाचा भाग आहे, कोणत्या माध्यमात बनली आहे, चित्र वगैरे असेल तर तिला नाव, विषय आहे का, तिचा अर्थ आहे का, कोणी बनवली आहे, याचा शोध घेऊन त्याची नोंद करणे. त्यासाठी समर्पक भाषा वापरणे हे त्याला करावे लागते. वस्तूकडे अनेक संदर्भानी पाहता येते. तसे पाहणे गरजेचेही असते. त्यामुळे तिच्या मागील संदर्भाचे जाळे उलगडून मानवी जीवनाचे पदर दिसू शकतात. उदा. एखादे भांडे असेल तर ते कशाने बनले आहे, उंची, रुंदी किती, यावरून ते कोणत्या युगातील आहे, कोणत्या प्रदेशात मिळाले, सामान्य वापराचे आहे की खास वापराचे, समाजातला कोणता घटक ते वापरे, त्यावरील अलंकरण काय, त्यावरून देशाच्या नैसर्गिक पर्यावरणाबद्दल काही माहिती मिळते का, तशाच प्रकारचे भांडे इतर कोणत्या देशात सापडले का, त्यावरून त्या दोन प्रदेशांचा संपर्क होता का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. यातून कधी कधी संग्रहालयातील अनेक वस्तूंचा परस्परसंबंध असल्याचे लक्षात येते. त्यातून त्या एखाद्या विशिष्ट विषयाच्या प्रदर्शनाची कल्पना तयार होऊ शकते. त्या प्रदर्शनाची मांडणी, संकल्पना स्पष्ट करणे, ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे या सगळ्या गोष्टींवर विचार होतो. अगदी त्या दालनातील प्रकाशयोजना, रंगसंगती, जमीन कशी असावी, कार्पेट असायला हवे का अशा अनेक मुद्दय़ांवर चर्चा होते. प्रेक्षक कशा पद्धतीने प्रदर्शन पाहणार, त्यांना कशा प्रकारे माहिती पुरवावी, त्यासाठी लिखित माहिती वापरावी की, व्हिडीओ अशा गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्याआधारे प्रदर्शनाची सुरक्षाही निश्चित करता येते. वस्तू तिथे कशा प्रकारे जतन करून ठेवावी, तिचे संवर्धन कसे करावे (ज्याबद्दल मागील लेखात माहिती घेतलेली आहे.) त्यासाठी ते साठवून ठेवणारी व्यवस्था काय असावी, तापमान काय असावे, वस्तू ठेवण्याची कपाटे कशा प्रकारची असावी या गोष्टींना खूप महत्त्वाचे आहे. हे सगळे संग्रह लोकशिक्षणासाठी मांडणे, त्यातून अनेक वस्तूंचा अनुभव कशा प्रकारे देता येईल, याची योजना करणे असेही विषय असतात.

वर दिलेल्या याच सगळ्या गोष्टींचा आणि विषयांचा अभ्यास म्युझिओलॉजी अर्थात संग्रहालय शास्त्रामध्ये केला जातो. अर्थातच हा अभ्यास कलाशिक्षणाशी अत्यंत जवळचा आहे. तुम्हाला कलेसोबतच इतिहास, संशोधन यांची आवड असेल तर हा करिअरचा उत्तम मार्ग आहे. पदवी घेतल्यानंतर या विषयात पदव्युत्तर पदवी आणि पदविका दोन्ही घेता येतात. हे शिक्षण देणाऱ्या काही महत्त्वाच्या संस्था पुढीलप्रमाणे – नॅशनल म्युझियम दिल्ली, महाराजा सयाजी राव युनिव्हर्सिटी बडोदा, कोलकाता युनिव्हर्सिटी, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय.

– महेंद्र दामले