News Flash

ग्रासरूट इनोव्हेटर

गाठीशी पुरेसे शिक्षण नसतानाही कर्नाटकातील एका लहानशा खेडय़ातल्या गिरीश बद्रागोंड या युवकाने आपल्या प्रयोगशीलतेतून ‘बर्ड रीपेलर’ म्हणजे पक्ष्यांना हुसकावून लावणारं यंत्र, भूमिगत विहिरींची तपासणी करणारं

| August 4, 2014 01:10 am

गाठीशी पुरेसे शिक्षण नसतानाही कर्नाटकातील एका लहानशा खेडय़ातल्या गिरीश बद्रागोंड या युवकाने आपल्या प्रयोगशीलतेतून ‘बर्ड रीपेलर’ म्हणजे पक्ष्यांना हुसकावून लावणारं यंत्र, भूमिगत विहिरींची तपासणी करणारं ‘बोअरवेल स्कॅनर’, शेतीसाठी आणि बाग-बगीच्यांसाठी स्वयंचलित जलसिंचन यंत्र अशा अनेक उपयुक्त यंत्रांची निर्मिती केली आहे. त्याबद्दल..

कर्नाटकातल्या बिजापूर जिल्ह्य़ातल्या सिंदगी या तालुक्यातल्या कोरवार नावाच्या लहानशा खेडय़ातून गिरीश बद्रागोंड नावाचा २८ वर्षांचा युवक २००६ साली बंगळूरू या मेट्रो सिटीमध्ये आला. जेव्हा तो या शहरात आला तेव्हा त्याच्याजवळ एक लॅपटॉप, वायरलेस राऊटर आणि एकवेळच्या बसभाडय़ाइतके पसे इतकी तुटपुंजी साधनसामग्री होती. अर्थात नावीन्याचा शोध घेण्याची वृत्ती आणि मोठी स्वप्नं हे त्याचं खरं भांडवल होतं आणि त्याच्याच जोरावर त्याने बंगळुरूमध्ये ‘सँटेप सिस्टीम्स’ ही शेती व्यवसायाला उपयुक्त ठरणाऱ्या वेगवेगळ्या उपकरणांची निर्मिती करणारी प्रगतिशील कंपनी सुरू केली आहे. विशेष म्हणजे त्याच्या ऑफिसमध्ये प्रवेश केला की आपोआप दिवे सुरू होतात आणि ऑफिसमधून बाहेर पडताच आपोआप बंदही होतात. ऑफिसमध्ये बसवण्यात आलेल्या सेन्सर्समुळे हे कसं शक्य झालं आहे आणि त्यामुळे तब्बल ६० टक्के विजेची बचत होते, हे सांगताना गिरीशचे डोळे लकाकतात.
गिरीश बद्रागोंड या युवकाची ही वाटचाल त्याने विकसित केलेल्या वेगवेगळ्या यंत्रांप्रमाणेच आगळीवेगळी आहे. गिरीशला लहानपणापासूनच यंत्रांची आवड. वेगवेगळी यंत्रे कशी चालतात, हा त्याच्या कुतूहलाचा विषय. त्याच्या घरी एक घडय़ाळ होतं. दर तासाला या घडय़ाळातून आवाज यायचा. बरोब्बर एक तास झाला की या घडय़ाळातून आवाज कसा काय येतो, असा प्रश्न त्याला पडला. आपला हा प्रश्न त्याने आई-वडिलांना विचारला. पण ते या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर गिरीशला देऊ शकले नाहीत. पण गिरीशच्या डोक्यातून प्रश्न काही जाईना. एक दिवस घरात कोणीही नसताना गिरीशने भिंतीवरचं घडय़ाळ खाली उतरवलं आणि बरोब्बर एक तास झाला की आवाज येण्यासाठी घडय़ाळात काय केलंय हे पाहण्यासाठी त्याने चक्क घडय़ाळाचे एकूणएक भाग सुटे केले. त्या वेळी त्याचं वय होतं आठ वर्षांचं. गिरीश म्हणतो, समस्येचं उत्तर शोधण्यासाठी केलेलं हे त्याचं आयुष्यातलं पाहिलं शोधकार्य!
घरच्या परिस्थितीमुळे शालेय शिक्षण पूर्ण होताच गिरीशला शिक्षणाला रामराम ठोकावा लागला. त्यानंतर त्याने घराजवळच एक लहानशी प्रयोगशाळावजा कंपनी थाटली. या प्रयोगशाळेत तो अनेकविध उपकरणं तयार करत असे. वयाने आणि शिक्षणाने लहान असूनही गिरीश इंजिनीअिरगच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रकल्प कार्यात मदत करत असे. या विद्यार्थ्यांना लागणारी उपकरणं तयार करून देत असे. पण, कोरवारसारख्या गावात एवढय़ावर उपजीविका करणं कठीण होतं. शिवाय मनाशी बाळगलेली स्वप्नं या गावात राहून पूर्ण होणार नाहीत, हा विचार करून गिरीशने बंगळुरू गाठण्याचा निर्णय घेतला.
एवढय़ा मोठय़ा शहरात आल्यावर करायचं काय, खायचं काय आणि राहायचं कुठे असे अनेक ज्वलंत प्रश्न समोर होते. पण जिथे इच्छा आहे, तिथे मार्ग हा सापडतोच. बंगळुरूमध्ये पहिले तीन दिवस गिरीश त्याच्या मित्राच्या खोलीवर राहिला. या तीन दिवसांत त्याने भाडय़ाची एक खोली मिळवली. त्या लहानशा खोलीत त्याच्याबरोबर आणखी तिघेजण राहात होते. एकटय़ाला खोलीचं भाडं परवडणारं नसल्याने दुसरा पर्याय नव्हता. राहण्याचा प्रश्न सुटला. आता उपजीविकेचा प्रश्न सोडवायचा होता.
गिरीशने मग त्याच्या मित्राकडून पाचशे रुपये उसने घेतले आणि त्याचं ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन घेतलं. आपल्या जवळ असलेल्या वायरलेस राऊटरच्या साहाय्याने ते आजूबाजूला राहणाऱ्या चार लोकांबरोबर शेअर केलं. हे चार जण दरमहिना पाचशे रुपये गिरीशला देत. असं साधारण सहा महिने चाललं. दरम्यानच्या काळात गिरीशचं नोकरी शोधणं सुरू होतं. त्याच्या प्रयत्नांना यश आलं आणि एका इलेक्ट्रॉनिक कंपनीत त्याला नोकरी मिळाली.
नोकरी करत असतानाच गिरीशचं संशोधनही स्वतंत्रपणे सुरू होतं. दोन र्वष नोकरी केल्यानंतर एम. एस. राजशेखर याच्या बरोबर भागीदारीमध्ये गिरीशने ‘सँटेप सिस्टीम्स’ही स्वत:ची कंपनी सुरू केली. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि ऊर्जा व इतर संसाधनांची बचत करणारी उपकरणं तयार करणं, हे कंपनीचं उद्दिष्ट होतं. या कंपनीच्या माध्यमातून गिरीशने ‘बर्ड रीपेलर’ म्हणजे पक्ष्यांना हुसकावून लावणारं यंत्र, भूमिगत विहिरींची तपासणी करणारं ‘बोअरवेल स्कॅनर’, शेतीसाठी आणि बाग-बगीच्यांसाठी स्वयंचलित जलसिंचन यंत्र अशा अनेक उपयुक्त यंत्रांची निर्मिती केली आहे.
‘बर्ड रीपेलर’ म्हणजे पक्ष्यांना हुसकावून लावणारं यंत्र शेतकऱ्यांना अत्यंत उपयुक्त ठरलं आहे. या यंत्रात पक्ष्यांना घाबरवणारे आणि ते ज्या मोठय़ा पक्ष्यांचे किंवा प्राण्यांचे भक्ष्य आहेत अशा प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे आवाज रेकॉर्ड केलेले आहेत. हे आवाज ऐकून पक्षी घाबरतात आणि शेतापासून दूर जातात. साहजिकच पिकाचं नुकसान टाळलं जातं. पाच ते सहा एकर शेतासाठी पुरेसं असणाऱ्या या यंत्राची किंमत सुमारे ३० हजार रुपये आहे.
अनेक दिवस घर बंद करून बाहेरगावी जाताना अनेकांना चिंता असते ती हौसेने फुलवलेल्या आपल्या बागेची. या बागेतल्या झाडांना पाणी कोण घालणार, असा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. या समस्येवरही गिरीशने एक उपाय शोधला आहे. आपल्या गरहजेरीत झाडांना आवश्यक तेवढय़ा पाण्याचा पुरवठा आपोआप करेल, असं एक इलेक्ट्रॉनिक उपकरण त्याने निर्माण केलं आहे. विशेष म्हणजे या उपकरणाची किंमत फक्त पाच हजार रुपये असल्यामुळे ते सर्वाना परवडू शकतं.
अशाच प्रकारचं पण अत्याधुनिक यंत्र गिरीशने शेतकऱ्यांसाठीसुद्धा तयार केलं आहे. या स्वयंचलित यंत्रामध्ये पीक, जमिनीची गुणवत्ता, तापमान, आद्र्रता इत्यादी घटकांची नोंद होते आणि आवश्यक तेवढे पाणी योग्य वेळेला पिकांना दिलं जातं. सुमारे दीड लाख रुपये किमतीच्या या यंत्रामुळे शेतकऱ्याचा वेळ, पाणी आणि वीज यांची मोठय़ा प्रमाणावर बचत होते. हे एक यंत्र दहा एकर जमिनीवरील जलसिंचन लीलया नियंत्रित करतं.
ही सगळी उपकरणं तयार करण्यासाठी ‘नाबार्ड’ आणि ‘नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन’ या संस्थांनी मदत केल्याचं गिरीश आवर्जून सांगतो. या उपकरणांचं एकस्व घेण्याच्या दृष्टीनेही त्याचे प्रयत्न सुरू आहेत.
गिरीश बद्रागोंड खेडय़ातून शहरात आला. या घटनेला आता आठ र्वष लोटली आहेत. पण या आठ वर्षांमध्ये शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या समस्यांवर तंत्रज्ञानाच्या मदतीने उपाययोजना केल्या आहेत. या उपाययोजनांच्या माध्यमातून त्याने ‘खेडय़ाकडे चला’ हाच संदेश दिला आहे, असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2014 1:10 am

Web Title: bird repellent technique by girish badragonde
टॅग : Engineering,Farming
Next Stories
1 करिअरमंत्र
2 सैन्य दलात महिला अभियंत्यांना संधी
3 ‘सीएसआयआर’ची प्राध्यापक पात्रता व संशोधक परीक्षा २०१४
Just Now!
X