बदलत्या ‘फास्ट ट्रॅक’ च्या जीवनशैलीत विचारांची मानसिकता स्लो ट्रॅकवर ठेवून आपले करिअर साध्य होणार का? इच्छा, आकांशा आणि यश हे समीकरण कसं जुळून येईल? अशा पद्धतीचा प्रश्न अनेक पालकांना, विद्यार्थ्यांना आणि शिक्षण पूर्ण होऊन करिअर निवडीच्या उंबरठय़ावर असलेल्या अनेकांना जाणवत असेल. सध्याच्या युगात सर्व पातळींवर सर्व गोष्टींच्या उपलब्धतेत सहजता असली तरी योग्य वेळेला नेमकं आणि अचूक मार्गदर्शन आणि त्यावर आपला निर्णय हा योग जुळून येणं तसं कठीण आहे, पण अशक्य नाही. असा योग  ‘करिअरनामा’ या पुस्तकाद्वारे वाचकांसमोर आला आहे. करिअरनामा (दहावी-बारावीनंतर पुढे काय?) नोकरी व्यवसाय मार्गदर्शनपर संग्राहय़ पुस्तक. तसं हे पुस्तक महाराष्ट्रातील असंख्य विद्यार्थ्यांना आणि पालकांना माहितीच असेल, कारण या पुस्तकाची सध्या नववी आवृत्ती प्रकाशित होऊन वाचकांसमोर आली आहे. या सुधारित आवृत्तीचं वैशिष्टय़ असं की, यातील काही प्रकरणांमधील माहितीमध्ये बदल करून नवी माहिती समाविष्ट केली आहे. पुस्तकाच्या सुरुवातीस तज्ज्ञ मंडळींच्या प्रेरणादायी मुलाखती आहेत. उदा. डॉ. रघुनाथ माशेलकर (आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ), डॉ. भालचंद्र मुणगेकर (माजी कुलगुरू, मुंबई विद्यापीठ, खासदार, राज्यसभा), डॉ. नरेंद्र जाधव (सदस्य, केंद्रीय नियोजन आयोग, भारत सरकार/ माजी कुलगुरू, पुणे विद्यापीठ), डॉ. अशोक कोळसकर (माजी कुलगुरू, पुणे विद्यापीठ), डॉ. अरुण निगवेकर (माजी कुलगुरू, पुणे विद्यापीठ), डॉ. एस. बी. मुजुमदार (संचालक सिम्बॉयोसिस), डॉ. शिवाजीराव कदम (कुलगुरू, भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी, पुणे) डॉ. प्र. चिं. शेजवलकर (ज्येष्ठ व्यवस्थापन व कॉमर्स तज्ज्ञ, पुणे), डॉ. दीपक टिळक (कुलगुरू, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे), डी. एस. कुलकर्णी (प्रसिद्ध उद्योजक) अशा यशस्वी व्यक्तिमत्त्वांच्या मुलाखतींचा विद्यार्थी तसेच होतकरू तरुणांना खूप चांगला उपयोग होईल. दहावी, बारावी आणि पदवी शिक्षण घेणाऱ्या किंवा घेतलेल्या युवावर्गाला करिअर करण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन या पुस्तकातून दिलेले आहे. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमाने प्रशासकीय सेवेत जाण्यासाठीच्या परीक्षांची माहिती विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सुरुवातीलाच व्हावी या हेतूने सविस्तरपणे देण्यात आली आहे.  यूपीएससीच्या सी-सॅट नवीन पॅटर्ननुसार परीक्षेची तयारी कशी करावी? यासाठीचे कानमंत्र या प्रकरणांत दिले आहेत. एमपीएससीच्या मुख्य परीक्षेत झालेले बदलही दिले आहेत. समाजशास्त्र प्रकरणाच्या अंतर्गत शारीरिक शिक्षणाची माहिती देण्यात आली आहे. याचबरोबर परदेशातील उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी भारतातील मदत करणाऱ्या संस्थांची नावे व पत्तेही नव्याने समाविष्ट केले आहेत. महत्त्वाच्या संस्थांच्या वेबसाइट्सचाही अंतर्भाव केला आहे. महाराष्ट्रातील शिक्षण संस्थांबरोबरच देशातील मुख्य संस्थांचीही माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे.
या पुस्तकातील प्रकरणांची यादी पुढीलप्रमाणे : स्पर्धा परीक्षा, अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रातील करिअर, कृषी क्षेत्रातील करिअर, संगणक क्षेत्रातील करिअर, विज्ञान क्षेत्रातील करिअर, हवाई वाहतूक क्षेत्रातील करिअर, र्मचट नेव्ही, सशस्त्र सेना (रक्षक दल), भारतीय रेल्वेतील  करिअर, वाणिज्य क्षेत्रातील करिअर, समाजशास्त्र : भारतीय संस्कृतीचे प्रतोद (अ‍ॅडव्हर्टायजर इन जर्नलिझम, पब्लिक रिलेशन, सेल्स रिप्रेझेन्टेटिव्ह, समाजकार्य, शिक्षक, शारीरिक शिक्षण, सायकॉलॉजी, एन्ग्रेव्हर, कमर्शिअल आर्टिस्ट, लेबर वेल्फेअर ऑफिसर, हॉटेल मॅनेजमेंट, इतिहासतज्ज्ञ, व्यवसाय मार्गदर्शन, हिरे अलंकार पारखी, ग्रंथपाल, टूरिस्ट गाइड, कायदा क्षेत्रातील व्यवसाय), खेळाच्या क्षेत्रातील संधी, कला क्षेत्रातील करिअर, फिल्म उद्योग क्षेत्रातील करिअर, प्रबंधशास्त्र (मॅनेजमेंट सायन्स), परदेशातील उच्च शिक्षण आणि स्कॉलरशिप्स, अर्धवट शिक्षण पूर्ण करण्यासाठी संधी देणारे मुक्त विद्यापीठ / शिक्षण संस्था.
वरील प्रत्येक प्रकरणामध्ये त्या त्या क्षेत्राची इत्थंभूत माहिती तसेच त्यातील सखोल मार्गदर्शन आणि संबंधित संस्थांची संपूर्ण माहिती आहे. आपली आवड आणि क्षमता याची सांगड घालून प्रत्येकाला या पुस्तकाद्वारे आपले करिअर निवडण्यास नक्कीच मदत होईल.
करिअरनामा, संपादन – विजय कोतवाल, संवाद प्रकाशन, पुणे, पृष्ठे ५२८, मूल्य – २७५ रु.

व्यक्तिमत्त्व विकास
यश आणि अपयश या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत मग ते नाणं म्हणजे कोण.? तर आपण.. म्हणजेच मनुष्यप्राणी. अर्थातच यश प्रत्येकालाच आवडतं आणि प्रत्येकालाच ते हवं असतं. प्रत्येक जण यशस्वी होण्याची इच्छा बाळगून असतो. सगळेच त्यासाठी प्रयत्न करतात. पण तरी जगात यशस्वी आणि अयशस्वी अशी दोनच प्रकारची माणसे असतात. जगातील सर्वाना दिवसाचे २४ तास एवढाच समान वेळ मिळतो मग तरी काही लोक यशस्वी आणि काही लोक अयशस्वी का असतात.?
या आणि अशा महत्त्वाच्या मुद्दय़ांनाच अनुसरून संजय नाथे यांचं ‘व्यक्तिमत्त्व विकास’ हे पुस्तक वाचकांसाठी सज्ज झालंय. या पुस्तकाची पाचवी सकस आवृत्ती आता वाचकांसमोर आली आहे. संजय नाथे यांनी आजवर मुलाखत, शिक्षण, स्पर्धा परीक्षा व तत्सम विषयांवर आधारित अनेक पुस्तकांचे लेखन केले आहे. ‘कोणतेही यश सहज मिळत नसले तरी मिळवताच येत नाही, असे जगात काहीही नाही’ यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. आजची तरुणाई आत्मविश्वासू आहे. प्रयत्न आणि परिश्रम करण्याची तयारीदेखील आहे. पण मग तरी यशाच्या बाबतीत जी नेमकी उदासीनता आहे, ती लेखकाने या पुस्तकाद्वारे वाचकांसमोर आणली आहे.
आजवर जगात यशस्वी झालेल्या लोकांनी आपल्यासारख्याच परिस्थितीत यश कमवलं कसं आणि ते टिकवलं कसं? आपल्यात नेमकं काय कमी पडतं आहे? यशस्वी लोक त्यांच्यात यशस्वी होण्यासाठीचा आत्मविश्वास कसा कमावतात? वेळेचे योग्य नियोजन करणे म्हणजे काय? ते कसे असतं? आपल्यात सकारात्मक बदल कसा करावा? ध्येय ठरवणे म्हणजे नेमके काय आणि ते कसे ठरवावे? स्वत:ला कसे ओळखावे? आपल्यात जिज्ञासू मनोवृत्ती कशी जागृत करावी? या आणि अशा विविध पैलूंवर सहज सोप्या पद्धत्तीचे मार्गदर्शन या पुस्तकाद्वारे मिळते आणि आपल्याला व्यक्तिमत्त्व विकासाला जोड देतात. ‘व्यक्तिमत्त्व विकास’ या पुस्तकाचे तीन विभाग आहेत. पहिल्या भागात सकारात्मकता जोपासण्याचा प्रयत्न केला असून, दुसरा भाग स्मरणशक्ती विकासाशी संबंधित आहे, तर तिसरा भाग व्यसनमुक्तीचा आहे. आपली स्मरणशक्ती दांडगी असेल आणि वाईट सवयी नसतील तर आपसूकच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा दुसऱ्यावर प्रभाव पडेल. त्यासाठी आपल्याला मुद्दामहून काही विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. तसेच एक चांगली प्रेरणा दुसऱ्या चांगल्या प्रेरणेचे उगमस्थान ठरते. सद्यस्थितीत तरुणाईसाठी योग्य असे हे पुस्तक निश्चितच त्यांच्या करिअर, नोकरी, शिक्षण अशा महत्त्वाच्या उंबरठय़ावर एक नवी दिशा सापडण्याचा स्रोत आहे.
व्यक्तिमत्त्व विकास – संजय नाथे, नाथे पब्लिकेशन प्रा. लि., पृष्ठे – २३१ , किंमत – १६० रु.   

रोजगार : स्वयंरोजगार
शिक्षण पूर्ण होऊन अथवा शिक्षण चालू असताना घेत असलेल्या शिक्षणाचा एखाद्या चांगल्या नोकरीसाठी उपयोग करायचा की रोजगार, स्वयंरोजगार सुरू करायचा अशा प्रगतिशील पर्यायांचा आता तरुणाई विचार करू लागली आहे. स्वत: व्यवसायाभिमुख होऊन रोजगार मिळवण्याच्या असंख्य वाटा आपल्याला ‘रोजगार-स्वयंरोजगार’ (मराठी तरुणांसाठी रोजगार-स्वयंरोजगाराच्या असंख्य वाटा) या पुस्तकाद्वारे मिळणार आहेत. वर्षांनुवर्षे चालत आलेल्या ‘नोकरी’ या संकल्पनेला थोडा वेगळा कल देत पैसा फक्त नोकरी करून मिळवण्यापेक्षा स्वत:चा व्यवसाय सुरू करून स्वयंरोजगार कमवण्याच्या संकल्पनेला आता सर्व पातळ्यांवर प्रतिसाद मिळू लागला आहे. या आत्मविश्वासाची अनेक उदाहरणे आपल्या महाराष्ट्रात आपल्याला दिसतात.
रोजगार मिळवण्यासाठी सध्या महाराष्ट्रात विविध क्षेत्रांतील अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. अशा अभ्यासक्रमांच्या माध्यमातून जसा रोजगार मिळवण्यास उपयोग होतो, त्याचबरोबर स्वत:चा व्यवसाय करण्यासही मदत होते. त्यासाठी जिद्द, चिकाटी व पैसा लागतो. त्यासंबंधीचे योग्य मार्गदर्शन वाचकांना या पुस्तकाद्वारे उपलब्ध झाले आहे. या पुस्तकात भांडवलाशिवाय वा कमी भांडवलावर चालणाऱ्या काही व्यवसायांची माहिती आहे जसे की, सव्‍‌र्हिस सेंटर, मार्केटिंग सुविधा व मार्केटिंग सव्‍‌र्हे करून देणाऱ्या संस्था, खाद्यपदार्थ बनवणे व विकणे, कापड व्यवसायातील दलाली व विक्री, इस्टेट एजन्सी, ताक-लस्सी विक्रेता, मोठय़ा उत्पादकांना कच्चा व तयार माल पुरवणे, स्क्रॅप (भंगार)चा धंदा करणे, सिझनल बिझनेस करणे, विविध विषयांवरील क्लासेस घरी चालविणे, बेबी सिटिंगचा व्यवसाय करणे, बालवाडय़ा चालवणे, पर्यटन व्यवसाय करणे, संस्कार केंद्र इत्यादींसारख्या अनेक व्यवसायांबद्दल सखोल मार्गदर्शन आहे. तसेच महिलांसाठीच्या विविध उद्योग व्यवसायांसाठी विशेष मार्गदर्शन या पुस्तकातून वाचकांना होणार असून, महिलांच्या आर्थिक विकासासाठी शासनाच्या विविध योजनांची पूरक माहिती आपल्याला या पुस्तकातून मिळते. स्वयंरोजगारासाठी केंद्र व राज्य सरकारच्या व्यवसायाभिमुख अर्थसाहाय्य योजना व त्यासंबंधीची सर्व इत्थंभूत माहिती आपल्याला उपलब्ध झाली आहे.
तरुणांनी बदलत्या परिस्थितीनुसार आपली मानसिकता बदलली पाहिजे. या जागतिक स्पर्धेत आपण कुठेही कमी पडणार नाही अशी जिद्द जर तरुणांनी दाखवली तर कोणीही बेकार राहणार नाही. रोजगारासाठी कुठे बाहेर जाण्याची गरज भासणार नाही एवढय़ा रोजगार- स्वयंरोजगाराच्या संधी मुंबई- महाराष्ट्रात आहेत. या आणि अशा अनेक पातळींवरच्या मार्गदर्शनासाठी हे पुस्तक वाचकांना प्रगतीच्या नव्या वाटेवर नक्कीच उपयुक्त आणि मोलाचे ठरेल यात शंका नाही.    
रोजगार – स्वयंरोजगार, दीपक काळीद, आमोद प्रकाशन, पृष्ठे – ९६, मूल्य – १०० रु.