छोटेसे बदल तुमच्या मन:परिवतन शक्तीत मोठा बदल घडवू शकतात, हे या पुस्तकात अधोरेखित करण्यात आले आहे. वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध झालेल्या मन:परिवर्तनाच्या अनेक सूचना यात दिल्या आहेत. कुठल्याही गोष्टीसाठी दुसऱ्याला प्रेरित करायचे असल्यास काही छोटेसे बदल तुमच्या विनंतीत केल्याने त्याचे किती नाटय़पूर्ण परिणाम साधतात, हे यात स्पष्ट केले आहे.

मन:परिवर्तन करण्याच्या नैतिक आणि परिणामकारक पद्धती यात दिल्या आहेत. ज्या गोष्टीचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रभाव तुमच्या निर्णयक्षमतेवर पडतो, त्याची चर्चा करण्यात आली आहे. यशस्वी आणि प्रभावी कृतीयोजनांमागचे मानसशास्त्र आणि त्यांना पुष्टी देणारे काटेकोर प्रमाण विशद केले आहे.

परतफेड, अधिकार, बांधीलकी, अभाव, आवड आणि सामाजिक पुरावा या सहा सामाजिक प्रभावांच्या तत्त्वांच्या आधारे मन:परिवर्तनाच्या क्लृप्त्या सांगितल्या आहेत. ही तत्त्वे व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनात कशी वापरता येतील, याच्या व्यावहारिक, कृतिशील, नैतिक आणि सुलभ पद्धती या पुस्तकात सांगितल्या आहेत.

येस! – डॉ. नोह गोल्डस्टेन, स्टीव्ह मार्टिन,

रॉबर्ट सीअलडिनी, अनुवाद – डॉ. धरणीधर रत्नाळीकर, मेहता पब्लिशिंग हाऊस, पृष्ठे- १९२, किंमत – २०० रु.

 

आत्मोन्नतीसाठी..

व्यक्तिगत यश म्हणजे काय आणि ते संपादन करण्याचे कौशल्य, त्यातील टप्पे, स्वभावदोष जाणून त्यावर मात कशी करायची हे ‘स सुखाचा’ या पुस्तकात उदाहरणांसहित स्पष्ट केले आहे. सुखाचा शोध बाहेरच्या जगात न घेता ते आपल्या आतच कसे असते, या कल्पनेचा विस्तार एका स्वतंत्र प्रकरणात केला आहे. दुसऱ्या एका प्रकरणात भौतिक यश आणि व्यक्तिगत यश यातील फरक स्पष्ट केला आहे. ऐहिक सुख आणि अंतर्यामीचे सुख यातील फरकही या पुस्तकात स्पष्ट करण्यात आला

आहे.

प्रेमाच्या १० जीवनसत्त्वांची ओळखही या पुस्तकात करून दिली आहे. स्वत:वर प्रेम असण्याचे माहात्म्य, ध्यानधारणा, नकारात्मक ऊर्जा शरीराबाहेर कशी टाकावी, हवे ते मिळवण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न, तीव्र इच्छा, जाणिवा, श्रद्धा याचे मूलमंत्र या पुस्तकात नमूद करण्यात आले आहेत. आपल्या इच्छांचा आदर करावा, मनोगंड दूर करण्याच्या पद्धती, भूतकाळातील भावनांवर प्रक्रिया करण्याच्या पद्धती याविषयीही मार्गदर्शन करण्यात आले आहे.

स सुखाचा – जॉन ग्रे, अनुवाद – शुभदा विद्वांस, मेहता पब्लिशिंग हाऊस, पृष्ठे – २९६,

किंमत – २९० रु.

 

प्रेरणादायी आत्मकथन

ही धैर्य, सचोटी, शहाणपणा, प्रामाणिकपणाची आणि साहसाची कथा आहे. माइंड ट्री या सॉफ्टवेअर सव्‍‌र्हिसेस कंपनीचे सहसंस्थापक सुब्रतो बागची यांची ही आत्मकहाणी त्यांनी आत्मपरीक्षण करीत, पुन:प्रत्ययाचा आनंद लुटत लिहिली आहे. तरुण व्यावसायिकांना प्रेरणा देतील आणि बोधप्रद ठरतील असे अनुभव या पुस्तकात जागोजागी आढळतात. त्यात विशद केलेल्या आठवणी हृद्य आणि मनोरम आहेत. पहिल्या विभागात खेडय़ातील बालपण, पालकांकडून मिळालेली ममता, नीतिमूल्यांची शिकवण, जगाविषयीचे कुतूहल रेखाटले आहे. त्यानंतरच्या प्रकरणात त्यांनी कनिष्ठ कारकुनापासून विप्रो कंपनीत उच्च पदी पोहोचेपर्यंतचा त्यांचा विस्मयकारी प्रवास सांगितला आहे. त्यानंतर माइंड ट्रीची स्थापना आणि तिथला प्रवास कथन केला आहे.

सामान्य परिस्थितीत जन्म घेऊन, नीतिमूल्ये जपत असामान्य यश आपण कसे मिळवू शकतो, याचे हे चकित करणारे उदाहरण ठरावे. महत्त्वाचा भाग असा की, आपल्या यशाची तटस्थपणे कारणमीमांसा करताना लेखक दिसतो.

गो किस द वर्ल्ड – सुब्रतो बागची, अनुवाद – सुनीती काणे, मेहता प्रकाशन, पृष्ठे – १८०,

किंमत – १५० रु.

 

अवघड काम आधी करावे!

 निर्णयक्षमता, शिस्त आणि संकल्पाद्वारे कामाची टाळाटाळ सोडून अधिक महत्त्वाची कामे तातडीने कशी करावी, याचे मूलमंत्र ‘ईट दॅट फ्रॉग’ या पुस्तकात दिले आहेत. ज्या कामामध्ये तुमची टाळाटाळ करण्याची शक्यता अधिक असते, त्याचा प्रभाव तुमच्या आयुष्यावर सर्वाधिक राहतो, हे लक्षात घेत प्राधान्यक्रमाने कामे करून पूर्ण करावीत आणि त्यासाठी प्रत्येक दिवसाची आखणी कशी करावी, याचे विश्लेषण यात केले आहे. नियोजन, कौशल्यांचे विकसन, मर्यादांवर मात, तत्परता, वेळेचे व्यवस्थापन याबाबतही सविस्तर मार्गदर्शन या पुस्तकात करण्यात आले आहे.

ईट दॅट फ्रॉग! – ब्रायन ट्रेसी, अनुवाद – प्रतिमा भांड, साकेत प्रकाशन, पृष्ठे- १४४, किंमत- १५० रु.

 

स्वप्नपूर्तीचा मार्ग

निराशेकडून स्वप्नपूर्तीकडे जाणारा मार्ग कुठला, शून्यातून सुरुवात करून भरघोस यश कसे संपादन करावे, याची तत्त्वे ‘गोल्स’ या पुस्तकात कथन केली आहेत. व्यक्तिगत क्षमता कशी निश्चित करावी, ध्येय कसे ठरवावे, साध्य करावयाच्या गोष्टींवर लक्ष कसे केंद्रित करावे, याचा ऊहापोह या पुस्तकात करण्यात आला आहे. आत्मविश्वास कसा वाढवावा, मार्गात येणारा अडथळा कसा दूर करावा, संकटातून मार्ग कसा काढावा, आव्हानांना प्रतिसाद कसा द्यावा, ध्येय कसे गाठावे याच्या विविध पद्धती पुस्तकात दिल्या आहेत. अनुभवसिद्ध कार्यप्रणालीची शिदोरी वाचकांना देण्याचा लेखकाचा मानस आहे. मूल्य स्पष्ट करणे, उद्दिष्ट ठरवणे, विश्वासाचे विश्लेषण करणे, प्रगतीचे मोजमाप करणे, निवडलेल्या क्षेत्रातील तज्ज्ञ बनवणे, कृतीआराखडा बनवणे, वेळेचे व्यवस्थापन करणे, ध्येयाचे सातत्याने परीक्षण करणे, मनाला कार्यान्वित करणे किती आवश्यक असते, हे या पुस्तकात स्वतंत्र प्रकरणाद्वारे स्पष्ट केले आहे.

गोल्स – ब्रायन ट्रेसी, अनुवाद : गीतांजली गीते, साकेत प्रकाशन, पृष्ठे – २५६, किंमत – २२५ रु. ल्ल