आपल्या देशात एमबीए करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची वर्षांगणिक वाढत आहे. दरवर्षी सुमारे दोन लाख विद्यार्थी एमबीएसाठी घेण्यात येणाऱ्या विविध प्रवेश परीक्षा देतात. यापैकी अवघ्या २० हजार जणांना आयआयएम, किंवा इंटरनॅशनल स्कूल ऑफ बिझनेस यांसारख्या प्रथितयश संस्थांमध्ये प्रवेश मिळतो. २० हजार ही संख्या वरकरणी चांगली भासली तरी भारताच्या ग्रामीण भागांतील गुणवत्तेला या संख्येत न्याय मिळतोच, असे नाही. गुणवत्ता आणि क्षमता असलेले कित्येक विद्यार्थी आपल्याला हव्या असलेल्या पदव्युत्तर पदवीला प्रवेश घेण्यापासून वंचितच रहातात.
एकीकडे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच यापुढे शासकीय नोकऱ्या मिळण्याची शक्यता कमी-कमी होत जाणार असल्याचे सूचित केले आहे, तर दुसरीकडे उद्योजक निर्माण होणे ही काळाची गरज आहे. केवळ भारताची परकीय गंगाजळी वाढविण्यासाठीच नव्हे तर भारताची आर्थिक पत सुधारण्यासाठी, निर्यात वाढविण्यासाठी भारतात उद्योगविश्व झपाटय़ाने विकसित होणे गरजेचे आहे. भारताने सेवा क्षेत्रात – त्यातही माहिती-तंत्रज्ञानाच्या (आयटी) क्षेत्रात वेगाने प्रगती केली. मात्र त्याच वेगाने औद्योगिक प्रगती करण्यासाठी – आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर आपली मोहोर उमटविण्यासाठी अजूनही प्रयत्न करण्याची गरज आहे.
ही प्रगती साधण्यासाठी आपल्या देशात आंतरराष्ट्रीय दर्जाचे, जागतिक स्पर्धेतही टिकू शकतील असे अभ्यासक्रम आणि मार्गदर्शन केले जाणे अपेक्षित आहे. भारतातील ‘बिझनेस स्कूल’नी एकाचवेळी येथील सामाजिक समस्यांवर उत्तर शोधू शकणारे आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ज्याच्या गुणवत्तेबद्दल आदर असेल असे विद्यार्थी घडविणे गरजेचे आहे. आज एमबीए होणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी अवघ्या २१ टक्के विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण होताच लगोलग नोकऱ्या मिळतात. उर्वरित विद्यार्थ्यांकडे एमबीएचीच पदवी असली तरीही त्यांना अनेक प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण नोकरी मिळविण्यासाठी द्यावे लागते. ही परिस्थिती आता बदलणे आवश्यक आहे.
याच दृष्टिकोनातून मैसूर रॉयल अ‍ॅकॅडमीने (मैरा) बिझनेस स्कूल सुरू करण्याचा निर्णय घेतला. मैसूरमधील राजघराणे असलेल्या अर्स कुटुंबीयांनी ‘सामाजिक विकास घडविणारी उद्योजकता’ हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून ‘मैरा बिजनेस स्कूल’ची स्थापना केली. भारतीय वास्तुशास्त्रावर आधारलेली रचना, फ्लोटिंग क्लासरूमसारख्या नावीन्यपूर्ण संकल्पना आणि मैसूर औद्योगिक विकास महामंडळापासून जवळच असलेले स्थान ही या कँपसची वैशिष्टय़े म्हणता येतील.
‘बदल ही नित्यनूतन विचारधारा आहे,’ या संकल्पनेभोवती येथील शिक्षण आधारलेले आहे. असामान्य गुणवत्ता असणाऱ्या या देशात योग्य अशा व्यावसायिक प्रशिक्षणाचा अभाव आहे. त्याचबरोबर येथील शिक्षणाचा पाया केवळ माहिती संकलनापेक्षा नवनवीन संशोधनांवर आधारलेला असणे आवश्यक आहे. हे सारे लक्षात घेऊन ‘मैरा’ येथील अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. निव्वळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता प्रात्यक्षिक – व्यावहारिक ज्ञान मिळावे या हेतूने येथे विद्यार्थ्यांचे विविध कॉर्पोरेटस्शी उत्तम संबंध निर्माण करून दिले जातील.  त्या दृष्टीने मैराने भारतातील आघाडीच्या २५ बिझनेस हाऊसशी आपले मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले आहेत. विशेष म्हणजे मैराची अमेरिकेतील अरायझोना स्टेट युनिव्हर्सिटीशी भागीदारी असेल, त्यामुळे येथे विख्यात आणि जागतिक कीर्तीचे शिक्षक शिकविण्यासाठी उपलब्ध असतील.
वास्तुशास्त्राच्या दृष्टीनेही येथे अनेक नूतन संकल्पना राबविल्या गेल्या आहेत. सूर्यप्रकाशाच्या दिशेने बांधण्यात आलेले समृद्ध ग्रंथालय, चौकटीबाहेरचा विचार करण्यास चालना देणारी ‘ब्रेक आऊट’ (विभागता येणारी ) क्लासरूम ही संकल्पना, अँफी थिएटर आणि वाहत्या पाण्यात उभी असणारी ‘फ्लोटिंग क्लासरूम’ अशा स्थापत्यशास्त्रीय आविष्कारांनी येथील कँपस समृद्ध आहे.
आधुनिक तंत्रज्ञान, शिक्षणाची आधुनिक साधने यांच्याबरोबरीनेच अगदी स्थानिक शेतकी समस्यांपासून ते उद्योगविस्तारासमोरील जागतिक आव्हानांपर्यंत सर्व प्रकारच्या समस्या विद्यार्थ्यांना हाताळाव्या लागतील, त्यासाठी संशोधन करावे लागेल, त्यावर उत्तरे शोधावी लागतील आणि ती उत्तरे स्वीकारार्ह असतील असेही पाहावे लागेल. घाना या देशामधील ऊर्जेची समस्या लक्षात घेऊन तेथील विद्यार्थ्यांनी ज्याप्रमाणे सौर स्टो ही संकल्पना शोधून काढली आणि सर्वानाच ही सुविधा परवडू शकेल हे पाहिले, त्याचप्रमाणे आपल्या देशातील एमबीए होणाऱ्या विद्यार्थ्यांची येथील मातीशी – येथील समस्यांशी नाळ जोडलेली असणे हे आपल्या संस्थेचे उद्दिष्ट असल्याचे ‘मैरा’च्या संस्थापिका शालिनी अर्स आवर्जून सांगतात. उद्योजकांना जागतिक भाषा असणाऱ्या इंग्रजीतच अनेकदा संवाद साधावा लागतो. मात्र अशा वेळी ग्रामीण पाश्र्वभूमी असलेल्या गुणवान विद्यार्थ्यांना नाही म्हटले तरी एक प्रकारच्या न्यूनगंडाचा सामना करावा लागतो. हे टाळण्यासाठी इंग्रजी विकसित करणारे उत्तम प्रशिक्षण वर्ग अभ्यासक्रमादरम्यान चालविण्याचा आपला मानस असल्याचेही अर्स यांनी नमूद केले. एमबीए करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांला आर्थिक समस्येचाही सामना करावा लागतो. मात्र अन्य व्यवस्थापकीय संस्थांच्या तुलनेत येथील शुल्क प्रणाली स्वस्त आहे. शिवाय या संस्थेतर्फे सध्या शिष्यवृत्ती आणि पाठय़वृत्ती योजनाही तयार करण्यात येत आहे. ज्यांनी केवळ व्यावसायिक प्रशिक्षण घेतले आहे अशा विद्यार्थ्यांमध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असणारे ज्ञान असते. मात्र त्यांच्याकडे शैक्षणिक पात्रता नसते, शिवाय कॅटसारखी परीक्षा उत्तीर्ण होणे त्यांना अवघड असते. अशा विद्यार्थ्यांनाही उद्योजक म्हणून घडविणारे अभ्यासक्रमही सुरू करण्यात येणार आहेत.
आज जागतिक अर्थव्यवस्था संकटात असली तरी उद्योजकतेचे महत्त्व कमी झालेले नाही. जागतिक व्यासपीठावर भारतीय उद्योजकांचा दबदबा तयार होणे आणि या क्षेत्रातही आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी आज देशाला येथील संस्कृतीशी जोडले गेलेले आणि वैश्विकतेचे भान असलेल्या उद्योजकांची गरज आहे आणि म्हणूनच होतकरू आणि मेहनती युवकांसाठी करिअर म्हणून व्यवस्थापनाचा विचार करणे गरजेचे आहे.
एमबीएला प्रवेश घेताना कोणते निकष लावावेत?
स्पर्धेच्या युगात  मिळेल त्या महाविद्यालयात प्रवेश मिळवण्याकडे आपला कल असतो. एमबीए अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयाची निवड करताना उपयुक्त ठरतील असे हे चार निकष –
१.     इनपुट व्हॅल्यू – यामध्ये प्रवेशपरीक्षा, त्याची काठिण्यपातळी, आंतरराष्ट्रीय तसेच देशभरातील अन्य राज्यांतून येणारे विद्यार्थी – त्यांची संख्या यांचा समावेश होतो.
२.     गुणवत्ता वाढविणारे मुद्दे – महाविद्यालयाच्या आंतरराष्ट्रीय लिंक्स, विविध उद्योगांना दिल्या जाणाऱ्या भेटी, शिकविणाऱ्या शिक्षकांच्या प्रोफाईल आणि उजळणीसाठी दिला जाणारा वेळ.
३.     महाविद्यालयाचे ‘ब्रँड’ मूल्य – आंतरराष्ट्रीयदृष्टय़ा महाविद्यालयाची पत, तेथे होणारे कँपस इंटरव्ह्य़ू.
४.     शिकण्यायोग्य वातावरण – पायाभूत सुविधा, ग्रंथालय, तंत्रज्ञानविषयक सुविधा आणि विविध औद्योगिक संस्था आणि विद्यार्थी यांच्यातील परस्परसंबंध.