|| प्रथमेश आडविलकर

विद्यापीठाची ओळख

कॅल्टेक या नावाने सर्वत्र प्रसिद्ध असलेली कॅलिफोíनया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी हे विद्यापीठ २०१९ सालच्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सटिी रँकिंगनुसार जगातले चौथ्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे. अमेरिकेतील कॅलिफोíनया या राज्यात असलेल्या या विद्यापीठाची स्थापना १८९१ साली झालेली आहे. कॅल्टेक हे एक खासगी विद्यापीठ असून अमेरिकेतील इतर सर्व विद्यापीठांसारखीच ही मोठय़ा प्रमाणावर संशोधन करणारी संस्था आहे. हे विद्यापीठ, निसर्ग विज्ञान आणि अभियांत्रिकीमधील, अभ्यासासाठी जगभर ओळखले जाते आणि म्हणूनच जगभरातील प्रमुख पाच विद्यापीठांमध्ये कॅल्टेकला स्थान देण्यात आले आहे. ‘द ट्रथ शाल मेक यू फ्री’ हे विद्यापीठाचे ब्रीदवाक्य आहे.

लॉस एंजिलीसपासून १८ किलोमीटर पूर्व-उत्तरेस स्थित असलेल्या कॅल्टेक विद्यापीठाचा एकूण परिसर हा १२४ एकरांचा आहे. विद्यापीठाच्या या कॅम्पसमध्ये एकूण सहा प्रमुख शैक्षणिक- संशोधन विभाग पसरलेले आहेत. विद्यापीठाचा मुख्य भर हा मूलभूत व उपयोजित विज्ञान आणि अभियांत्रिकी या विद्याशाखांवर आहे. सध्या कॅल्टेकमध्ये तीनशे तज्ज्ञ प्राध्यापक-संशोधक आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत असून दोन हजारपेक्षाही अधिक पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण व संशोधन पूर्ण करत आहेत.

अभ्यासक्रम

कॅल्टेक विद्यापीठ अभ्यासक्रमासाठी चारमाही व्यवस्थेचे (क्वार्टर सिस्टम) पालन करते. विद्यापीठातील पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचे असून पदव्युत्तर अभ्यासक्रम वेगवेगळ्या कालावधीचे आहेत. पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी विज्ञान आणि अभियांत्रिकी शाखेतील बहुतांश विषयांवर आपले लक्ष केंद्रित करतात. कॅल्टेकमधील शैक्षणिक विभाग हे सहा वेगवेगळ्या ‘डिव्हिजन्स’ माध्यमातून विभागलेले आहेत. विद्यापीठातील डिव्हिजन ऑफ बायोलॉजी अ‍ॅण्ड बायोइंजिनीअिरग, डिव्हिजन ऑफ केमिस्ट्री अ‍ॅण्ड केमिकल इंजिनीअिरग, डिव्हिजन ऑफ इंजिनीअिरग अ‍ॅण्ड अप्लाइड सायन्सेस, डिव्हिजन ऑफ जिओलॉजिकल अ‍ॅण्ड प्लॅनेटरी सायन्सेस, डिव्हिजन ऑफ फिजिक्स, मॅथेमॅटिक्स अ‍ॅण्ड अ‍ॅस्ट्रॉनॉमी या सहा विभागामार्फत संस्थेतील सर्व पदवी व पदव्युत्तर विभाग चालतात. या सर्व विभागांमधून विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी वा संशोधन पातळीवरील शेकडो अभ्यासक्रमांचे सर्टििफकेट, ऑनलाईन व ऑफलाइन पर्याय विद्यापीठाने उपलब्ध करून दिले आहेत. विद्यापीठामार्फत चालणाऱ्या या सर्व अभ्यासक्रमांना ‘वेस्टर्न असोसिएशन ऑफ स्कूल्स अँड कॉलेजेस’ या संस्थेची १९४९ सालापासून मान्यता मिळालेली आहे. विद्यापीठातील ऑफलाइन अभ्यासक्रम हे ऑटम, फॉल आणि स्प्रिंग या तीन सत्रांमध्ये चालतात तर ऑनलाईन अभ्यासक्रम वर्षभर उपलब्ध असतात. विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी त्या-त्या पदवी वा पदव्युत्तर स्तरासाठी आवश्यक असलेली प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे विद्यार्थ्यांसाठी गरजेचे आहे. विद्यापीठामध्ये विद्यापीठातील डिव्हिजन ऑफ बायोलॉजी अ‍ॅण्ड बायो इंजिनीअिरगअंतर्गत बायोलॉजी, बायोकेमिस्ट्री अ‍ॅण्ड मॉलिक्युलर बायोफिजिक्स इत्यादी विभाग येतात तर डिव्हिजन ऑफ इंजिनीअिरग अ‍ॅण्ड अप्लाइड सायन्सेसअंतर्गत अ‍ॅप्लाइड फिजिक्स अ‍ॅण्ड मटेरियल्स सायन्स, एअरोस्पेस, मेडिकल इंजिनीअिरग, सिव्हिल अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंटल इंजिनीअिरग, इलेक्ट्रिकल इंजिनीयिरग, कॉम्प्युटर सायन्स, मेकॅनिकल इंजिनीअिरग हे विभाग येतात.

सुविधा:

कॅल्टेक विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्क, निवास व भोजन सुविधा विविध निकषांद्वारे उपलब्ध करून दिलेल्या आहेत. विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आíथक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते. तसेच, विद्यार्थ्यांच्या आवश्यकतेनुसार विद्यापीठाच्या आवारात विवाहित व अविवाहित विद्यार्थ्यांना निवासाची सुविधा बहाल करण्यात येते. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर यासाठी असलेली अर्जप्रक्रिया व इतर बाबींबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. विद्यापीठाचे ग्रंथालय व सर्व प्रयोगशाळा अद्ययावत आहेत. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना हेल्थ इन्शुरन्स व वैद्यकीय सुविधा काही अटींवर विद्यापीठाकडून दिल्या जातात. कॅल्टेक विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये जेट प्रपल्षण लॅबोरेटरी व एफएफआरडीसी ही नासाची दोन संशोधन केंद्रे आहेत.

वैशिष्टय़े

कॅल्टेक विद्यापीठाने अनेक जागतिक दर्जाचे संशोधक व प्राध्यापक घडवलेले आहेत. ऑक्टोबर २०१८ पर्यंतच्या सांख्यिकीनुसार, आतापर्यंत संस्थेशी संबंधित एकूण ७३ माजी विद्यार्थी वा प्राध्यापक नोबेल पारितोषिक विजेते आणि सहा टय़ुरिंग पुरस्कार विजेते आहेत. रसायनशास्त्र आणि शांततेसाठी या दोन्ही गटांमध्ये अविभाज्य दोन नोबेल पुरस्कार मिळवणारे लायनस पॉलिंग, डग्लस ओश्राफ, कार्ल अंडरसन, एडविन मकमिलन यांसारखे इतर नोबेलविजेते, इंटेलचे संस्थापक गोर्डन मुरे इत्यादी नामवंत या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत.

संकेतस्थळ: //www.caltech.edu/

itsprathamesh@gmail.com