डॉ. श्रीराम गीत

सर मला टेरिटोरिअल आर्मी या पदाबद्दल माहिती हवी आहे. यासाठी द्यावयाच्या परीक्षेची तयारी कशी करावी, अभ्यासक्रम कोणता आहे, याविषयी माहिती द्याल का?

तृप्ती दुबुकवाड

टेरेटोरिअल आर्मीची स्थापना १९२० साली झाली. अठरा ते बेचाळीस वयाच्या नोकरी वा व्यवसायात सुस्थित असलेल्या आणि शारीरिकदृष्टय़ा सदृढ व्यक्तींना येथे प्रवेश मिळतो. या सेवेत आजवर अनेक मान्यवरांनी स्वत:चा सहभाग दिला आहे. तसेच ऑनररी किंवा मानद ऑफिसरची पदे भूषवण्यात सचिन तेंडुलकर, धोनी, कपिलदेव, खा. अनुराग ठाकूर, अभिनेता मोहनलाल यांची नावे सहजपणे डोळय़ांसमोर येतात. नुकत्याच झालेल्या पद्म पुरस्कारांमध्ये धोनी यांनी हा पुरस्कार राष्ट्रपतींकडून स्वीकारताना टेरिटोरिअल आर्मीच्या पोशाखात त्यांना मानवंदना देत तो स्वीकारला.

मात्र या साऱ्यामध्ये महिलांना अनेक वर्षे प्रवेश नव्हता. दिल्ली हायकोर्टाच्या चीफ जस्टिस गीता मित्तल व जस्टिस हरी शंकर यांच्या पीठाने आता तसा आदेश देऊन महिलांसाठी हे क्षेत्र उपलब्ध करून दिले आहे. याद्वारे पहिली महिला अधिकारी म्हणून लेफ्टनंट शिल्पी गर्गमुख या दाखल झाल्या आहेत. त्यांनी धनबाद येथून केमिकल इंजिनिअिरग पूर्ण केले व सध्या त्या ओएनजीसीमध्ये नोकरी करतात. आता थोडेसे प्रवेशाबद्दल व कामाबद्दल.

निबंधलेखन व ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप असते. त्यातून निवड झालेल्यांना मुलाखतीसाठी भोपाळ, अहमदाबाद, कोईमतूर यापैकी एका ठिकाणी बोलावले जाते. जोडीला एसएसबीच्या विविध चाचण्यांतून मानसिक, शारीरिक व बौद्धिक चाळणी लागत असते. या पाच दिवसांच्या कठोर परीक्षेतून उत्तीर्ण होणारे वैद्यकीय तपासणीला सामोरे जातात. निवडलेल्या प्रत्येकाला प्रथम वर्षी तीन महिने प्रशिक्षण दिले जाते.

त्यानंतर दरवर्षी दोन महिने याप्रमाणे ते कायम निवृत्तीपर्यंत चालूच राहते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वत:ची नोकरी चालू ठेवून हे सारे करायचे असते. टेरिटोरिअल आर्मीमध्ये दाखल होणे म्हणजे नागरी व लष्करी या दोन्हींमध्ये स्वत:चा सहभाग देणे असा आहे. हे समजून घेऊन मगच या सेवेचा विचार करावास.त्यासाठी प्रथम पदवीनंतर नोकरीची सुरुवात व त्यानंतर एसएसबीसाठी अर्ज हा क्रम राहील. दरवर्षी जून व डिसेंबरमध्ये एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये या साऱ्याची माहिती प्रसिद्ध होत असते. तृप्तीच्या प्रश्नाच्या निमित्ताने करिअर वृत्तान्तच्या वाचकांना ही माहिती देण्याचा योग आला आहे. त्याचा इच्छुकांनी जरूर योग्य तो उपयोग करून घ्यावा.

विद्यार्थी मित्र, मैत्रिणींनो, करिअर मंत्र या सदरासाठीचे आपले प्रश्न  career.mantra@expressindia.com येथे पाठवावेत. प्रश्नामध्ये आपली शैक्षणिक पात्रता जरूर नमूद करावी. त्यामुळे  उत्तरामध्ये अधिक स्पष्टता आणता येईल.