डॉ. सिद्धीविनायक बर्वे

जीवतंत्रज्ञान एक नवे कोरे शास्त्र आहे. जादूची कांडी फिरताच जशा अद्भुत गोष्टी घडून येतात तसेच जीवतंत्रज्ञानामुळे अनेक चमत्कार समोर येत आहेत. सजीवातील विविध जैविक प्रक्रियांचा वापर मानवी कल्याणासाठी करणारे शास्त्र म्हणून जीवतंत्रज्ञान विकसित होत आहे. जीवतंत्रज्ञान ही एक आंतरशाखीय ज्ञानशाखा आहे त्यामुळे जीवतंत्रज्ञानात विज्ञानातील अनेकविध संकल्पनांचा अंतर्भाव केला जातो. या जैविक प्रक्रियांपैकी सजीवातील मूलभूत घटक असणाऱ्या आणि पेशींवर नियंत्रण ठेवणाऱ्या डीएनए रेणूचा अंतर्भाव असणारे तंत्र आहे, रेणवीय जीवशास्त्र किंवा मॉल्युक्युलर बायोलॉजी.

Loksatta kutuhal Creator of artificial intelligence Judea Perl
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे रचनाकार – ज्युडेया पर्ल
Upsc Preparation  Economics Kaleidoscope of Pre Exam career
Upsc ची तयारी : अर्थशास्त्र: पूर्व परीक्षेचा कॅलिडीस्कोप
successfully test fired advanced missile Agni Prime from APJ Abdul Kalam Island
‘अग्नी-प्राइम’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
Robert Dennard
चिप-चरित्र : ‘मेमरी चिप’ क्षेत्राची पायाभरणी

रेणवीय जीवशास्त्राचा जगभर झपाटय़ाने विकास होत आहे. या आधुनिक तंत्राचा वापर अलीकडे मोठय़ा प्रमाणावर केला जात आहे. करिअरच्या दृष्टिकोनातून बघितले तर रेणवीय जीवशास्त्राची निवड विद्यार्थी मोठय़ा प्रमाणावर करताना आढळून येतात. रेणवीय जीवशास्त्रात सजीवांत बदल घडविण्याची क्षमता असल्यामुळे जीवतंत्रज्ञानातील करिअरचा हा पर्याय निवडण्यामागे विद्यार्थ्यांचा अधिक कल दिसून येतो. सजीवांवर नियंत्रण करणाऱ्या डीएनए रेणूसंबंधी तंत्र रेणवीय जीवशास्त्रात अंतर्भूत असल्यामुळे रेणवीय जीवशास्त्राकडे एक विशेष कुतूहल म्हणूनही पाहिले जाते. त्याचबरोबर जेनेटिक इंजिनीअरिंग किंवा जनुक अभियांत्रिकी या रेणवीय जीवशास्त्रातील तंत्राबाबत विद्यार्थ्यांना विशेष आकर्षण आढळून येते. जीवतंत्रज्ञान म्हणजेच रेणवीय जीवशास्त्र अशीही बहुतेकांची धारणा असते. रेणवीय जीवशास्त्राचा वापर मानवी जीवनाला स्पर्श करणाऱ्या अनेक क्षेत्रात करण्यात येतो त्यामुळे रेणवीय जीवशास्त्रात संशोधन आणि व्यवसायाच्या अमर्याद संधी उपलब्ध आहेत.

जीवसृष्टीतील सर्व सजीव पेशींपासून बनलेले असतात. सजीवातील या पेशींचे नियंत्रण पेशीमधील केंद्रकाद्वारे केले जाते. या पेशीकेंद्रात पेशींवर पर्यायाने सर्व सजीवांवर नियंत्रण ठेवणारा डीएनएचा रेणू अस्तित्वात असतो. या डीएनए रेणूत सजीवांचे गुणधर्म ठरविणारी जनुके अस्तित्वात असतात. जीवसृष्टीचा पाया असलेल्या या जैविक प्रक्रियांसंदर्भातील तंत्रांचा अंतर्भाव रेणवीय जीवशास्त्रात अंतर्भूत केला जातो. सजीवसृष्टीवर नियंत्रण ठेवणाऱ्या रेणूंविषयी तंत्र रेणवीय जीवशास्त्रात विकसित झाल्यामुळे रेणवीय जीवशास्त्राचा वापर अनेक ठिकाणी करण्यात येतो.  पारजनुक तंत्राच्या वापरातून विकसित झालेले नवीन वाण कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्रासाठी वरदान ठरत आहेत तर जनुक अभियांत्रिकीव्दारे विकसित केलेल्या प्राण्यांच्या अनेक प्रजाती मानवी जीवन अधिक समृद्ध करण्यात योगदान देत आहेत. रेणवीय जीवशास्त्राच्या साहाय्याने रोगांचे अचूक निदान करण्यात मदत होते तर फॉरेन्सिक निदानाद्वारे गुन्हे अन्वेषणातही रेणवीय जीवशास्त्राचा वापर करण्यात येतो.

रेणवीय जीवशास्त्राच्या साहाय्याने सजीवांतील जनुकांचे संक्रमण करून नवीन प्राणी तसेच वनस्पती प्रजातींची निर्मिती करण्यात येते. अनेक वनस्पतींच्या रोगांपासून संरक्षण देणाऱ्या नवीन वाणांची निर्मिती करून अधिक उत्पादन देण्याऱ्या पिकांची निर्मिती रेणवीय जीवतंत्रज्ञानाच्या साहाय्याने केली जाऊ शकते. बी टी कापसाच्या रेणवीय जीवशास्त्राच्या साहाय्याने विकसित प्रजातीमुळे कापसाचे त्यावर पडणाऱ्या किडींपासून संरक्षण करण्यात आल्यामुळे उत्पादनात भरघोस वाढ होते. भारतासारख्या शेतीप्रधान देशात तर या तंत्राद्वारे आमूलाग्र बदल घडून येऊ शकतो. या क्षेत्रात संशोधन तसेच व्यावसायिक स्तरावर विकासाच्या अमर्याद संधी उपलब्ध आहेत.

आपल्या देशात वनस्पती आणि प्राण्यांची अमर्याद जैवविविधता आढळून येते. वनस्पती, प्राणी तसेच सूक्ष्मजीव प्रजातींची अचूक ओळख रेणवीय जीवशास्त्राद्वारे केली जाते. सजीवांतील डीएनए रेणूच्या जडघडणीवरून सजीव प्रजातींचे निदान केले जाते. पर्यावरण तसेच वन्यजीव संरक्षणासाठी या तंत्राचा वापर करण्यात येतो. या क्षेत्रात करिअर संधीचा प्रचंड वाव आहे.

रेणवीय जीवशास्त्राच्या साहाय्याने अचूक पद्धतीने रोगांचे निदान करण्यासाठी या शास्त्राचा वापर करण्यात येतो. अनेक दुर्धर आजारांचे लवकर आणि अचूक निदान करण्याची पद्धत रेणवीय जीवशास्त्राच्या साहाय्याने विकसित करण्यात आली आहे. मलेरिया, विषमज्वर, कॅन्सर तसेच एड्सचे निदान करण्यात रेणवीय तंत्राचा वापर करण्यात येतो. या क्षेत्रातही संशोधन तसेच व्यवसायाच्या अमर्याद संधी उपलब्ध आहेत.

गुन्हे अन्वेषणासाठी रेणवीय तंत्रज्ञानाचा वापर करून अचूकरीत्या गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी रेणवीय जीवशास्त्राचा वापर करण्यात येतो. गुन्ह्य़ाच्या ठिकाणी सापडलेल्या गुन्हेगाराच्या जैविक पुराव्यावरून गुन्ह्य़ाची उकल करण्यास मदत होते. गुन्हा घडलेल्या ठिकाणी सापडलेल्या गुन्हेगाराच्या केस तसेच वीर्यासारख्या जैविक घटकातील डीएनए रेणूंचे विश्लेषण करून गुन्ह्य़ाचा अचूक तपास केला जातो. त्याचबरोबर न्यायवैद्यकशास्त्रात औरस-अनौरस संततीविषयक वाद मिटविण्यासाठी रेणवीय जीवशास्त्राचा वापर केला जातो.

व्यावसायिक क्षेत्रात पारजनुक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वनस्पती किंवा प्राण्यांतील उपयोगी जनुके एकपेशीय सूक्ष्मजीवात संक्रमित करून त्या जनुकाद्वारे मोठय़ा प्रमाणावर मानवोपयोगी घटकांची निर्मिती करण्यात येते. या पद्धतीद्वारे इन्सुलिनसारख्या घटकांची निर्मिती जनुक संक्रमणाच्या तंत्राद्वारे करण्यात येते. औषधनिर्मिती क्षेत्राला रेणवीय जीवशास्त्राचे मोठे वरदान लाभले आहे.

या क्षेत्रात भारतात आणि परदेशात अनेक प्रगत संशोधन संस्था आपले कार्य करत आहेत. भारतात हैद्राबाद येथील सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉल्युक्युलर बायोलॉजी तसेच बंगळूरु येथील नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्स अशा प्रगत संस्था कार्यरत आहेत. आपल्या देशातील बहुतेक विद्यापीठे तसेच महाविद्यालयांतून रेणवीय जीवशास्त्रातील शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत. रेणवीय जीवशास्त्र प्रामुख्याने संशोधनाधिष्ठित शास्त्र असल्याने करिअरसाठी संस्थेची निवड करताना त्या संस्थेत योग्य प्रमाणात मूलभूत सुविधा असल्याची खात्री करून घेणे योग्य ठरेल.

रेणवीय तंत्रज्ञान हे अशा प्रकारे अदृश्यपणे पण अचूक काम करणारे तंत्रज्ञान आहे. खऱ्या अर्थाने जीवतंत्रज्ञानाचा चेहरा असलेले शास्त्र. जीवतंत्रज्ञानाची क्रांती घडवून आणण्यासाठी या शास्त्राचा अंगीकार करायलाच हवा.

(लेखक केळकर शिक्षण संस्थेच्या सायंटिफिक रिसर्च सेंटर, मुलुंड येथे संचालक म्हणून कार्यरत आहेत.)