चित्रकलेच्या माध्यमातून करिअरची वाट शोधणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला हा मूलभूत घटक असणाऱ्या अप्लाइड आर्ट तसेच फाइन आर्ट या अभ्यासक्रमांच्या पदवी – पदविका अभ्यासक्रमांचे पर्याय उपलब्ध आहेत. कला, विज्ञान व वाणिज्य अशा कुठल्याही विद्याशाखेच्या कोणत्याही अभ्यासक्रमांत बारावीत किमान ४५ टक्के (राखीव वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४० टक्के) गुण मिळवलेले विद्यार्थी या चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमासाठी अर्ज करू शकतात. पदविका अभ्यासक्रमासाठी दहावी उत्तीर्ण असावे लागते. त्यांना वर्षभराच्या फाऊंडेशन कोर्सनंतर चार वर्षांचा पदविका अभ्यासक्रम करता येतो.
उपयोजित कला अभ्यासक्रम (अप्लाइड आर्ट)
चित्रकला ही स्वानंदाकरता अथवा समाधानाकरता काढण्याच्या पल्याड पोहोचून त्यात एक उत्तम करिअर करता येणे शक्य बनले आहे. एकेकाळी केवळ राजाश्रयाद्वारे जोपासल्या गेलेल्या चित्रकलेने व्यावसायिक रूपडे धारण केले आहे. पोर्टेट, निसर्गचित्रांपासून चित्रपटाच्या जाहिराती आणि पोस्टरपासून कॅलेंडर, भेटकार्डापर्यंत ती पोहोचली आहे. कालांतराने बदल होत गेलेल्या या उपयोजित कलेलाच कमर्शियल आर्ट म्हणले जाऊ लागले.
औद्योगिकीकरणातील वाढत्या स्पर्धेमुळे जाहिरातीचे युग आले आणि मग चित्रकलेने जाहिरात स्वरूप धारण केले. देखण्या चित्रांबरोबरच जाहिरातीचा मजकूर स्पष्ट करण्यासाठी ‘कॉपी रायटिंग’चे कसब पणाला येऊ लागले. चित्रकलेद्वारे अर्थ सुस्पष्ट करणाऱ्या चित्रकाराला इलेस्ट्रेटर आर्टिस्टचा दर्जा मिळाला.
गेल्या काही वर्षांत अ‍ॅनिमेशन तंत्राने जाहिरात क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. अ‍ॅनिमेटेड चित्रपटांनी जगभरात आपला प्रेक्षकवर्ग निर्माण केला. कॉम्प्युटर ग्राफिक्स तंत्राने जाहिरात, चित्रपट आदी क्षेत्रांचा कायापालट केला. संगणकाच्या मदतीने चित्रकाराचे कसब अधिक कल्पक होऊ लागले आणि त्यांच्या कामाचा वेगही वाढू शकला.
कमर्शिअल आर्ट अभ्यासक्रमात एक्झिबिशन डिझाइन डिस्प्ले किंवा फोटोग्राफी असे दोन स्पेशलाइज्ड विषय आहेत. या विषयीचे कौशल्य प्राप्त करून वेगळ्या प्रकारच्या करिअरमध्ये पाऊल रोवता येऊ शकते. जाहिरात क्षेत्रातील छायाचित्रणाच्या वेगवेगळ्या गरजांनुसार इंडस्ट्रियल फोटोग्राफी, फॅशन फोटोग्राफी, पोर्टेट फोटोग्राफी, टेबलटॉप फोटोग्राफी हे प्रकार हाताळणाऱ्या छायाचित्रकारांना आज उत्तम मागणी आहे. जाहिरात एजन्सीतर्फे अशा प्रकारची कामे मिळू शकतात. वरील सर्व विषय उपयोजित कलेच्या अभ्यासक्रमात शिकवले जातात.
फाइन आर्ट
फाइन आर्ट विभागात विविध विषयांचे अभ्यासक्रम येतात. त्यात ड्रॉइंग अ‍ॅण्ड पेंटिंग, टेक्स्टाइल डिझाइन, स्कल्प्चर, इंटिरिअर डेकोरेशन, मेटल वर्क, सिरॅमिक्स या अभ्यासक्रमांचा समावेश असतो.
तयार कपडय़ांना जोरदार मागणी असल्यामुळे टेक्स्टाइल डिझायनिंग, डाय व बाटिक पेंटिंग, ड्रेस डिझायनिंग तसेच फॅशन डिझायनिंग या विषयात करिअर करू इच्छिणाऱ्यांना उत्तम संधी प्राप्त आहे. शिल्पकलेनेही व्यावसायिक रूप धारण केले असून केवळ मूर्तीच नाही तर इंटिरिअर डिझायनिंगसाठी लागणाऱ्या शोभेच्या वस्तू, कार्यालयीन इमारतीच्या आवारातील आकर्षक शिल्पे किंवा डिझाइन्सना मोठी मागणी असते. घरसजावटीची, कार्यालयीन सजावटीची कामे इंटिरिअर डेकोरेटर करतोच, पण इंटिरिअर डेकोरेशन करणाऱ्या व्यक्तींना सेट डिझायनिंगमध्येही मोठा वाव मिळू शकतो. लाकूड, प्लास्टिक, मेटल वर्क, सिरॅमिक अशा वेगवेगळ्या माध्यमांत घडवल्या गेलेल्या वस्तूंना आज सजावटविश्वात मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

पदवी अभ्यासक्रम: महाविद्यालये अप्लाइड आर्ट-फाइन आर्ट : शासकीय महाविद्यालये-
* सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई.
* शासकीय चित्रकला महाविद्यालय, नागपूर.
* शासकीय चित्रकला महाविद्यालय, औरंगाबाद.
* खासगी विनाअनुदानित अप्लाइड आर्ट पदवी महाविद्यालये-
* रचना संसद कॉलेज ऑफ अप्लाइड आर्ट अ‍ॅण्ड क्राफ्ट, मुंबई.
* पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ अप्लाइड आर्ट अ‍ॅण्ड क्राफ्ट, पुणे.
* भारतीय विद्यापीठाचे कॉलेज ऑफ फाइन आर्ट, पुणे.
खासगी विनाअनुदानित फाइन आर्ट महाविद्यालये-
* बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाइन आर्ट, सावंतवाडी.
वरील महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रम शिकता येतो.
प्रवेशाकरता इच्छुक विद्यार्थ्यांना केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला सामोरे जावे लागते. प्रवेश परीक्षेसाठी ऑब्जेक्ट ड्रॉइंग (५० गुण), डिझाइन (५० गुण), जनरल नॉलेज (४० गुण), मेमरी ड्रॉइंग (५० गुण) अशा सर्व मिळून १९० गुणांत इंटरमिजिएट ड्रॉइंग
ग्रेड परीक्षेतील ‘अ’ श्रेणीला १० गुण, ‘ब’ श्रेणीला
६ गुण व ‘क’ श्रेणीला ४ गुण मिळून गुणवत्ता यादी तयार केली जाते.
आपली शैक्षणिक आणि आर्थिक पाश्र्वभूमी, आपलं वय आणि आपल्याजवळ उपलब्ध असलेला वेळ यावर पदविका अभ्यासक्रम करावा की पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा, ही निवड अवलंबून असते.

पदविका अभ्यासक्रम
दहावीनंतर एक वर्षांच्या फाऊंडेशन कोर्सनंतर चार वर्षांचा पदविका अभ्यासक्रम करण्यासाठी कलासंचालनालय, महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारित येणाऱ्या शिक्षणसंस्था पुढीलप्रमाणे आहेत-
* सोफिया पॉलिटेक्निक (विद्यार्थिनीसाठी राखीव) : फाऊंडेशन, जी. डी. आर्ट कमर्शिअल, टेक्स्टाइल डिझाइन.
* रहेजा स्कूल ऑफ आर्ट्स, वांद्रे : फाऊंडेशन, जी. डी. आर्ट कमर्शिअल, जी. डी. आर्ट पेंटिंग.
* मॉडेल आर्ट इन्स्टिटय़ूट, दादर : फाऊंडेशन, ए.टी.डी.
* मुंबई कला महाविद्यालय, चर्नी रोड : फाऊंडेशन.
* ठाणे स्कूल ऑफ आर्ट, ठाणे : फाऊंडेशन, इंटिरिअर डेकोरेटर्स, फाइन आर्ट.
* वसई कला निकेतन, वसई : फाऊंडेशन, कमर्शिअल आर्ट,
फाइन आर्ट.

विश्वास अजिंक्य