केन रॉबिन्सन हे जगप्रसिद्घ शिक्षणतज्ज्ञ. शिक्षणातील गुंतवणुकीबद्दल ते अशी मांडणी करतात की, मुलांच्या शिक्षणात जगभरातले पालक, सरकारही गुंतवणूक करू इच्छिते. ती वैचारिक, आर्थिक, पायाभूत सुविधा अशा अनेक प्रकारांची असते. ही गुंतवणूक भविष्यकाळासाठी असते, पण तो काळ कसा असेल, याची कोणालाच कल्पना देता येत नाही. त्यामुळेच या गुंतवणुकीमध्ये काही गोष्टी गृहीत धरल्या जातात. पण धाकधूक असतेच. रॉबिन्सन यांचा हा मुद्दा चित्रकला शिक्षणालाही लागू पडतोच. भारतीय कलापरंपरा महान आहेच. पण म्हणून आपल्या मुलांना चित्रकलेची आवड आहे, हे लक्षात येताच आपण त्यांनी हेच करिअर निवडावे, चित्रकार व्हावे, असे सहजपणे म्हणतो का? एक ठोस करिअरचा पर्याय म्हणून चित्रकलेचा विचार कधीच होत नाही. इतर शाखांत शिक्षण घेऊन मग चित्रकला सोबतीने करायची, असेच पालकांचे मत असते. केवळ चित्रकलेचे शिक्षण घ्यायचे आहे. फाइन आर्ट किंवा अप्लाइड आर्ट करायचे म्हणजे काय, त्याच्या शिक्षणाचे निश्चित स्वरूप, त्याची अंग-उपांग याबाबत नेमकी माहिती असतेच असे नाही. आपले मूल डॉक्टर, इंजिनीअर होणार हे सांगताना जी निश्चित खात्री असते, ती चित्रकलेच्या क्षेत्राविषयी सांगताना नसते. थोडक्यात, चित्रकलेचे शिक्षण घेताना केन रॉबिन्सन म्हणतात ती भविष्याबाबतची धाकधूक असते. याची कारणे काय? कलांची मोठी परंपरा असलेल्या आपल्या देशात पालक-विद्यार्थ्यांच्या मनात कलाशिक्षणाविषयक ही भावना का निर्माण झाली असावी, याचा विचार करताना काही गोष्टी लक्षात येतात. स्वातंत्र्यपूर्व काळात आपली अर्थव्यवस्था खिळखिळी झाली होती, पारंपरिक व्यवसाय, कला, उद्योग आदींशी संबंधित समाजव्यवस्था, स्थलांतर, शहरीकरण आदी कारणाने अस्तित्वात राहिली नाही. मग एकंदरीतच पारंपरिक कला शिकणे, म्हणजे उपाशी राहणे, हा समज दृढ झाला. त्यात चित्रकलाही आलीच. अर्थव्यवस्थेचा बिघडलेला गाडा, स्थलांतर यामुळे भारतीय पारंपरिक चित्रकला शहरांत स्थलांतरित झाली नाही. खरे पाहता मुंबईसारख्या शहरांत नवे, युरोपियन कलाशिक्षण सुरू झाले होते. त्यासोबत पारंपरिक कलेका एका वेगळ्या दृष्टिकोनातून शिकवणे सुरू झाले होते. पण तरीही अनिश्चितता कायम राहिली. गैरसमज वाढत गेले.

चित्रकला शिक्षणाचे स्वरूप तांत्रिक होते. त्या तंत्राचे अ‍ॅप्लिकेशन अर्थात उपयोजन मर्यादित होते. त्यामुळे पोट्रेट करून किंवा चित्रांचे प्रदर्शन करून किती पैसे मिळतात वा मिळवता येतात हे माहिती नव्हते. त्याचा अंदाजही नव्हता. त्यामुळे या शिक्षणाविषयी गैरसमज झाले. शालेय शिक्षणातही औद्योगिक क्रांतीच्या कल्पनांतून आलेला नोकरवर्ग तयार करण्यावर भर दिला जाऊ लागला. त्यामुळेच भाषा, विज्ञान आणि गणित या विषयांनाच महत्त्व आले. आपण स्वातंत्र्यानंतरही तीच व्यवस्था स्वीकारली. त्यात कलेला फारसे स्थान नव्हते. त्यामुळेच आपल्या बहुतांश विद्यार्थ्यांना वार्षिक कार्यक्रम आणि सजावटीपलीकडे चित्रकलेचे महत्त्व जाणवत नाही. म्हणूनच चित्रकलेविषयी शिक्षण, करिअर असा विचार करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित होत नाही. परिणामी, निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा आपण अंधारात असतो. त्या अनिश्चिततेतून भीती वाटते. त्याचा दोष चित्रकलेवर येतो. आपण म्हणतो, ‘चित्रकलेचे शिक्षणच नको.’ ‘आपल्याला पैसेच मिळणार नाहीत.’ ‘उपाशीच मरावे लागेल’ वगैरे वगैरे. पण हे सगळे निर्थक आहे. ते कसे, हेच आपण या सदरातून सांगणार आहोत.

LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
Infrastructure and Real Estate Sector in Mumbai
मुंबईतील पायाभूत सुविधा आणि स्थावर मालमत्ता क्षेत्र
csir recruitment 2024 job opportunities at csir job vacancies in csir
नोकरीची संधी

महेंद्र दामले

(लेखक चित्रकार, समीक्षक आहेत. तसेच रचना संसद अकादमी ऑफ फाइन आर्ट्स अँड क्राफ्ट्स, मुंबईचे प्रिन्सिपल आहेत.)