तऱ्हेतऱ्हेच्या खाद्यपदार्थाची बाजारपेठ वाढत असताना त्यासंबंधातील तंत्रज्ञानातही अद्ययावत बदल होत आहेत. त्या अनुषंगाने खाद्य तंत्रज्ञानाशी निगडित विविध क्षेत्रांमध्ये मोठय़ा संधी निर्माण होत आहेत. त्याविषयीचा आढावा-
जीवशास्त्र, रासायनिक इंजिनीअरिंग आणि जैवरसायन यांसारख्या अन्य विज्ञानशाखांप्रमाणे खाद्य तंत्रज्ञानाने आपले स्वत:चे वेगळेपण सिद्ध केले असून, विकसित केलेल्या खाद्यपदार्थावरील प्रक्रियांच्या माध्यमातून खाद्य उत्पादने तयार केली जातात. हे शास्त्र निवड, प्रक्रिया, पॅकिंग, वितरण, संरक्षण आणि सुरक्षित खाद्यपदार्थाचा वापर अशा सर्व बाबींशी निगडित आहे.
मूलभूत कौशल्ये – खाद्य तंत्रज्ञानामध्ये पूर्णवेळ करिअर करण्याची इच्छा असलेल्या व्यक्तीचे मन प्रयोगशील आणि संशोधनाला प्राधान्य देणारे असायला हवे. खाद्यपदार्थाची चव आणि सुरक्षितता याकडे त्याने सर्वाधिक लक्ष पुरवायला हवे. याखेरीज त्यांनी ग्राहकांच्या गरजा आणि मागण्या यांचा मेळ घालायला हवा. खाद्य तंत्रज्ञानामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन अपेक्षित असून त्यातून खाण्याचा आनंद मिळवून देणारे, पौष्टिक आणि दीर्घकाळ ताजे राहणारे पदार्थ तयार करण्याची कला हा आशय अभिप्रेत आहे. उत्कृष्ट फूड टेक्नॉलॉजिस्ट नेहमीच अधिकाधिक सुधारणा आणि चव याकरिता कार्यरत असतो.
करिअर संधी – गेल्या दोन दशकांमध्ये हा देशातील सर्वाधिक फायदा मिळवून देणारा उद्योग ठरला आहे. खाद्य तंत्रज्ञानाची शैक्षणिक पाश्र्वभूमी असलेल्या प्रशिक्षित अधिकाऱ्यांसाठी रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. खाद्य तंत्रज्ञान हे प्रामुख्याने केवळ ‘रेडी टू इट’ असे नाश्ता प्रकार तयार करण्याशी संबंधित आहे, असा लोकप्रिय गैरसमज आहे. खरे तर गहू, तांदूळ, साखर, तेल आणि डाळी यांच्याशी निगडित उत्पादनांवर प्रक्रिया करून खाण्यास योग्य स्वरूप देणे एवढय़ापुरता मर्यादित आहे. मॉल संस्कृतीने खाद्य तंत्रज्ञानाचे महत्त्व ओळखले असून अनेक बेकरी उत्पादने, डेअरी उत्पादने, ब्रेकफास्ट फूड, मांस आणि मासे उत्पादने, फळे आणि भाज्या उत्पादने इ. यामध्ये खाद्य तंत्रज्ञानाचा वापर मोठय़ा प्रमाणावर केला जातो. प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थाना भारतात उज्जवल भवितव्य आहे, असे या ट्रेण्डवरून दिसून येते. अभ्यासक्रम – फूड टेक्नोलॉजीमध्ये पदविका, फूड टेक्नोलॉजीमध्ये बी. एस्सी., बी. टेक्. (फूड टेक्नोलॉजी), एम. एस्सी. फूड टेक्नोलॉजी, एम. टेक्. (फूड टेक्नोलॉजी)
पात्रता – फूड टेक्नोलॉजीमधील पदविका अभ्यासक्रम १०+२ (वैद्यकीय/बिगर वैद्यकीय) करता येतो. हा दीड वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम १०+२ मध्ये ५० टक्के कट ऑफमध्ये होतो. फूड टेक्नोलॉजीमधील बी.एस्सी. आणि बी.टेक्. अभ्यासक्रमांकरिता विज्ञान शाखेतील १०+२ अशा मुलांना प्रवेश मिळतो. ज्यांचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे ते बी. टेक्.च्या दुसऱ्या वर्षांला नंतर प्रवेश घेऊ शकतात. ‘मास्टर्स इन फूड टेक्नोलॉजी’ हा पदवीनंतरचा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम आहे. पदविका अभ्यासक्रम दीड ते दोन वर्षांचा आहे. बॅचलर अभ्यासक्रमाचा कालावधी तीन वर्षे असून बी.एस्सी. आणि बी.टेक्.करिता अनुक्रमे चार वर्षांचा कालावधी आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रम हा दोन वर्षांचा आहे.
करिअर संधी – खाद्य तंत्रज्ञान क्षेत्रातील करिअर चांगला मोबदला मिळवून देणारे असून व्यावसायिक वाढीच्या अनेक संधी यात उपलब्ध होतात. खाद्य तंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यार्थी पुढील महत्त्वपूर्ण व्यवसायांची निवड करू शकतात-
कंपन्यांसमवेत संशोधन, हॉटेल उद्योग, फूड क्वालिटी कंट्रोल एजन्सी, पॅकेज्ड फूड इंडस्ट्री, पेय आणि शीतपेये उद्योग, मद्यार्क काढणारी कंपनी, कृषी-निर्यात युनिट्स.    
वेतन – पात्रता, तांत्रिक कौशल्य, व्यावसायिक अनुभव हे या क्षेत्रात मोबदला मिळण्यातील महत्त्वपूर्ण घटक आहेत. अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांचा प्रवेश झाल्याने वेतन पूर्वी कधी नव्हते इतके वाढले आहेत. बी.एस्सी. पदवी मिळवलेला पदवीधर आता सरासरी दर महिन्याला आठ हजार रु. ते १२ हजार रु. इतके वेतन मिळवू शकतो. तर बी. टेक्. पदवीधारक महिन्याकाठी २० हजार ते २५ हजार रु. कमावू शकतो. कामाचा अनुभव असणाऱ्या व्यक्ती आपल्या अनुभवानुसार दर महिन्याला २५ हजार रु. ते ७५ हजार रु. प्रमाणे कमवू शकतात. वरिष्ठ व्यवस्थापकीय स्तरावर काम करणाऱ्यांना अन्य क्षेत्रातील लोकांपेक्षा अधिक वेतन मिळते.

खाद्यपदार्थाची बाजारपेठ दिवसेंदिवस विस्तारत असताना खाद्य तंत्रज्ञानाशी संबंधित उद्योगालाही सुगीचे दिवस आले आहेत, याचा लाभ युवावर्गाने करून घ्यायला हवा.

  -डॉ. मोनिका गुलाटी
 अधिष्ठाता, लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी