करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळे प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना सतावत असतात. तुमच्या प्रातिनिधिक आणि निवडक प्रश्नांची उत्तरे देणारे व्यासपीठ सुरू करीत आहोत- करिअर मंत्र.  अभ्यासक्रमांसंदर्भातील तुमच्या शंका आम्हाला निश्चित कळवा. तुमचे प्रश्न, शंका आम्हाला career.vruttant@expressindia.com  या पत्त्यावर जरूर कळवा अथवा करिअर वृत्तान्त, लोकसत्ता, संपादकीय विभाग, ईएल-१३८, टीटीसी इंडस्ट्रिअल एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१० या पत्त्यावर लिहून पाठवा.
* मला इंग्रजी वाङ्मयामध्ये रस आहे. बारावीनंतर इंग्रजी भाषेमध्ये पदवी अभ्यासक्रम करावयाचा आहे. मात्र या विषयामध्ये उत्तम करिअर करता येणार नाही, असे घरचे म्हणतात. आपला सल्ला काय राहील?
– सुषमा जोशी, डोंबिवली.
सर्वप्रथम मी तुझं अभिनंदन करतो. कारण आजच्या काळात एखाद्या भाषेचा अभ्यास करावा वाटणं हे कौतुकास्पद ठरतं. आपल्या पारंपरिक विचारसरणीत भाषेचा अभ्यास हा करिअरसाठी दुय्यम श्रेणीचा ठरतो, असं पालकांना वाटतं. त्यामुळे भाषेच्या अभ्यासक्रमाकडे जाणीवपूवर्क आणि आनंदाने फार कमी पालक आपल्या मुलांना पाठवतात, असं दिसून येतं. त्यामुळे विविध भाषांमधील चांगले शिक्षक, भाषातज्ज्ञ, प्राध्यापक, लेखक, भाषांतरकार यांची चणचण निर्माण झाली आहे. त्यामुळे तुला इंग्रजीचा अभ्यास मनापासून करावासा वाटत असल्यास तो नक्कीच कर. पदवीनंतर पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि पुढे पीएचडी करायला हरकत नाही. मात्र एकदा का हा अभ्यासक्रम करण्याचा निर्णय घेतल्यावर मग पुढे द्विधा अवस्था ठेवायची नाही. अरे, आपलं चुकलं असं वाटून घ्यायचं नाही. कारण तसं वाटत राहिलं तर अध्र्या मनाने इंग्रजीवर प्रभुत्व मिळवणं अशक्यच. राहिला मुद्दा करिअरचा, तर इंग्रजीवर उत्तम प्रभुत्व मिळवल्यास, इंग्रजीतील म्हणीप्रमाणेच ‘स्काय इज द लिमिट’ अशी स्थिती सध्या तरी दिसून येते आहे.

* माझा मुलगा दहावीत आहे. त्याला राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेद्वारे अधिकारी व्हायचे आहे. त्याने या परीक्षेचा अभ्यास कधीपासून करायला हवा?
– विजय कांबळे, औरंगाबाद.
राज्य लोकसेवा आयोगाच्या अधिकारी पदाच्या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये गेल्या काही वर्षांत बराच बदल झालेला आहे. मुलांच्या सर्वागीण बुद्धिमत्तेची चाचणी या परीक्षेद्वारे केली जाते. या परीक्षेसाठी  पदवी परीक्षा उत्तीर्ण केल्यावर बसता येत असलं तरी, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी भाषा (इंग्रजी/मराठी), कार्यकारणभाव, बुद्धिमत्ता चाचणी यासारख्या विषयांची तयारी ही दहावीपासूनच हळूहळू केली तर त्याचा निश्चित फायदा होऊ शकतो. कारण या विषयांचा अभ्यास हा काही महिन्यांत करता येण्यासारखा नाही. बहुतेक मुले असंच करतात आणि त्यांना अपयशाचे धनी व्हावं लागतं. या परीक्षेद्वारे दरवर्षी साधारणत: ५०० ते ६०० मुलांची निवड विविध पदांसाठी केली जाते. मात्र त्यासाठी दोन लाखांहून अधिक मुलं बसतात. ही एकच बाब लक्षात ठेवली तरी तयारी किती करावी लागेल, हे पालकांच्याआणि विद्यार्थ्यांच्या लक्षात यायला हरकत नाही.

former Vice President M Venkaiah Naidu criticises freebies trend
पक्ष बदलला की जुन्या नेत्यांना शिव्या देणं चुकीचं: माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंची टीका
Uddhav Thackeray, Mahayuti, campaign,
उद्धव ठाकरे यांना आयतेच कोलीत
raju shetty allegations against dhairyasheel mane over development work
खासदारांचे विकासकामात गौडबंगाल, इतरांची कामे आपल्या नावावर खपवली; राजू शेट्टी यांचा धैर्यशील माने यांच्यावर आरोप
fraud in recruitment exam of Mahanirmiti case against four including two candidates
महानिर्मितीच्या भरती परीक्षेत गैरप्रकार, दोन उमेदवारांसह चौघांविरोधात गुन्हा

* नागपूर येथे असलेले विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश कसा मिळेल?
– मोहन वरखेडे, वाशिम.
आपल्या देशातील टॉपच्या अभियांत्रिकी संस्थांमध्ये विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीचा समावेश होतो. या संस्थेत पदवी स्तरावरील ७०० जागा आहेत. यापकी ३५० जागा या महाराष्ट्रातील मुलांसाठी आहेत. या सर्व जागा पूर्वी एआयट्रिपलई म्हणजेच ऑल इंडिया इंजिनीअिरग एन्ट्रन्स एक्झामिनेशन या देशपातळीवरील प्रवेश परीक्षेद्वारे भरल्या जात. गेल्या  वर्षांपासून जॉइंट एन्ट्रन्स टेस्ट- मेन या परीक्षेद्वारे या जागा भरल्या जातात. ही परीक्षा आयआयटीच्या विविध कॅम्पसमधील निवडीसाठीची प्राथमिक किंवा पूर्वपरीक्षा आहे. (जॉइंट एन्ट्रन्स टेस्ट- मेनमधून पहिल्या २० टक्के विद्यार्थ्यांना जॉइंट एन्ट्रन्स टेस्ट- अ‍ॅडव्हान्स्ड ही परीक्षा देता येते. त्यामध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळतो.) नागपूरच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीसोबतच देशातील इतर भागांतील २५ एनआयटीमधील प्रवेशासाठी केवळ कारण जॉइंट एन्ट्रन्स टेस्ट- मेनमधील स्कोअर आणि बारावीमधील गुण ग्राह्य धरले जातात. नागपूर एनआयटीचे महत्त्व हे आयआयटीसारखेच असल्याने या संस्थेत प्रवेश मिळण्यासाठी अधिक स्पर्धा असते. जॉइंट एन्ट्रन्स टेस्ट- मेनमध्ये तुमचा गुणानुक्रमांक जितका वरचा (एक ते हजार) तितकी अधिक संधी मिळू शकते, हे लक्षात ठेवावे.

* मला वृत्तपत्र पत्रकारिता करायची आहे, त्यासाठी काय करावे लागेल? सध्या मी बीए अंतिम वर्षांला आहे.
– कुणाल गुरव, िपपरी चिंचवड.
अभिनंदन. करिअरची दिशा पक्की झाली की मग योग्य मार्गाने जाणे सोपे जाते. पत्रकार होण्यासाठी निश्चितच काही पात्रता लागते. ज्या भाषेतील वृत्तपत्रात पत्रकारिता आहे, त्यासाठी त्या भाषेवर प्रभुत्व असावे लागते. साहित्य, अर्थशास्त्र, इतिहास, राजकारण, समाजकारण, कला, भूगोल, राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय घडामोडी यांमध्ये गती हवी. सतत घडणाऱ्या घटना घडामोडींचा मागोवा घेऊन त्यावर विश्लेषण करता यायला हवे. स्वत:ची भाषाशैली हवी, तात्काळ लिहिता यायला हवं. थोडक्यात पत्रकारिता हे फार परिश्रमाचं करिअर आहे. तुम्हाला पत्रकार म्हणून उमेदवारी सुरू करावी लागते. त्यात तुम्ही जितक्या गतीने स्पार्क दाखवाल, तितक्या गतीने तुम्हास वरच्या पातळीवर पोहोचता येऊ शकतं. पत्रकारितेत येण्यासाठी पत्रकारिता किंवा मास मीडिया किंवा मास कम्युनिकेशनचा पदवी अभ्यासक्रम केल्यास उत्तम. या अभ्यासक्रमांना बारावीनंतर थेट प्रवेश मिळू शकतो. सध्या असे बरेच अभ्यासक्रम विविध ठिकाणी उपलब्ध आहेत. तू सध्या बीए अंतिम वर्षांला असल्याने मास मीडिआ किंवा मास कम्युनिकेशन या विषयातील पदव्युत्तर पदविका किंवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घ्यावा. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विविध वृत्तपत्रांच्या संपादकीय विभागासाठी आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळासाठी जाहिराती प्रसिद्ध होत असतात, त्यानुसार अर्ज करावा.

* मी बीटेक् इलेक्ट्रॉनिक्समध्ये अंतिम वर्षांला आहे. बीटेक्नंतर एमबीए करणे अधिक चांगले की एमटेक् करणे चांगले?
– मनोज वानखेडे, कल्याण.
आपल्याला नेमकी आवड कशामध्ये आहे, यावर याचा निर्णय ठरू शकतो. एमबीएला प्रवेश घेतल्यावर चार र्वषपर्यंत जे तंत्रशिक्षण घेतले त्यापासून एकदम यू टर्न घेतो. शिवाय या धरसोडीतून एमबीए केल्यावर करिअरची उत्तम संधी मिळू शकेलच, असेही नाही. एमबीए अभ्यासक्रमासाठी सध्या प्रवेश मिळणं सोपं झालं आहे. मात्र चांगल्या आणि दर्जेदार संस्थेत प्रवेश मिळाल्यावरही चांगली प्लेसमेंट मिळेलच, याबद्दल खात्री देता येत नाही. एमटेक् करण्याचा एक फायदा असा राहू शकतो की, आतापर्यंत जे तंत्रशिक्षण घेतले त्यात सातत्य राहून अधिक प्रगत ज्ञान प्राप्त करता येते. पीएच.डीसाठीही नोंदणी करता येते. आतापर्यंत शिकलेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष उपयोग करता येणं शक्य होऊ शकतं.

* इंटिग्रेटेड अभ्यासक्रम म्हणजे नेमके काय?
– सचिन काळे, बोरिवली.
– इंटिग्रेटेड अभ्यासक्रमांची संकल्पना गेल्या काही वर्षांत चांगली विकसित झाली आहे. याचा सोपा अर्थ असा की एखाद्या विषयात तुम्हाला सुरुवात ते शेवट (स्टार्ट टू फिनिश) असा अभ्यासक्रम करावयाचा असेल तर हे इंटिग्रेटेड अभ्यासक्रम तशी संधी उपलब्ध करून देतात. म्हणजेच बारावीनंतर तुम्हाला थेट पदव्युत्तर पदवीपर्यंत अभ्यासक्रम करता येतो. पदवी प्राप्त केल्यावर पुन्हा पदव्युत्तर पदवी प्रवेशासाठी इतरत्र धावाधाव करण्याची गरज भासत नाही. पाच र्वष कालावधीच्या इंटिग्रेटेड अभ्यासक्रमांना बारावीनंतर प्रवेश घेता येतो. पदव्युत्तर पदवी ते पीएच.डी या इंटिग्रेटेड अभ्यासक्रमांना पदवी परीक्षा उत्तीर्ण केल्यावर प्रवेश मिळू शकतो. बारावीनंतरच्या या इंटिग्रेटेड अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना तीन वर्षांनंतर म्हणजे पदवीपर्यंतचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर, इच्छा असल्यास बाजूला होण्याची सुविधा काही संस्थांमध्ये असते. मात्र काही संस्थांमध्ये एकदा प्रवेश घेतल्यावर पूर्ण कालावधीचा अभ्यासक्रम करावा लागतो.     
career.vruttant@expressindia.com