|| डॉ. श्रीराम गीत

मी नुकतीच इग्नूमधून एमए क्लिनिकल सायकॉलॉजी पूर्ण केले आहे. मला संबंधित विषयात पीएचडी करायची आहे. सध्या माझे वय ४३ आहे. मी काय करावे?  – अर्चना मेटकर

आपल्याला प्रथम एमफिल पूर्ण करावे लागेल. त्यानंतर डॉक्टरेटचा रस्ता सुरू होतो. एमफिलमध्ये संशोधनाच्या पद्धती व विषयाचा आवाका याचा अंदाज शिकावा लागतो. काही विद्यापीठे थेट पीएचडीची प्रवेशपरीक्षा घेतात. त्यानंतर गाइडची निवड, विषयाची निवड आणि अभ्यास यात किमान चार वर्षे जातात.

सध्या या साऱ्याचा खर्च अंदाजे दोन लाख रुपयांच्या आसपास राहतो. मूळ मुद्दा वेगळाच आहे. केवळ इच्छा म्हणून डॉक्टरेट करायची असेल तर प्रश्नच नाही. मात्र या पदवीचा आपणाला नक्की कशा प्रकारे उपयोग होणार आहे, याचाही विचार व्हावा. डॉक्टरेट ही केवळ एक पदवी नसते तर तो संशोधन शिकण्याचा रस्ता असतो, हे ध्यानात घ्यावे. सध्या आपण कोणते काम करत आहात, त्याचा उल्लेख नाही. ते काम जर मानसशास्त्राशी निगडित असेल तर या पदवीचा उपयोग नक्की होऊ शकेल.

माझी मुलगी दहावीत आहे. तिला पुढे आर्किटेक्चर करायचे आहे. त्या क्षेत्राबद्दल माहिती देऊ शकाल का?  – संगीता अडसूळ

सध्या आर्किटेक्चरसाठीची पहिली किमान पात्रता म्हणजे गणित आणि इंग्रजी घेऊन बारावी उत्तीर्ण होणे. त्यानंतर नाटाची प्रवेशपरीक्षा द्यावी लागते. ती बारावीच्या परीक्षेनंतर होते. बारावीचे गुण आणि नाटाचे गुण एकत्रित धरून संपूर्ण राज्याची प्रवेशयादी बनते. त्याद्वारे प्रवेश मिळतो. या क्षेत्रात उमेदवारीचा काळ मोठा राहतो. टिपिकल नोकऱ्या फारशा नाहीत, व्यवसायाची जरूर संधी असते. बांधकामाचे आरेखन, सजावट, लँडस्केपिंग अशा विविध प्रकारांत कामे असतात. आपण आर्किटेक्ट झालेल्या आणि वयोगट साधारण २३-२६ असलेल्या कोणत्याही एखाद्या मुलीला आपल्या कन्येसोबत भेटावे. तिच्याकडून समग्र माहिती घ्यावी. त्यामुळे अगदी या घडीला या क्षेत्रात काय चालू आहे, याचा अंदाज येईल. मुलीची दहावी ते बारावी अशा येत्या दोन वर्षांत आपणाला किमान २-३ आर्किटेक्ट मुली तर नक्कीच भेटू शकतील!

माझी मुलगी बारावी शास्त्र शाखेत शिकत आहे. तिला बायोटेक्नॉलॉजीमध्ये करिअर करण्याची व शिक्षण घेण्याची इच्छा आहे. कृपया मार्गदर्शन करावे.  – कविता खेडकर

बायोटेक्नॉलॉजी, जेनेटिक्स, इ. विषय अतिशय आकर्षक वाटतात, पण तितकेच क्लिष्टही असतात, हे ध्यानात घ्यायला हवे. या विषयांत करिअर करण्यासाठी किमान पीएचडीपर्यंतचा रस्ता पूर्ण करावा लागेल. तो निर्णय घेणे व त्यासाठीची चिकाटी याचा प्रथम विचार करावा. थोडक्यात बारावीनंतर किमान बारा वर्षांनी बायोटेकमध्ये करिअर सुरू होते. त्यासाठी फारच क्वचित चांगल्या संधी आहेत, हे मुद्दाम नोंदवीत आहे.