03 March 2021

News Flash

करिअरचे नियोजन

करिअर प्लॅनिंग हा खूप संवेदनशील विषय आहे. खूपदा घरातील वडीलधाऱ्या माणसांच्या अतृप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी घरातील विद्यार्थीवर्गावर अथवा युवावर्गावर एक विशिष्ट प्रकारचे करिअर लादले जाते

| April 29, 2013 12:05 pm

करिअर प्लॅनिंग हा खूप संवेदनशील विषय आहे. खूपदा घरातील वडीलधाऱ्या माणसांच्या अतृप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी घरातील विद्यार्थीवर्गावर अथवा युवावर्गावर एक विशिष्ट प्रकारचे करिअर लादले जाते किंवा कधी कधी क्षणिक लाभांना महत्त्व देऊन आणि भविष्यातील संधींना, आव्हानांना नजरेआड करून आपल्याकडूनच चुकीचे करिअर निवडले जाते. बरेचजण करिअरबद्दल खूप धरसोड वृत्ती दाखवतात. हे सर्व टाळण्यासाठी खालील गोष्टी आचरणात आणा-

०     शक्यतो आवडत्या विषयातीलच करिअर निवडावे. यामुळे करिअर एक नीरस कंटाळवाणी गोष्ट न राहता, जीवनाचे एक ध्येय बनते.

०     संयम – सबुरी : एका विचारवंताचे सुरेख वचन आहे- यशाची राईस प्लेट रेडिमेड मिळत नाही, यश शिजत ठेवावं लागतं; परिस्थितीच्या धगीनं, महत्त्वाकांक्षेच्या इंधनाने. यश उकळत ठेवावं लागतं. याचाच अर्थ करिअर घडवताना उतावीळपणा चालत नाही. संयम ठेवून, परिश्रम करूनच करिअर घडवता येते.

०     अनोखे क्षेत्र : ज्या क्षेत्रात कोणीही पाय ठेवण्यास धजावत नाही, त्या क्षेत्रात आपण करिअर घडविण्याचे धाडस दाखवावे. अनोळखी क्षेत्रात पहिल्यांदा पाऊल ठेवून यशस्वी झाल्यास त्या क्षेत्राशी आपले नाव कायमचे जोडले जाते. उदा. दादासाहेब फाळकेंचे चित्रपटनिर्मितीमधील करिअर.

०     आपण ज्या क्षेत्रात करिअर करत असाल त्या क्षेत्रातील बुजुर्ग, जाणकार लोकांबरोबर किंवा संस्थांबरोबर संधान बांधा. त्यामुळे करिअरमधील नवनवीन पर्यायांबद्दल माहिती तर मिळतेच, पण सोबत करिअर घडविण्यासाठी आवश्यक मार्गदर्शनही मिळते.

०     करिअरबद्दल प्लॅन आखणे : हे आपले वार्षिक काम असू द्या. सरत्या वर्षांत आपण करिअरमध्ये योग्य मार्गक्रमणा केली का, हे तपासा. त्याचबरोबर येणाऱ्या नवीन वर्षांत करिअरचा कोणता टप्पा गाठायचा आहे, ते ठरवा. जर वर्तमान करिअर आपल्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे नसेल तर नवीन करिअरचा मार्ग घ्यावा का, हेही ठरवा. थोडक्यात काय तर करिअरबद्दल सतत विचारमंथन चालू ठेवा.

०     कधी कधी आपल्या वर्तमान करिअरमध्ये वापरली जाणारी कौशल्यं, ज्ञान, तंत्रज्ञान नजीकच्या काळात कालबाह्य़ ठरण्याची शक्यता असते, तेव्हा वेळीच नवीन कौशल्य, ज्ञान, तंत्रज्ञान आत्मसात करून वर्तमान करिअरला पूरक असणाऱ्या दुसऱ्या करिअरमध्ये पाय रोवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे आपल्या करिअरला वेळेआधीच मिळणारा पूर्णविराम टळू शकतो.

०     करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी लागणारे अभ्यासक्रम शिका, प्रशिक्षण घ्या, त्या संदर्भात असणाऱ्या परीक्षा द्या. यामुळे करिअरमधील रस टिकून राहातो.

०     कधी कधी आर्थिक किंवा भावनिक गरजा बदलल्यामुळे वर्तमान करिअरमधील रस निघून जातो. अशा वेळी नाइलाजाने करिअरचा ट्रॅक बदलावा लागतो. अशा द्विधा मन:स्थितीसाठी तयार राहा. उदा. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्याने आंतरराष्ट्रीय फिरतीशी निगडित यशस्वी करिअर अडचण वाटू लागते. अशा वेळी सूज्ञपणे करिअरचा ट्रॅक बदलावा.

०     करिअर असे निवडा, ज्यात आपली आवड व अर्थार्जन यांचा सुवर्णमध्य गाठला जाईल. कारण पैशाचे जसे सोंग आणता येत नाही, त्याचप्रमाणे कामातून मिळणारे समाधानही ओढूनताणून आणता येत नाही.

०     कधी कधी करिअरमध्ये आवड व अर्थार्जन यांचा ताळमेळ जुळून येणे अशक्य असते, तेव्हा शक्य असल्यास दोन करिअरमध्ये समांतर वाटचाल करण्याचा प्रयत्न करून पाहावा. उदा. सोम. ते शुक्र अर्थाजनासाठी काम करावे तर शनिवार – रविवार आवडीच्या क्षेत्रात स्वत:ला झोकून द्यावे.

०     मुख्य म्हणजे कारकीर्द घडवताना नुसते भौतिक सुखांच्या पाठी न लागता, मानवी मूल्यांचीही जपणूक करा. आपल्या पश्चातही लोकांना आपली कारकीर्द लक्षात राहावी, असे वाटत असेल तर दुसऱ्यांच्या करिअरचे नुकसान न करता आपले करिअर पुढे न्यावे. जमल्यास स्वत:सोबत इतरांचे करिअरही आकार घेईल, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करा.

०     मुख्य म्हणजे आपल्या करिअरबद्दलचे निर्णय आपणच घ्यावेत. इतरांना त्यात लुडबूड करावयास देऊ नये.

मॅरेथॉन जिंकणारा धावपटू त्याच्या धावण्याचा वेग सतत बदलत असतो. आघाडी घेण्यासाठी कधी जोरात तर कधी दम राखून ठेवण्यासाठी धीम्या रीतीने करिअर घडवतानाही असाच विवेक बाळगणे आवश्यक आहे. कधी मिळालेल्या संधीचा सर्वप्रथम फायदा घेण्यासाठी करिअर टॉप गीअरमध्ये टाकावे लागते तर कधी कौटुंबिक जबाबदाऱ्यांसाठी करिअर पहिल्या किंवा न्युट्रल गीअरमध्येही टाकावे लागते. आपण जर हे करू शकलात तर करिअरचे एव्हरेस्ट चढताना दमछाकही होणार नाही व आपण योग्य वेळेत शिखरावरही विराजमान व्हाल. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 29, 2013 12:05 pm

Web Title: career planning
Next Stories
1 नम्रता
2 भारतीय कर्मचारी करतात अधिक तास काम!
3 भारताचे एडिसन डॉ. शंकर आबाजी भिसे
Just Now!
X