मी वाणिज्य शाखेत पदवी प्राप्त केली आहे. नेट-सेट देता येईल का? अर्जपद्धती, अभ्यासक्रम याविषयी माहिती हवी होती तसेच पीएच.डी करण्याची प्रक्रिया सांगाल का?
– गौरव पाटील
 आपण नेट-सेट देऊ शकता. नेट परीक्षेच्या संदर्भातील सविस्तर माहिती आपल्याला http://www.ugcnetonlin आणि सेट परीक्षेच्या संदर्भातील माहिती setexam.unipune.ac.in या संकेतस्थळावर मिळू शकते.
पीएचडीसाठी नाव नोंदवण्यासाठी आधी आपणास पदव्युत्तर पदवी घ्यावी लागेल. त्यानंतर आपणास पीएचडीसाठी विषय निवडावा लागेल.

मी सध्या एम. ए. करतोय. मला बी.ए.ला अर्थशास्त्रात प्रथम श्रेणी मिळाली आहे. टॅली ईआरपी ९ हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. मी एमपीएससी परीक्षांचा अभ्यास करत असून सोबतच एका कंपनीत अकाऊंटंट म्हणून गेल्या १५ महिन्यांपासून काम  करत आहे. बँकिंगचा अभ्यासक्रम करावा की एमपीएससीचा अभ्यास करावा याविषयी  द्विधा मन:स्थिती निर्माण झाली आहे..
– भाग्यश्री गंथाडे
  एमपीएससी आणि बँकिंग या दोन्हींचा अभ्यास पूर्णपणे भिन्न असतो. आपल्याला प्रशासकीय सेवेत जायचे आहे की बँकिंग क्षेत्रात जायचे आहे, हे सर्वप्रथम निश्चित करावे. अन्यथा ‘ना घर का ना घाट का’ अशी स्थिती होऊ शकते. दोन्ही क्षेत्रांतील प्रवेशासाठी स्पर्धा असल्याने यांतील एकाच बाबीवर लक्ष केंद्रित केल्यास यश मिळण्याची शक्यता अधिक आहे. शैक्षणिक कारकीर्दीवरून आपल्याला अर्थशास्त्रात गती आहे हे कळते. अर्थशास्त्र आणि अकाऊंटन्सीची आवड असेल आणि अकाऊंटंट म्हणून जी नोकरी करत आहात त्यात आनंद मिळत असेल तर या क्षेत्रातही उत्तम करिअर करता येणे शक्य आहे.

मुक्त विद्यापीठाची परीक्षा देऊन पदवी पूर्ण केलेला, आठवी नापास विद्यार्थी एमपीएससी देऊ शकतो का?
-सुरज नगारे
होय. अशा विद्यार्थ्यांला एमपीएससीची परीक्षा देता येईल.
 
मी आता बीएस्सीच्या दुसऱ्या वर्षांला आहे. मला  गणित विषयात गती आहे. गणितात बीएस्सी केल्यावर कुठल्या संधी उपलब्ध होतात?
– संदीप शहा
 बीएस्सीनंतर गणितात एमएस्सी करावे. पीएच.डीसुद्धा करण्यास हरकत नाही. सांख्यिकी विषयातही आपण पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम करू शकता. गणिततज्ज्ञांना किंवा सांख्यिकीतज्ज्ञांना नेहमीच चांगली मागणी असते. विविध स्पर्धा परीक्षांमध्येही गणितावर आधारित बरेच प्रश्न विचारले जातात. स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या मुलांची गणिताची तयारी करून घेण्याच्या दृष्टीने तुम्ही मार्गदर्शनही करू शकाल.

मी डी.एड्. केले आहे आणि मराठी विषय घेऊन एम.ए. केले आहे. मला सरकारी नोकरीच्या संधी सुचवा.
– शंकर टोम्पे
एमपीएससीमार्फत राजपत्रित अधिकारी आणि कारकून/ साहाय्यक अशा पदांसाठी नियमितपणे स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. याद्वारे आपण राज्य सरकारच्या नोकरीत येऊ शकाल. केंद्र सरकारी नोकरी संपादन करण्यासाठी आपण यूपीएससीमार्फत घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षा देऊ शकता.
 
मी व्हीजेटीआयमध्ये टेक्स्टाइल इंजिनीअिरग शिकत असून पहिल्या वर्षी मला ड्रॉप मिळाला आहे. मला एमपीएससी करायचे आहे. त्यासाठी मुक्त विद्यापीठाच्या अंतर्गत मी राजश्री शाहू महाविद्यालयात बीएमध्ये प्रवेश घेतला आहे. मी अभियांत्रिकी करावे की एमपीएससी करावे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे..
                                            – ओमप्रकाश काळे
 व्हीजेटीआयसारख्या दर्जेदार संस्थेमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर खरे तर आपल्याला असा संभ्रम निर्माण होण्याची गरज नाही. अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर आपल्याला करिअरच्या चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात. आपला कल अभियांत्रिकी शिक्षण घेण्याकडे खरोखरच नसेल तर आपण एमपीएससी परीक्षा द्यायला हरकत नाही. मात्र त्यासाठी आपण पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. एमपीएससी परीक्षेची काठिण्यपातळी अधिक असते. प्राथमिक, मुख्य परीक्षा आणि त्यानंतर मुलाखत अशा तीन टप्प्प्यांत ही परीक्षा घेतली जाते. साधारणत: वर्षभर ही प्रक्रिया सुरू राहते. कित्येक लाख उमेदवार ही परीक्षा देतात. त्यातून अवघ्या काही हजार उमेदवारांची विविध संवर्गातील पदांसाठी निवड केली जाते. यावरून या परीक्षेसाठी असणारी तीव्र स्पर्धा लक्षात यावी. ही बाब जरूर लक्षात ठेवावी.
 
मी केमिकल इंजिनीअरिंगच्या पदविकेच्या तिसऱ्या वर्षांला आहे. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने पुढे  उच्च शिक्षण घेऊ की नोकरी करू असा संभ्रम पडला आहे.
– विठ्ठल बचकर
केमिकल इंजिनीअिरगमधील पदवी अभ्यासक्रम केल्यास अधिक चांगल्या करिअरची संधी मिळू शकते. आतापर्यंत आपण शिष्यवृत्तीने वा फी सवलत योजनांच्या मदतीने अभ्यासक्रम पूर्ण केला असल्यास पदवी अभ्यासक्रमांसाठीही अशा योजनांचा लाभ मिळू शकतो. सलग अभ्यासक्रम पूर्ण केल्यास त्याचा फायदाच होऊ शकतो. मात्र आपल्याला नोकरीची आत्यंतिक गरज असेल आणि लगेच मिळत असेल तर स्वीकारण्यास हरकत नाही. अनुभव, प्रामाणिकपणा आणि परिश्रम यांच्या बळावर प्रगतीच्या संधी हळूहळू का होईना, मिळू शकतात.
 
मी बीटेक्च्या बायोइन्फम्रेटिक्सच्या दुसऱ्या वर्गाला आहे. मला पहिल्या वर्षांला विशेष श्रेणी मिळाली आहे. बीटेक्नंतर मी पुढे एमटेक् करावे की एमबीए?
– प्रणाली चौधरी
एमटेक् आणि एमबीए या दोन वेगवेगळ्या विद्याशाखा आहेत. व्यवस्थापन क्षेत्रात करिअर करायचे मनात असेल तर एमबीए अवश्य करावे. नामवंत संस्थेतीलच एमबीए उमेदवारांना करिअरच्या उत्तमोत्तम संधी मिळू शकतात. अन्यथा पश्चात्ताप करण्याची वेळ ओढवू शकते. एमटेक् केल्यास आपण गेली तीन वष्रे जो विषय शिकत आहात त्यात अधिक सखोलता प्राप्त करू शकाल. त्याचा लाभ संशोधन, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, अध्यापन क्षेत्र अशा क्षेत्रांमधील करिअरसाठी होऊ शकतो.
 
मी १९९६ साली शालान्त परीक्षा ४६ टक्के गुणांनी उत्तीर्ण झालो. माझे सध्याचे वय ३३ आहे. मला मुक्त विद्यापीठामधून पुढील शिक्षण घेता येईल का? मला उच्च शिक्षण घेण्यात रस निर्माण झाला आहे.
– संतोष  पाटील
 तुम्हांला या वयातही शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा असल्याचे समजून अतिशय आनंद झाला. तुम्हांला इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (संकेतस्थळ- http://www.ignou.ac.in) किंवा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे (संकेतस्थळ- http://www.ycmou.ac.in) अभ्यासक्रम पूर्ण करता येतील. तुम्ही अगदी एमबीएसुद्धा करू शकाल. तुमचा आतापर्यंतचा अनुभव आणि भविष्यात मिळवणाऱ्या शैक्षणिक अर्हता याद्वारे करिअरच्या चांगल्या संधी मिळू शकतात.
 
मी बीए (मानसशास्त्र) केले आहे. या अर्हतेवर आधारित नोकरी मिळू शकेल का? फॉरेन्सिक सायकॉलॉजीबद्दल माहिती सांगा.
– रामेश्वर पवार
 यूपीएससी आणि एमपीएससीच्या राजपत्रित पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी किमान शैक्षणिक अर्हता ही कोणत्याही विषयातील पदवी आहे. त्यामुळे या परीक्षा देऊन तुम्ही शासकीय सेवेमध्ये येऊ शकता.
फॉरेन्सिक सायकॉलॉजी या विषयातील तज्ज्ञ गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांना साहाय्य करू शकतात. या तज्ज्ञांची सेवा न्यायालये, रुग्णालये, मानसोपचार व सल्ला केंद्रे यांनाही लागते. पुणे विद्यापीठाने पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन क्रिमिनल अॅण्ड फॉरेन्सिक सायकॉलॉजी हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. सायकॉलॉजीतील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. विद्यार्थ्यांची निवड मुलाखतीद्वारे केली जाते.

मी टिळक महाराष्ट्र विद्यापीठात कला शाखेच्या दुसऱ्या वर्गात शिकत आहे. याआधी मी विज्ञान शाखेत
प्रवेश घेतला होता. पण  दोनदा प्रयत्न करूनही माझे रसायनशास्त्र आणि गणित हे विषय सुटले नाहीत.
बारावी होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना बी.ए. समाजशास्त्रात पदवी घेण्यासाठी या विद्यापीठाची प्रवेश चाचणी परीक्षा उत्तीर्ण होऊन मला प्रवेश मिळाला आहे. अशा प्रकारे बीए झाल्यावर मला करिअरच्या कोणत्या संधी मिळू शकतात?
– प्रथमेश  कुलकर्णी
 बीए- समाजशास्त्राची पदवी प्राप्त केल्यानंतर तुम्हाला राज्य सेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या राजपत्रित अधिकारी पदासाठीच्या परीक्षा देऊ शकाल. समाजशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी घेऊन पीएच.डी
केल्यास महाविद्यालयीन आणि विद्यापीठ पातळीवरील अध्यापन क्षेत्रातही करिअर करता येऊ शकेल. भाषेवर प्रभुत्व असल्यास मुद्रित माध्यमे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये करिअरच्या
संधी उपलब्ध होऊ शकतात. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनाही समाजशास्त्र विषयातील पदवी/ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची गरज भासत असते.     
(करिअर अथवा अभ्यासक्रमासंबंधीचे आपले प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर ई-मेल करा.)