अर्थशास्त्रज्ञ होण्यासाठी कुठला अभ्यासक्रम आवश्यक ठरतो? त्यासाठी कुठली शैक्षणिक संस्था निवडावी?
    – अच्युत गायकवाड
केवळ एखादा विषय घेऊन चांगला अर्थशास्त्रज्ञ होता येत नाही. अर्थशास्त्र हे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राशी संबंधित असा व्यामिश्र स्वरूपाचा विषय आहे. यामध्ये खूप गुंतागुंत आणि अनेक जागतिक प्रवाह मिसळलेले असतात. त्यामुळे या विषयाचा अभ्यास अधिक परिश्रमपूर्वक आणि विविध संकल्पना समजून उमजून करायचा असतो. अर्थशास्त्रात पदवी, पदव्युत्तर पदवी, पीएच.डी केल्यावर या क्षेत्रात करिअरच्या संधी मिळू शकतात. अनेक विद्यापीठांच्या अर्थशास्त्र विभागात पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम उत्तमरीत्या शिकवला जातो.
कानपूर आणि खरगपूर आयआयटीमध्ये अर्थशास्त्र विषयात पाच वर्षे कालावधीचा इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. कानपूर, खरगपूर, मंडी, पाटणी, गांधीनगर आणि इंदूर येथील आयआयटीमध्ये अर्थशास्त्रात पीएच.डी करण्याची सोय आहे.  इंदिरा गांधी इन्स्टिटय़ूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च या संस्थेत एम. एस्सी इन इकॉनॉमिक्स, एम.फिल आणि पीएच.डी करण्याची सोय आहे. संपर्क- द डायरेक्टर,  इंदिरा गांधी इन्स्टिटय़ूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च, जनरल ए. के. वैद्य मार्ग, गोरेगाव, मुंबई-  ४०००६५
वेबसाइट- http://www.igidr.ac.in
ईमेल- director@igidr.ac.in

मी बीएस्सी अ‍ॅग्रीच्या अंतिम वर्षांत शिकत असून मला कृषी व स्पर्धा परीक्षेतील संधींची माहिती हवी होती. एम.एस्सी करणे लाभदायक ठरेल का?
    – रोहित रंगनाथ पठणे, जाफ्राबाद
कृषी विषयात बीएस्सी पदवीधरास पुढील स्पर्धा परीक्षेच्या संधी उपलब्ध आहेत-
* वनक्षेत्रपाल /सहाय्यक वनाधिकारी यासाठी घेण्यात येणारी राज्य सेवा परीक्षा * जिल्हा कृषी अधिकारी या पदासाठी घेण्यात येणारी परीक्षा * भारतीय वन सेवा * कृषी पदवीधरांसाठी विविध बँकांमार्फत घेण्यात येणारी विस्तार अधिकारी अथवा तत्सम पदासाठीच्या परीक्षा * विविध राजपत्रित अधिकारी पदांसाठी राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी सामायिक परीक्षा * पोलीस उपनिरीक्षक पदासाठीची परीक्षा * नागरी सेवा परीक्षा.
एम. एस्सी केल्यावरसुद्धा या परीक्षा देता येतात. एम. एस्सी व पीएच.डी केल्यावर संशोधक, प्राध्यापक अशा संधी मिळू शकतात. आपली आवड व परिश्रम करण्याची तयारी लक्षात घेऊन एमएस्सी करण्याचा निर्णय घेणे उचित ठरेल.

मी दहावीत असून मला अभियंता व्हायचे आहे. बारावी करून अभियांत्रिकी शिक्षण घ्यावे की पदविका घ्यावी? मला सिव्हिल अभियांत्रिकीमध्ये रस आहे. या विषयात वर्तमानात तसेच भविष्यात कुठल्या संधी उपलब्ध आहेत? महाराष्ट्रात यासंबंधित पदविका अभ्यासक्रम कोणत्या दर्जेदार शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये उपलब्ध आहे?
        – हृषीकेश काटकर
महाराष्ट्रातील तंत्रनिकेतनांमधील अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम हा चांगलाच आहे, पण सध्या अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमास प्रवेश मिळणे हे तितकेसे कठीण राहिलेले नाही. अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी वा जेईई मेन या चाळणी परीक्षेत उत्तम गुण मिळवल्यास चांगल्या शासकीय वा खासगी संस्थांमध्ये प्रवेश मिळू शकतो. चार वर्षांत उत्तम शैक्षणिक कामगिरी केली आणि संवाद कौशल्यासारख्या बाबी साध्य केल्यास प्लेसमेंटमध्ये उत्तम कंपनीमध्ये नोकरीची संधी मिळू शकते. पदविका किंवा पदवी अभ्यासक्रम करण्याचा निर्णय घेण्याआधी घरची परिस्थिती, रोजगार आणि स्वयंरोजगाराची निकड लक्षात घेऊनच निर्णय घेणे उचित ठरेल. शक्यतो पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेणे योग्य ठरेल. सिव्हिल अभियांत्रिकी या विषयातील अभियंत्यांना कायम उत्तमोत्तम संधी मिळत आल्या आहेत. त्यामुळे हा विषयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यास हरकत नाही. तथापि, या विषयाचे परिपूर्ण ज्ञान मिळवणे आणि त्या ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर करता येणे गरजेचे ठरते. पदविका अभ्यासक्रमात प्रवेश घ्यायचा असल्यास महाराष्ट्रातील बहुतांश तंत्रनिकेतनांचा शैक्षणिक दर्जा उत्तमच आहे.

मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधून बीए केले आहे. मला ४५ टक्के गुण मिळाले आहेत. मला एमबीए करायचे आहे. मी खुल्या प्रवर्गातील आहे. मला ‘एमबीए’साठी प्रवेश मिळू शकतो का? प्रवेश मिळाला नाही तर अन्य कुठला अभ्यासक्रम  करता येईल?
    – विजय धुमानसुरे
तुला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा एमबीए अभ्यासक्रम करता येईल. मात्र, त्यासाठी या विद्यापीठामार्फत घेण्यात येणारी प्रवेश चाळणी परीक्षा द्यावी लागेल. एमबीए करता आले नाही, तर करण्यासारख्या इतर अनेक गोष्टी आहेत. विविध स्पर्धा परीक्षा देऊन तुला शासकीय अथवा निमशासकीय विभागांमध्ये नोकरी मिळू शकते. तू इतिहास विषयात बीए केले आहेस. याच विषयात एमए/ पीएच.डी/ नेट/ सेट केल्यास अध्यापनाची संधी मिळू शकते.

मी बीए केले असून इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठामध्ये एमएसडब्ल्यू या अभ्यासक्रमास प्रवेश घेतला आहे. एमएसडब्ल्यू केल्यानंतर उपलब्ध करिअर संधी कोणत्या?
– स्वप्निल पापडकर
केंद्र आणि राज्य सरकारच्या नोकऱ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षेसाठी किमान अर्हता ही कोणत्याही विषयातील पदवी असते. त्यामुळे तू आताच या परीक्षांना बसण्यासाठी पात्र आहेस. एमएसडब्ल्यू या पदवीने शासकीय समाजकार्य महाविद्यालयांमध्ये नोकरी मिळू शकेल. प्रत्यक्ष शासनात अशा पदवीने थेट सध्या तरी कोणतीही भरती केली जात नाही. विविध सामाजिक कार्य आणि  सामाजिक सर्वेक्षणाचे कार्य करणाऱ्या खासगी संस्थांना या शैक्षणिक अर्हतेच्या उमेदवारांची
गरज भासू शकते.

मी सध्या बीएस्सी कृषीच्या तिसऱ्या वर्षांला आहे. कृषी पदवीधरांसाठी भारतीय लष्करात कोणत्या संधी आहेत?
    – सौरभ आंभोरे
लष्कराच्या शैक्षणिक प्रवर्गातील नोकरी कृषी विषयातील पदव्युत्तर पदवीधरांना संधी मिळू शकते. या संदर्भातील जाहिरातीकडे लक्ष ठेवावे.

माझी मुलगी बायोमेडिकलच्या दुसऱ्या वर्षांत शिकत आहे. तिला  या क्षेत्रासंबंधित नोकरी आणि करिअरच्या संधींची माहिती हवी होती. शासकीय नोकरी मिळेल का?
    – रवींद्र भावसार
बायोमेडिकल अभियांत्रिकी हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पुढील विविध करिअर संधी मिळू शकतात-
०    वैद्यकीय संशोधन संस्था, रुग्णालये यामध्ये उपयोगात आणणाऱ्या उपकरणे निर्मिती कंपन्या, उद्योगांमध्ये संशोधक, निरीक्षक, व्यवस्थापक तसेच अशा उपकरणांचे विकासक.
०    औषध निर्माण क्षेत्र
०    मोठय़ा आणि कॉर्पोरेट रुग्णालयांमध्ये जैववैद्यकीय अभियंते
०    रुग्णालय व्यवस्थापन या विषयात एमबीए करून रुग्णालय प्रशासक म्हणून कार्य करण्याची संधी
०    जैववैद्यक उद्योग
०    आयआयटी मुंबई, मद्रास हैदराबाद येथे या विषयामध्ये पदव्युत्तर पदवी करून संशोधन क्षेत्राकडे वळता येईल.
०    बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये विक्री/ सेवा.
०    शासकीय सेवेत येण्यासाठी राज्यसेवा अथवा लोकसेवा आयोगाची परीक्षा देता येईल. त्यासाठी कोणत्याही विषयातील पदवी ही किमान शैक्षणिक अर्हता आहे.
०    शासनाच्या ज्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये हा विषय शिकवला जातो, त्या ठिकाणी अध्यापनाची संधी मिळू शकते. मात्र, त्यासाठी पदव्युत्तर पदवीसोबत पीएच.डी असल्यास उत्तम. या विषयात पदव्युत्तर पदवी घेतल्यास निश्चितपणे उच्चश्रेणीच्या करिअरच्या संधी मिळू शकतात.

मी २०१५ मध्ये मेकॅनिकल अभियांत्रिकीमध्ये बीई केले असून मला ५९.५७ टक्के गुण  मिळाले आहेत. मला GATE २०१६ देऊन आयआयटीमध्ये एम.टेक.मध्ये प्रवेश घ्यायचा आहे. मी खुल्या प्रवर्गातील असून मला या परीक्षेला बसता येईल का? मला बीईमधील माझ्या कामगिरीत सुधारणा करता येईल का?
    – ज्योतिराम बसोले
गेट परीक्षेसाठी किमान शैक्षणिक अर्हता खुल्या गटासाठी अभियांत्रिकी पदवी परीक्षा उत्तीर्ण असल्याने तू गेट परीक्षेला बसू शकतो. त्यामुळे पुन्हा कामगिरी सुधारण्यासाठी बीईची परीक्षा देण्याची गरज नाही. तसेही एकदा उत्तीर्ण झाल्यावर पुन्हा परीक्षा देता येत नाही.