05 March 2021

News Flash

अल्पावधीच्या अभिनय प्रशिक्षण शिबिरापासून सावधान!

अमिताभ बच्चन अनेकदा मुलाखतीत अत्यंत नम्रपणे म्हणतात, ‘लोग कहते है के मै बहुत बडा कलाकार हूं, मगर मैं आज भी अ‍ॅक्टिंग के बारे में नयी

| December 3, 2012 01:15 am

अमिताभ बच्चन अनेकदा मुलाखतीत अत्यंत नम्रपणे म्हणतात, ‘लोग कहते है के मै बहुत बडा कलाकार हूं, मगर मैं आज भी अ‍ॅक्टिंग के बारे में नयी बातें सीख रहा हूं..’
‘बिग बी’च्या या बोलण्यातला अर्थ म्हणजे इतक्या प्रदीर्घ वाटचालीनंतरदेखील (त्याचा पहिला चित्रपट ‘सात हिन्दुस्थानी’ १९६९ सालचा) अभिनयातले काही बारकावे, तपशील शिकण्याची त्यांची तयारी आहे.
पण अमिताभला जे समजते (व शोभते) ते सगळ्यांनाच कसे मान्य होईल? विशेषत: दिवाळी व मे महिन्याच्या सुट्टीत फोफावणाऱ्या ‘अभिनय प्रशिक्षण वर्गा’चा विचार करताना तरी तसे म्हणावेसे वाटते. सुट्टीतील या शिबिरांतून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी अभिनय कौशल्याचे धडे गिरवतील, या हेतूने अल्पावधीची अभिनय प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जातात. प्रसारमाध्यमांतून या शिबिरांच्या  आकर्षक व प्रभावी जाहिराती व त्यात काही अनुभवी, नामांकित कलाकारांची मार्गदर्शक म्हणून दिलेली जंत्री यामुळे प्रभावित होऊन काहीजण अशा अभिनय प्रशिक्षणवर्गात सहभागी होतातही. पण पहिल्या एक-दोन सत्रांमध्येच अशा ‘अल्पावधीच्या अभिनय प्रशिक्षण शिबिराचा काहीही फायदा होत नाही’ (बहुधा आपण फसले गेलो आहोत), असे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या लक्षात येते. मोजून अवघ्या चार रविवारी परिपूर्ण अभिनय शिकवला जाऊ शकतो, हा संबंधित जाहिरातींमधला दावा चुकीचा व हास्यास्पद आहे, कारण अभिनयाच्या अनेक शाखा आहेत. चांगल्या संवादफेकीसाठी भाषेची ओळख हवी, शब्दांचे अर्थ समजायला हवे, पाठांतरही चांगले हवे, त्यानंतर भाषेसह मुद्राभिनय येतो, त्यात दोन-चार पात्रांसह संवाद करणे व एकटय़ाने संवाद म्हणणे अशी वर्गवारी येते. त्याची पुढची पायरी म्हणजे कॅमेऱ्यासाठी मुद्राभिनय व संवाद यासाठीचे कौशल्य शिकावे लागते. नृत्यदेखील शिकावे लागते. अगदी सायकल चालवता येणे यापासून घोडेस्वारी येणे यापर्यंत अभिनयासाठी गरजेचे ठरते. एखाद्या व्यक्तिरेखेच्या सादरीकरणात कशा-कशाचा समावेश होईल, हे प्रत्यक्ष अभिनय कारकीर्दीला सुरुवात केल्याशिवाय लक्षात येत नाही. मागील पिढीतील एका अभिनेत्रीला एका ऐतिहासिक पाश्र्वभूमीवरील चित्रपटात घोडय़ावर बसण्याचा प्रसंग अंगलट आला. कोल्हापूरमध्ये सदर दृश्याचे चित्रीकरण असताना त्यात काय विशेष, असे म्हणत तिने घोडय़ावर बसण्यात यश तर मिळवले, पण.. लगाम हाती न राहिल्याने ती अभिनेत्री घोडय़ावरून पडली व चार महिने घरी आराम करत बसली.
तात्पर्य, अवघ्या चार रविवारी अभिनयाची साधी तोंडओळख तरी शक्य होते का? केवळ अनुभवी कलाकारांची भाषणे ऐकल्याने अभिनयातले बारकावे कसे शिकता येतील? अभिनय ‘आतून’ येतो, इतपत जरी गंभीर व्हायची गरज नसली तरी अभिनयासाठीचा आत्मविश्वास वाढण्याची प्रक्रिया खूप मोठी आहे. त्यासाठी वृत्तपत्र वाचनापासून सुरुवात होते. काही यशस्वी कलाकारांच्या आत्मचरित्रांच्या वाचनातूनही चांगला कलाकार बनण्यासाठी अनेक स्तरांवर कसा प्रयत्न करावा लागतो, त्यात कसे संभाव्य व अनपेक्षित अडथळे येतात याची कल्पना येते. ते मोठे कलाकार अशा चार दिवसांच्या प्रशिक्षणातून उभे राहिलेले नसतात. त्यांची तपश्चर्या, कलेची ओढ, स्वत:च स्वत:चे झालेले टीकाकार, योग्य संधीची पाहिलेली वाट, अशा अनेक गोष्टींतून त्यांची जडणघडण होते.
पण अलीकडे अभिनयाच्या क्षेत्रात कारकीर्द करू इच्छिणाऱ्या अनेकांना असा खूप वळणावळणाचा रस्ता मान्य नाही. कलाकार म्हणून घडताना एक चांगली व्यक्ती म्हणूनदेखील स्वत:ला घडवायचे असते, हे अनेकांना मान्यच नाही. ‘कलेच्या क्षेत्रात शॉर्टकट नसतात,’ हे ते मान्यच करीत नाही. विविध प्रकारच्या मार्गाचा (?) शक्य तेवढा वापर करून दूरदर्शन मालिका व चित्रपट यातून भूमिका मिळतात, यावर त्यांचा ठाम विश्वास असतो. कुचाळक्यांनी भरलेली नियतकालिके त्यांच्या या समजाला सतत व्यवस्थित व भरपूर खतपाणी घालतात. अशा यशासाठी आसुसलेला वर्ग अशा अल्पावधीच्या अभिनय प्रशिक्षण संस्थेचा ‘खरा ग्राहक’ (अर्थात गिऱ्हाईक) ठरतो. किंबहुना अशाच विद्यार्थ्यांच्या (?) मानसिकतेचा पटकन व योग्य लाभ उठवण्याचा या अल्पावधीच्या अभिनय प्रशिक्षण संस्थांचा हेतू असतो व सध्या मनोरंजन उद्योगात मालिकांपासून मराठी चित्रपटापर्यंत अभिनयाची भरपूर संधी असल्याचे वातावरण असल्यानेही अनेकांना खूप झटपट अभिनय शिकण्याची घाई झाली आहे. अर्थात, कोणत्याही क्षेत्रात वरवरचे शिक्षण काहीच उपयोगाचे नसते..
निदान सुज्ञ व जागरूक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी तरी अल्पावधीच्या अभिनय प्रशिक्षण शिबिरापासून दूर राहावे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2012 1:15 am

Web Title: caution from short time acting trainin camp
Next Stories
1 प्रोजेक्ट फंडा : ई-कचऱ्याचं काय करायचं?
2 रुपांतरण : भेटवस्तू देण्याविषयीचे संकेत
3 म्युरल आर्ट : कलासक्त आविष्कार
Just Now!
X