News Flash

संशोधन संस्थायण : अन्न हे पूर्णब्रह्म

भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा अन्नधान्य, फळे आणि भाजीपाला उत्पादक देश आहे.

सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिटय़ूट, म्हैसूर

कर्नाटक राज्यातील म्हैसूर येथे सेंट्रल फूड टेक्नॉलॉजीकल रिसर्च इन्स्टिटय़ूट (सीएफटीआरआय) म्हणजेच केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्था स्थित आहे. अन्न तंत्रज्ञान या विषयामध्ये मूलभूत आणि उपयोजित संशोधन करणारी ही संस्था आहे. या संशोधन संस्थेची स्थापना दि.२१ऑक्टोबर १९५०मध्ये झाली. सीएफटीआरआय ही संस्थादेखील वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेशी (सीएसआयआर)संलग्न संस्था आहे. केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्थाही अन्नशास्त्र, अन्नसुरक्षा आणि अन्न तंत्रज्ञान या विषयांतील सखोल संशोधन करून या क्षेत्रातील एकूण संशोधन-विकासाला चालना देणे या भावनेने संशोधन कार्य करणारी संस्था आहे. या संस्थेची अन्य संशोधन विस्तार केंद्रे हैदराबाद, लखनऊ आणि मुंबई येथे आहेत.

संस्थेविषयी

भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा अन्नधान्य, फळे आणि भाजीपाला उत्पादक देश आहे. त्यामुळेच सीएफटीआरआय धान्य, कडधान्ये, तेलबिया, मसाले, फळे, भाज्या, मांस, मासे आणि पोल्ट्री उत्पादन आणि हाताळणी यासारख्या वैविध्यपूर्ण संशोधनात गुंतलेली आहे. सीएफटीआरआयने अन्नशास्त्र व संबंधित तंत्रज्ञानातील तीनशेपेक्षा जास्त उत्पादने, प्रक्रिया आणि उपकरणे प्रकार तयार केलेली आहेत. त्यात अनेक पेटंट्सचा समावेश आहे. याव्यतिरिक्त संस्थेने संशोधन विषयांतील अनेक शोधनिबंध प्रकाशित केलेले आहेत. संस्था आपल्या संशोधन-विकास कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी विविध सुविधा जोडणे, निर्यात वाढवणे, अन्नधान्याचे नवीन स्रोत शोधणे, अन्नधान्य उद्योगांमध्ये मानवी संसाधने एकत्रित करणे, खर्च कमी करणे आणि आधुनिकीकरण करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करणे यांसारख्या बहुविध पर्यायांचा अवलंब करत आहे. या संशोधन संस्थेमध्ये सध्या एकूण २०० शास्त्रज्ञ आणि अभियंते संशोधनाच्या कार्यात गुंतलेले आहेत तर दोनशेपेक्षाही अधिक कुशल तांत्रिक व साहाय्यक कर्मचारी या संशोधकांना मदत करत आहेत. संस्थेतील शास्त्रज्ञांबरोबरच तांत्रिक कर्मचाऱ्यांचे संशोधनकार्यसुद्धा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शोधनिबंधात प्रकाशित केले जाते. अत्याधुनिक तंत्रज्ञान, संगणकीकृत प्रयोगशाळांची उपलब्धता, कुशल मनुष्यबळ आणि देशातील विविध संशोधन संस्थांबरोबर असलेले सहकार्य व उत्तम संबंध या महत्त्वाच्या बाबींमुळे सीएफटीआरआय इतर संस्थांबरोबर भागीदारी करून सार्वजनिक आणि खासगी उद्योगांना वैज्ञानिक सेवा पुरवते.

संशोधनातील योगदान  –

सीएफटीआरआय ही जरी फूड टेक्नॉलॉजीमध्ये संशोधन करणारी संस्था असली तरी सीएसआयआरच्या मार्गदर्शनानुसार संस्थेने आंतरविद्याशाखीय संशोधनाला (Interdisciplinary research) नेहमीच चालना दिलेली आहे. या सर्व शाखांमधील संशोधन समन्वयाने चालावे यासाठी संस्थेने संशोधनाच्या सोयीने विविध विभागांची रचना केलेली आहे. या विभागांच्या साहाय्याने देश-विदेशांतील अनेक बाह्य़ प्रकल्प हाती घेऊन यशस्वीपणे ते पूर्ण केलेले आहेत. संस्थेमध्ये एकूण सोळा संशोधन आणि विकास विभाग आहेत.

या सर्व विभागांतील संशोधन विषयांना संस्थेने सोयीसाठी विविध उपविषयांमध्ये विभागले आहे. सध्या संस्थेमध्ये बायोकेमिस्ट्री, फ्लोअर मिलिंग, बेकिंग अ‍ॅण्ड कन्फेक्शनरी टेक्नॉलॉजीज, फूड इंजिनीअिरग, फूड पॅकेजिंग टेक्नॉलॉजी, फूड प्रोटेक्टंट अ‍ॅण्ड इन्फेस्टेशन कंट्रोल, फूड सेफ्टी अ‍ॅण्ड अ‍ॅनालिटीकल क्वालिटी कंट्रोल, फ्रूट अ‍ॅण्ड व्हेजिटेबल टेक्नॉलॉजी, ग्रेन सायन्स टेक्नॉलॉजी, लिपीड सायन्स, मिट अ‍ॅण्ड मरीन सायन्स, मायक्रोबायोलॉजी अ‍ॅण्ड फर्मेटेशन टेक्नॉलॉजी, मॉलीक्युलर न्युट्रिशन, प्लँट सेल बायोटेक्नॉलॉजी, प्रोटिन केमिस्ट्री अ‍ॅण्ड टेक्नोलॉजी, स्पाइस अ‍ॅण्ड फ्लेवर सायन्स इत्यादी विषयांत संशोधन केले जाते. संशोधनासाठी हातभार लावण्यासाठी काही अतिरिक्त विभागही जसे की संगणक विभाग, इन्फॉर्मेशन अ‍ॅण्ड पब्लिसिटी, कन्स्ट्रक्शन अ‍ॅण्ड सिव्हिल मेंटेनन्स, प्लॅनिंग, मॉनिटरिंग अ‍ॅण्ड को-ऑíडनेशन, डिझाइन अ‍ॅण्ड फॅब्रिकेशन युनिट, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर अ‍ॅण्ड बिझनेस डेव्हलपमेंट, इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड मेकॅनिकल मेंटेनन्स इत्यादी कार्यरत आहेत.

विद्यार्थ्यांसाठी संधी

सीएफटीआरआयमध्ये चाललेल्या इतक्या उत्कृष्ट संशोधनाचा फायदा शैक्षणिक क्षेत्रालाही व्हावा म्हणून सीएफटीआरआयने देशातील विविध विद्यापीठांबरोबर संलग्न होऊन अनेक शैक्षणिक व संशोधन कार्यक्रम सुरू केले आहेत. भारतातील इतर संशोधन संस्थांसारखे या संस्थेमध्येही Academy of Scientific & Innovative Research (AcSIR) च्या अंतर्गत पदव्युत्तर व पीएच.डी. हे संशोधन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना पूर्ण करता येतात. सीएफटीआरआय विविध भारतीय विद्यापीठांशी पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी संलग्न आहे. तसेच दरवर्षी सीएसआयआरच्या ‘नेट’सारख्या परीक्षांमधून गुणवत्ताप्राप्त अनेक जेआरएफ व एसआरएफ विद्यार्थी या संस्थेमध्ये पीएच.डी.चे संशोधन करण्यासाठी प्रवेश घेतात. फूड टेक्नॉलॉजी व संबंधित विषयांतील संशोधन वाढीस लागावे यासाठी संस्थेने संशोधक विद्यार्थ्यांना नेहमीच प्रोत्साहन दिलेले आहे. संशोधक विद्यार्थ्यांना सीएफटीआरआयमध्ये वर उल्लेख केलेल्या सर्व संशोधन विषय व इतर संबंधित आंतरविद्याशाखीय विषयांतील संशोधनाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. उत्कृष्ट संशोधनासाठी आवश्यक ती सर्व अत्याधुनिक उपकरणे, जागतिक विद्यापीठांमध्ये संशोधन केलेला अनुभवी संशोधक-प्राध्यापकवर्ग व तत्सम इतर अनेक सोयीसुविधा सीएफटीआरआयकडून या संशोधक विद्यार्थ्यांना दिल्या जातात. संस्थेमध्ये दरवर्षी विविध संशोधन विषयांतील नामवंत शास्त्रज्ञांची व्याख्याने, कार्यशाळा व चर्चासत्रे आयोजित केली जातात.

संपर्क

सेंट्रल फूड टेक्नॉलॉजीकल रिसर्च इन्स्टिटय़ूट चेलूवंबा मॅन्शन, रेल्वे म्युझियमच्या विरुद्ध दिशेला, म्हैसूर, कर्नाटक – ५७००२०.

itsprathamesh@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2018 1:01 am

Web Title: central food technological research institute mysore
Next Stories
1 करिअर मंत्र
2 इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ पॅकेजिंगचा अभ्यासक्रम
3 प्राकृतिक भूगोल (मुलभूत अभ्यास)
Just Now!
X