News Flash

जिथे विज्ञान शिक्षणाला उत्तेजन मिळते..

चीनमध्ये शालेय शिक्षणात विज्ञान शिक्षणाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. विज्ञान शिक्षणाला उत्तेजन देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक विज्ञान केंद्र स्थापन करण्यात आले आहे.

| December 23, 2013 01:02 am

चीनमध्ये शालेय शिक्षणात विज्ञान शिक्षणाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. विज्ञान शिक्षणाला उत्तेजन देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक विज्ञान केंद्र स्थापन करण्यात आले आहे. शांघायमधील अशा एका केंद्राला भेट देण्याची मला संधी मिळाली. वेगवेगळ्या शाळांमधील हुशार मुलांना निवडून या केंद्रात पाचारण केले जाते. जेव्हा ही मुले या केंद्रात येतात, तेव्हा त्यांना तिथे बनविण्यात आलेल्या अनेक वस्तू दाखविण्यात येतात. त्यानंतर त्यांना स्वत: काम करण्यासाठी प्रयोगशाळा आणि वर्कशॉप उपलब्ध करून दिले जाते. विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी तिथे मार्गदर्शक उपलब्ध असतात. विशेष म्हणजे ही सगळी कामे शाळेच्या वेळेव्यतिरिक्त केली जातात. शाळा सुटल्यानंतर मुले या केंद्रात येतात. त्यामुळे हे केंद्र संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू असते. बहुधा शनिवारी आणि रविवारी येथे मुले मोठय़ा संख्येने येतात. मी ज्या केंद्रात गेलो तिथे प्रतिकृती बनविण्यावर भर होता. वेगवेगळ्या प्रकारच्या जहाजांच्या प्रतिकृती तेथे बनविण्यात येत होत्या. नुकतीच प्रतिकृती बनविण्याची एक स्पर्धा तेथे आयोजित करण्यात आलेली होती. त्या स्पध्रेतील बक्षीसपात्र प्रतिकृती काचेच्या कपाटात प्रदíशत करून ठेवलेल्या होत्या.
विद्यार्थ्यांना मदत करण्याखेरीज या केंद्रात शिक्षकांसाठीदेखील अनेक कार्यक्रम राबविले जातात. शिक्षकाला विज्ञान शिकविताना काही अडचण आलीच तर त्यांनी या केंद्राकडे मदतीची मागणी करावी, अशी अपेक्षा आहे. आपल्या अडचणी आणि प्रश्न घेऊन विज्ञान शिक्षक या केंद्रात नियमितपणे येत असतात. विज्ञान शिक्षकांचे सेवांतर्गत प्रशिक्षण करणे हे तर या केंद्राचे कामच आहे. नियमितपणे अशी प्रशिक्षणे या केंद्रात आयोजित केली जातात. त्याचबरोबर, एखाद्या शिक्षकाला कृती संशोधन करावयाचे असेल तर त्याचेही मार्गदर्शन या केंद्रात केले जाते. या केंद्राचा आपल्या अध्यापनात खूप उपयोग होतो, असे शिक्षकांनी सांगितले.
विज्ञान शिक्षण आणि संशोधन या दोन्ही क्षेत्रांना उत्तेजन देण्याच्या उद्देशाने १८८० साली ‘चीन विज्ञान तंत्रज्ञान संघटने’ची (China Association of science and technology) स्थापना करण्यात आली. या संघटनेचे कार्यालय बीजिंग या राजधानीच्या शहरात असून संस्थेच्या कामाचा आवाका खूप मोठा आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी तेथे एक स्वतंत्र विभाग आहे. या विभागाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्तीचा विकास व्हावा यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यातील एक कार्यक्रम म्हणजे किशोरांसाठी नवनिर्मिती स्पध्रेचे(China Adolescent Science and Technology Innovation Contest) आयोजन. त्याची मुहूर्तमेढ १९८०लाच रोवली गेली. सुरुवातीच्या काळात ही स्पर्धा दोन वर्षांतून एकदा होत असे. १९९१ पासून मात्र या स्पध्रेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. फेब्रुवारी २००७ मध्ये चीन विज्ञान तंत्रज्ञान संघटनेचे काही पदधिकारी भारतभेटीवर आले होते. त्या वेळेस ठाण्यातील काही शाळांमध्ये मी त्यांना घेऊन गेलो. त्यातील एक शाळा होती, विद्या प्रसारक मंडळाची सौ. आनंदीबाई केशव जोशी इंग्रजी माध्यम शाळा. या शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मिळून त्यांच्या भेटीचे सुंदर आयोजन केले होते. त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी केलेल्या विज्ञान प्रयोगांचे एक छोटेखानी प्रदर्शनच त्यांनी पाहुण्यांसाठी आयोजित केले होते. या प्रदर्शनाचा चांगलाच प्रभाव पाहुण्यांवर पडला. शाळेतून बाहेर पडण्यापूर्वी त्यानी चीनमध्ये किशोरासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या नवनिर्मिती स्पध्रेसाठी विद्या प्रसारक मंडळाच्या या शाळेला पाचारण केले. त्यांच्या निमंत्रणावरून २००७च्या ऑगस्ट महिन्यात कुिन्मग येथे भरलेल्या २२व्या स्पध्रेत भारतीय विद्यार्थ्यांना सहभागी होता आले आणि विशेष म्हणजे, पहिल्याच सहभागात या विद्यार्थ्यांना उत्तम प्रकल्पाचे बक्षीस मिळाले. तेव्हापासून दरवर्षी नियमितपणे स्पध्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण येत आलेले आहे. २२व्या स्पध्रेपासून ते २०१३ साली नॅनजिंग येथे भरलेल्या २८व्या स्पध्रेपर्यंत सलग सात वष्रे या स्पध्रेत आपल्या देशाचे विद्यार्थी या स्पध्रेत सहभागी होत आहेत. वेगवेगळ्या राज्यांच्या राजधानीच्या शहरात या स्पध्रेचे आयोजन केले जाते.
चीन आणि भारत या दोन देशांमध्ये कितीतरी सारखेपणा आहे. ‘एक कुटुंब, एक मूल’ अशी योजना चीनमध्ये राबविल्याने तिथल्या मुलांना बहीण नाही की भाऊ नाही. त्याचबरोबर काका, मामा, मावशी अशी नाती तेथे उरलेली नाहीत. पण असे जरी असले तरी भारताप्रमाणेच तिथली कुटुंबव्यवस्था अजून टिकून आहे. राजकीय व्यवस्था वेगवेगळी असली तरी मनुष्यबळ विकासाचे आव्हान दोन्ही देशांसाठी सारखेच आहे. याचे कारण म्हणजे शाळेत येणाऱ्या मुलांची संख्या दोन्ही देशांमध्ये प्रचंड आहे. सामजिक तसेच आíथक विषमता दोन्ही देशांत आहे. कम्युनिस्ट राजवटीने समानता आणण्याचा प्रयत्न जरी केला असला तरी अलीकडच्या औद्योगिकीकरणामुळे आíथक विषमता तेथेदेखील निर्माण होत आहे. त्यामुळे श्रीमंतांची मुले खासगी शाळेत आणि गरिबांची मुले सरकारी शाळेत असे चित्र चीनमध्येदेखील निर्माण होत आहे, म्हणूनच वंचितांसाठी शालेय शिक्षण हे दोन्ही देशांपुढचे मोठे आव्हान आहे. शाळेत जाण्यायोग्य वयाची मुले शाळेत आली पाहिजेत, ती शालेय शिक्षण संपेपर्यंत शाळेत राहिली पाहिजेत आणि या अवधीत त्यांना जीवनावश्यक कौशल्ये अवगत झाली पाहिजेत एवढीच माफक अपेक्षा शालेय शिक्षणाकडून आहे. याबाबतीत दोन्ही देश धडपडत आहेत. सर्व विद्यार्थ्यांना शाळेत आणणे आणि सक्तीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांना शाळेत टिकवून ठेवणे याबाबतीत दोन्ही देशांना अजूनही १०० टक्के यश मिळालेले नाही. शालेय शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी भारतात काही वर्षांपूर्वी जिल्हा प्राथमिक शिक्षण प्रकल्प (District Primary Education Programme) राबविला गेला. आता सर्व शिक्षा अभियान हा प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पातील अनुभवातून चिनी शिक्षणतज्ज्ञांना खूप काही शिकण्यासारखे आहे. त्याचबरोबर चीनने शालेय शिक्षण खेडोपाडी पोहोचविण्यासाठी जे जे प्रयत्न केले, त्यातून भारताला शिकण्यासारखे बरेच आहे. त्यासाठी या दोन देशांनी एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण करणे गरजेचे आहे. दोन देशांमधील शिक्षणतज्ज्ञांची चर्चा घडवून आणणे, शिक्षकांच्या भेटी घडवून आणणे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहली आयोजित करणे या माध्यमातून अशी देवाणघेवाण करणे शक्य आहे. या कामी संपर्क यंत्रणेचा चांगला उपयोग करून घेता येतो. विद्या प्रसारक मंडळाने असा प्रयत्न काही वर्षांपूर्वी करून पहिला. बीजिंग आणि ठाणे येथील शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये स्कायपेच्या माध्यमातून चर्चा घडवून आणण्यात आली. असे प्रयत्न वारंवार होण्याची गरज आहे.
सर्वसामान्य चिनी माणसाला भारतीय माणसांबद्दल आस्था आहे. चीनमधील बहुतांशी लोक बौद्धधर्मीय आहेत. हा धर्म भारताने आम्हाला दिला म्हणून भारतीय माणसांकडे ते आदराने पाहतात. त्यामुळे दोन देशांच्या लोकांमध्ये जवळीक साधणे सहज शक्य आहे. सीमा प्रश्न आणि इतर मतभेद बाजूला ठेवून हे दोन देश जर एकत्र आले तर त्यांच्यात जगावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता आहे. वेगाने प्रगती करणारे देश म्हणून ब्राझील, भारत, रशिया आणि चीन या चार देशांचा एक गट करण्यात आलेला आहे. या माध्यमातून परस्पर सहकार्य करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना लवकरच यश येवो, ही अपेक्षा बाळगू या.
(समाप्त)
  sudhakar.agarkar@gmail.com
(समन्वयक : हेमंत लागवणकर)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2013 1:02 am

Web Title: china education system
Next Stories
1 शिक्षणाला उत्तमतेचा ध्यास!
2 जीवो जीवस्य जीवनम्
3 जीवशास्त्राशी निगडित क्षेत्रे
Just Now!
X