नवी दिल्लीच्या अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेतर्फे विविध संस्थांमध्ये उपलब्ध असणाऱ्या व्यवस्थापनविषयक पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सी-मॅट घेण्यात येते. व्यवस्थापन अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या ‘सामायिक व्यवस्थापन अभ्यासक्रम प्रवेश चाचणी’ अर्थात ‘सीमॅट’ २०१५-१६ या प्रवेश पात्रतेसाठी अर्हताप्राप्त विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत-
शैक्षणिक अर्हता
अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत अथवा २०१५ मध्ये पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसणारे असावेत.
निवड प्रक्रिया
अर्जदारांपैकी पात्रताधारक विद्यार्थ्यांना संगणकीय पद्धतीने निवड परीक्षा द्यावी लागेल. ही संगणकीय परीक्षा देशांतर्गत विविध परीक्षा केंद्रांवर १९ फेब्रुवारी २०१५ ते २२ फेब्रुवारी २०१५ च्या दरम्यान घेण्यात येईल. त्यामध्ये महाराष्ट्रातील अहमदनगर, अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नवी मुंबई व पुणे या शहरांचा समावेश असेल.
अर्जदारांची पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व ‘सी मॅट’ प्रवेश पात्रता परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना संबंधित संस्थेतील व्यवस्थापनविषयक अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यात येईल.
अर्जासह भरायचे शुल्क
अर्जासह भरायचे शुल्क म्हणून सर्वसाधारण गटाच्या उमेदवारांनी १,४०० रु. (राखीव गटातील उमेदवारांनी ७०० रु. ) नेट बँकिंग, क्रेडिट-डेबिट कार्डद्वारा अथवा स्टेट बँक ऑफ इंडिया अथवा सहयोगी बँकेच्या कुठल्याही शाखेत रोखीने भरणे आवश्यक आहे.
संपर्क
अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहितीसाठी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या http://www.aicte-camat.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची मुदत संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ५ जानेवारी २०१५ पर्यंत अर्ज करावा.