prashasanनागरी सेवा परीक्षेत सामान्य अध्ययनाची व्याप्ती मोठी आहे. या लेखात मुख्य परीक्षेतील लेखी चाचणीमध्ये अनिवार्य असलेल्या सामान्य अध्ययनाच्या पेपरसाठी लेखनाची धाटणी कशी असायला हवी याचा ऊहापोह केला आहे. मुख्य परीक्षेचे मूल्यमापन लेखी चाचणीद्वारे होत असल्याने आपल्या यशाची मदार आपल्या लेखनशैलीवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत आपल्या लेखनाचा दर्जा ओळखता आला पाहिजे. लेखन सुमार दर्जाचे असेल तर ते परिपक्व  कसे बनवता येईल यासंबंधीचे नियोजन कळत-नकळतपणे विद्यार्थ्यांकडून टाळले जाते. अभ्यास पूर्णत्वास पोहोचल्यानंतर लेखनात परावíतत करण्याची वेळ जेव्हा येते, त्यावेळी ते गडबडतात. ही लेखन समस्या मिटवण्यासाठी विद्यार्थी कोणताही प्रयत्न करीत नाहीत. इथे मुद्दा केवळ लेखन सुधारण्याचा नाही तर लेखी चाचणीत सृजनशीलता आणि कल्पकता कशी येईल आणि त्याच्या आधारे विश्लेषणात्मक आणि उपयोजित लेखन करता यावे हा आहे. त्यातून उत्तरपत्रिकेत आपले लेखन प्रभावी बनवता येऊ शकते.
मुख्य परीक्षेच्या लेखी चाचणीअंतर्गत सामान्य अध्ययनाच्या चार पेपरची व्याप्ती एक हजार गुणांची आहे. डिसेंबर २०१४ मध्ये पार पडलेल्या लेखी चाचणीमध्ये सामान्य अध्ययनाच्या पहिल्या पेपरमध्ये एकूण अनिवार्य प्रश्नांची संख्या २५ आणि प्रत्येक प्रश्नाला १० गुण तसेच अधिकतम शब्दमर्यादा १५० आखून दिलेली होती. उरलेल्या सामान्य अध्ययनाच्या तिन्ही पेपरमध्ये एकूण अनिवार्य प्रश्नांची संख्या २० आणि प्रत्येकी साडेबारा गुण आणि अधिकतम शब्दमर्यादा २०० आखून दिलेली होती.
जेव्हा १५० शब्दमर्यादेत लेखन अपेक्षित असेल तर सरासरी १२० शब्दांमध्ये आणि शब्दमर्यादा २०० दिलेली असेल तर १५० शब्दांमध्ये संबंधित प्रश्नाचे उत्तर देता येते. एका पेपरसाठी प्रश्नांची संख्या सर्वसाधारणपणे २० आणि सरासरी एका प्रश्नाला १५० शब्द असे
२० प्रश्नांचे नियोजन केले तर अडीच तासांमध्ये तीन हजार शब्दांचे लिखाण अपेक्षित आहे. हे सूत्र चारही पेपर्सना लागू करता येते.
या पाश्र्वभूमीवर अभ्यासाला समांतर असे लिखाणाचे काटेकोर नियोजन करणे आवश्यक आहे. मात्र, बहुतांश विद्यार्थी याकडे कळत-नकळत दुर्लक्ष करतात. काही विद्यार्थी मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला संपूर्ण न्याय न देता परीक्षेच्या तोंडावर केवळ लेखी चाचणीमाला (test series) देऊन परीक्षेची तयारी पूर्ण झाली, असा समज बाळगून परीक्षा देतात. कारण अशा चाचणीमालेतील उत्तरे अ‍ॅकॅडेमिक मूल्यांचा अभाव असलेल्या व्यक्तींकडून तपासून घेतली जातात. तो केवळ अभिप्राय देतो. त्यांच्या अंगभूत मर्यादांमुळे त्यांना चिकित्सक अभिप्राय (critical feedback) देता येत नाही. कित्येक विद्यार्थ्यांना चिकित्सक अभिप्राय कसा असतो हेही ज्ञात नसते. परिणामी, लेखनातील बारीक चुका समोर आणता न आल्याने त्या दुरुस्त करून आपले लेखन सकस बनवता येण्याची संधी विद्यार्थी गमावून बसतात.
विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिलेल्या शब्दमर्यादेत लिहिण्यासाठी उत्तरात अचूकता आणि काटेकोरपणा आणणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यातील लेखन मुद्देसूद पद्धतीने
केलेले असावे. उत्तरांमध्ये तंतोतंतपणा आणि नेमकेपणा असायला हवा.
घट्ट, गोळीबंद पद्धतीने लेखनाचे सादरीकरण करण्यातून शब्दमर्यादा पाळता येते.
विद्यार्थ्यांकडे शब्दसाठा सर्वसाधारण स्वरूपाचा असेल तर लेखन पातळ आणि पसरट  होण्याचा धोका असतो. ही मर्यादा दूर सारण्यासाठी तीन चार शब्दांची ताकद असलेले विशिष्ट शब्द शोधून तसेच एखाद्या वाक्याचा जेवढा अर्थ निघेल त्या ताकदीचे शब्द आत्मसात करणे कधीही श्रेयस्कर ठरते. वजनदार शब्दांमुळे विद्यार्थ्यांना दिलेल्या शब्दमर्यादेत संक्षिप्त पद्धतीने, परंतु अधिक अर्थपूर्ण आणि आशयगर्भ मांडणी करता येते. त्यातून विद्यार्थ्यांना पेपर तपासनीसासमोर लेखनाचा उत्कृष्ट नमुना सादर करून त्यांच्याकडून अधिकाधिक गुण मिळवता येतात.
विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी निवडलेल्या माध्यमातून प्रमाणित संदर्भग्रंथ वाचताना त्यातील वजनदार, क्लिष्ट तसेच अपरिचित शब्द (उदा. गतित्व, स्थित्यंतर, अंतर्वरिोध) टिपून ते स्वतंत्र लिहून काढावेत. त्याबरोबर निवडलेल्या संदर्भ साहित्यातून प्रतिपादनात्मक विधाने (argument) निवडून त्यांचा अर्थ समजून घ्यावा. असे शब्द आणि विधाने स्वतच्या लेखनात उतरवण्याचे प्रयत्न सातत्याने केले तर त्यातून लेखनाचा आलेख उंचावता येतो. एखाद्या प्रश्नाचे उत्तर लिहिताना संबंधित विषयातील मुद्दे अल्प असले तरीही वरील लेखन कृतीमुळे उत्तरांचा विस्तार तसेच दर्जा वाढवता येईल.
सामान्य अध्ययनाची उत्तरे मुद्यांच्या स्वरूपात लिहावीत, की परिच्छेद स्वरूपात असाही प्रश्न सतावत असतो. या समस्येचा अधिक काथ्याकूट न करता दोन्हीतील सुवर्णमध्य साधून उत्तरांचे साचे (framework) बनवता येतात. मुद्दे कमी असतील तर विश्लेषणाची गरज अधिक पडते. प्रश्नांचे स्वरूप पाहूनही तात्काळ निर्णय घेता येतो.
सामान्य अध्ययनाच्या उत्तरपत्रिकांची तपासणी करताना कोणते मापदंड वापरत असतील अशीही शंका मनात येते. वास्तविक पाहता त्यात विषयाची खोली तपासली जात नाही. मुख्यत: उत्तरांचा पस मोठा असायला हवा. त्यातील विविध आयामांना स्पर्श करता यावा. प्रश्न कशावर दृष्टिक्षेप टाकतात हे ओळखून त्याविषयी नेमके विश्लेषण करता यायला हवे. आपली उत्तरे केवळ वर्णनात्मक स्वरूपाची असू नयेत. संबंधित विषयाचे पलू पाडणारे विश्लेषणात्मक लेखन त्यांना अभिप्रेत असते.
 या परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी सामान्य अध्ययनासाठी भरपूर नोट्स काढतात, परंतु लेखनाचा सराव टाळतात. कारण ती कंटाळवाणी प्रक्रिया आहे. सरावाचा अर्थ एखाद्या प्रश्नाचे उत्तरलेखन वारंवार करून त्यात सुधारणा घडवून आणणे होय. १०० ते १५० शब्दातील उत्तराचे साचे परीक्षेच्या तोंडावर तयार होत नाहीत. त्यासाठी अभ्यासाच्या सुरुवातीपासून लेखनसरावाची सवय लावून घेतली तर आपली उत्तरे वेळ आणि शब्दमर्यादेत लिहिता येऊ शकतात. थोडक्यात, लेखन शैलीद्वारे पेपर तपासणीसावर छाप पाडून सामान्य अध्ययनात अधिक गुण संपादित करता येतील.    
admin@theuniqueacademy.com

administrative services
आकांक्षांची परीक्षा..
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था – मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips
यूपीएससीची तयारी :  भूगोल (भाग २)
schools Maharashtra principals
राज्यातील २५ हजारांहून अधिक शाळा मुख्याध्यापकांविना? संचमान्यतेच्या सुधारित निकषांचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी