आयसीएसआय म्हणजेच इन्स्टिटय़ूट ऑफ कंपनी सेक्रेटरी इंडियाच्या सेंटर फॉर कॉर्पोरेट गव्हर्नन्स रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंगतर्फे घेण्यात येणाऱ्या ‘इंटिग्रेटेड कंपनी सेक्रेटरी’ या पूर्णकालीन अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे.
उद्देश व पाश्र्वभूमी
या अभ्यासक्रमाचा मुख्य उद्देश व्यावसायिक शूचितेला चालना देणे व त्यासाठी आवश्यक असणाऱ्या शैक्षणिक पात्रतेच्या जोडीलाच उमेदवारांमध्ये नेतृत्वक्षमता, प्रभावी संवादकौशल्य निर्माण करण्याच्या उद्देशाने प्रत्यक्ष सराव करण्याची संधी देणे हा आहे.
प्रवेशजागा
अभ्यासक्रमामध्ये प्रवेशासाठी उमेदवारांची निर्धारित संख्या ५० आहे.
अभ्यासक्रमाचा तपशील
अभ्यासक्रम अनिवासी स्वरूपाचा असून त्याचा कालावधी तीन वर्षांचा आहे. या कालावधीत एक वर्षांच्या सराव-प्रशिक्षणाचा समावेश आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता
अर्जदारांनी कुठल्याही विषयातील पदवी अभ्यासक्रम किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी अथवा इन्स्टिटय़ूट ऑफ कंपनी सेक्रेटरीजची पात्रताविषयक परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा
अर्जदारांचे वय १ जुलै २०१५ रोजी २६ वर्षांहून अधिक नसावे.
निवड प्रक्रिया
अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना संगणकीय पद्धतीवर आधारित प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. ही प्रवेश परीक्षा २ मे २०१५ रोजी घेण्यात येईल. ज्या अर्जदारांनी सीएटी, एक्सएटी, एनएमएटी, जीएमएटी, एसएनएपी, एमएच-सीईटी यांसारखी प्रवेश पात्रता परीक्षा दिली असेल अशांना संगणकीय प्रवेश परीक्षा देण्याची आवश्यकता नाही.
अर्जदारांची पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व प्रवेश पात्रता परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना कंपनी सेक्रेटरीज इन्स्टिटय़ूटद्वारा २३ व २४ मे २०१५ रोजी समूहचर्चा व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांना अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यात येईल.
संस्थेतर्फे उपलब्ध साहाय्य
अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या उमेदवारांना संस्थेच्या विवेकानंदनगर- सीबीडी, बेलापूर- नवी मुंबई येथील प्रशिक्षण केंद्रानजिक निवास व्यवस्था, शैक्षणिक कर्ज, उन्हाळी प्रशिक्षण व्यवस्था व रोजगारविषयक मार्गदर्शन इत्यादी पुरविण्यात येईल.
अधिक माहिती
अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहितीसाठी इन्स्टिटय़ूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज इंडियाच्या http://www.icsi.edulccgrt या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची मुदत
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर २५ एप्रिल २०१५ पूर्वी प्रवेश अर्ज करावा.