डॉ. नीता ताटके,  क्रीडा मानसतज्ज्ञ

करोनानंतर नोकरी व्यवसायाच्या संधी कशा बदलत जातील, याबद्दल अनेकांच्या मनात शंका आहेत.  टाळेबंदीच्या काळातील ठप्प झालेले व्यवहार आणि अर्थचक्रातील बदल पाहता त्या रास्तही आहेत पण पुढे काय हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहेच. पुढच्या काळातील करिअरचा मार्ग कसा असेल, याविषयी विविध विषयांतील तज्ज्ञांनी लिहीलेली ही लेखमाला..

तारीख: २३ मे २०२०

स्थळ: डसेलडॉर्फ, जर्मनी

१३,००० प्रेक्षकांनी भरलेले स्टेडियम. चँपियन लीगचा पात्रता फेरीचा फुटबॉल सामना. करोनामुळे जगभरात खेळाच्या सामन्यांना प्रेक्षकांच्या उपस्थितीला बंदी असताना हा सामना कसा झाला? आश्चर्य वाटले ना? गंमत म्हणजे १३,०००/- खऱ्याखुऱ्या प्रेक्षकांनी हा सामना घरी बसून दूरचित्रवाणीवर बघितला. प्रेक्षागृहात होते ते या लोकांनी प्रत्येकी सुमारे २० युरो खर्च करून बनविलेले स्वत:चे कागदी ‘कटआऊट्स’ –  खेळाडूंना प्रोत्साहित करणारा प्रेक्षकवर्ग दिसावा म्हणून करोना कहरनंतरचा ‘नव्या व्यवस्थेतील’ नवा पायंडा! कदाचित पुढील स्पर्धेत प्रेक्षकांचा आरडाओरडा, शिटय़ा, उसासे या आवाजांची ध्वनिवर्धक यंत्रणाही उपयोगात आणली जाईल!

जपान ऑलिंपिक्सवर प्रश्नचिन्ह? ऑलिंपिक्स पुढे ढकलणार! ऑलिंपिक्स २०२१ मध्ये होणार! २०२१ मध्ये जर या स्पर्धा झाल्या नाहीत तर अजून पुढे ऑलिंपिक्स घेणे आम्हाला शक्य नाही! वृत्तपत्रात अशा बातम्या झळकायला लागल्या आणि करोनाकहराचा स्पर्धात्मक क्रीडाविश्वावर होणारा परिणाम जाणवायला सुरुवात झाली. जागतिक पातळीवर ऑलिंपिक्स ही अत्यंत महत्त्वाची स्पर्धा. तशी भारतीयांसाठी आय.पी.एल. ही उत्सुकतेने वाट पहिली जाणारी स्पर्धा. ‘आय.पी.एल. होणारच’पासून ‘प्रेक्षकांविना आय.पी.एल. म्हणजे वधूविना विवाह’ ते ‘आय.पी.एल. स्थगित’च्या बातम्यांनी क्रीडाविश्वात होणाऱ्या आर्थिक उलाढालीची व आता होणाऱ्या नुकसानीची जाणीव फक्त क्रिकेटपटूंनाच नव्हे तर तमाम क्रीडाप्रेमींनाही झाली. मार्च- एप्रिल महिन्यांत होणार असलेल्या काही स्पर्धा रद्द झाल्या, काही पुढे ढकलल्या गेल्या. काही ठिकाणी स्पर्धास्थानी पोचलेल्या संघांना स्पर्धा रद्द झाल्याची बातमी सांगून परत पाठविण्यात आले. स्पर्धात्मक क्रीडाविश्वासमोर खूप मोठी  तात्कालिक आणि भविष्यकालीन आव्हाने करोनानामक एका छोटय़ा विषाणूने उभी केली.

खेळणे ही मनुष्याची नैसर्गिक ऊर्मी आहे. लहान वयात खेळ सहज खेळले जातात. जसजसे वय वाढत जाते, तसतसे काही जण प्रत्यक्ष खेळ खेळण्यापासून लांब जातात आणि जसं जमेल तसं ‘मनोरंजनासाठी’ खेळतात. मात्र हा वर्ग प्रेक्षक म्हणून खूप मोठी भूमिका बजावतो. आपल्याला आवडणाऱ्या एखाद्या खेळाडूला मनापासून पाठिंबा देतो, खेळासंबंधीच्या चर्चामध्ये हिरिरीने भाग घेतो आणि खेळासंबंधी होणाऱ्या आर्थिक उलाढालीमध्येही खूप मोठा हातभार लावतो. काही जण आपल्या खेळाची आवड जोपासतात, नियमित खेळतात, मात्र या खेळामागे स्वत:ची तंदुरुस्ती राखणे, छंद जोपासणे वा करमणुकीसाठी खेळणे, खेळाच्या माध्यमातून समाजीकरण साधणे असे विविध उद्देश असतात. तिसऱ्या प्रकारची मंडळी खेळाबाबत जरा अधिक गंभीर असतात. ही मंडळी म्हणजे स्पर्धात्मक खेळ खेळणारे खेळाडू. साधारणपणे लहान वयात यांच्या खेळाची सुरुवात होते. स्पर्धात्मक खेळाचा प्रवास कष्टसाध्य असतो. नियमित व्यायाम, तो करत असताना सहन कराव्या लागणाऱ्या शारीरिक वेदना आणि ठणका, सातत्याचा ध्यास, कंटाळा व वेळप्रसंगी भीती/ चिंता/ अस्वस्थतेवर मात, सोसायटी वा बिल्डिंगमध्ये खेळणाऱ्या/ गप्पा मारणाऱ्या मित्रांबरोबरचा ‘टाइमपास’ सोडून शिस्तबद्ध सराव करण्यासाठी एक वेगळी ऊर्जा लागते. भारतीय समाजात तर इतर अनेक आव्हाने असतात. शाळेच्या व शिकवणीच्या अभ्यासाचे दडपण, विविध सण, कार्यक्रम, समारभांमध्ये अपेक्षित असलेली उपस्थिती आणि या सर्वावर मात करण्याची प्रबळ इच्छा, पालकांची साथ या साऱ्याशिवाय हा प्रवास जवळ-जवळ अशक्यच. हळूहळू हे कष्ट आवडायला लागतात, जीवनशैलीचा भाग बनतात, खेळाची कौशल्ये आत्मसात होऊ लागल्यावर आणि नंतर यश मिळायला लागल्यावर कष्टपूर्तीचा आनंद मिळतो. खेळाडूची कारकीर्द घडायला सुरुवात होते, स्वत:ची खेळाडू म्हणून ओळख मोठी व्हायला सुरुवात होते आणि मग खेळ, सराव, स्पर्धा, पदके, त्यातून मिळणारे सन्मान, प्रसिद्धी याभोवती गुंफले जाते. करोनाने आता या संपूर्ण प्रवासाला, प्रक्रियेला एक वेगळेच वळण दिले आहे.

कोणत्याही स्पर्धेसाठी खेळाडूंची तयारी महिनोंमहिने चालते, आंतरराष्ट्रीय स्पर्धासाठी तर वर्षांनुवर्षे चालते. वयानुसार खेळातून निवृत्त होणारे खेळाडू ‘आता ही आपली शेवटची स्पर्धा’ म्हणून प्रचंड मेहनत करत असतात. या वर्षी जपान ऑलिंपिक्ससाठी निवडले गेलेले खेळाडू, आता जेव्हा के व्हा ही स्पर्धा होईल तेव्हा आपल्या अत्युच्च कामगिरीच्या पातळीवर असतील. एका सूक्ष्मातिसूक्ष्म विषाणूने अनेक विजेत्यांची ही अनमोल संधी एका फटक्यात उडवून लावली आहे. भारतातही कुठल्याही मैदानी स्पर्धा काही महिने तरी सुरू होण्याची शक्यता वाटत नाही. या स्पर्धाच्या  कामगिरीवर कित्येक खेळाडूंचे पुरस्कार अवलंबून असतात. मग शिवछत्रपती, अर्जुन आदी अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कारांचे, क्रीडा शिष्यवृत्त्यांचे, ‘स्पोर्ट्स कोटय़ातील’ प्रवेशांचे काय होणार? अगदी हातातोंडाशी आलेला प्रतिष्ठित स्पर्धेतला सहभाग, ‘या वर्षी माझाच आहे हा पुरस्कार’ हा आत्मविश्वास या सर्वाला लागलेल्या अचानक ‘ब्रेक’मुळे निराश, हतबल झालेले खेळाडू, प्रशिक्षक, पालक आणि संस्था यांना उभे करण्याचे एक मोठे आव्हान क्रीडा क्षेत्रासमोर आज उभे राहिले आहे.

क्रीडा क्षेत्रातील आव्हाने, जगामध्ये येऊ घातलेले व्यावसायिक वारे, प्रेक्षकांची आवड, पारंपरिकता आणि आधुनिकता यांचा अभूतपूर्व संगम साधणारा खेळ म्हणजे क्रिकेट. पाचदिवसीय कसोटीपासून टी-२०पर्यंतचा प्रवास अचंबित करणारा, त्यात समालोचक, सांख्यिकी विश्लेषक यांनादेखील प्रतिष्ठा मिळवून देणारा हा खेळ . योग्य बदल करत आर्थिक संपन्नता आणि आर्थिक संपन्नता आली म्हणून आलेले ‘ग्लॅमर’ यामुळे, तसा कमी देशांत खेळला जात असूनही मोठा झाला. इतर बरेच खेळ मात्र त्याच चौकटीत राहिले. जिम्नॅस्टिक्स/ अ‍ॅथलेटिक्स हे ऑलिंपिक्समधील अत्यंत लोकप्रिय खेळ, तसेच मल्लखांब, खो—खो हे भारतीय खेळ – या व अशाच खेळांमधले काठिण्य, कौशल्य वाढले, वेग वाढला; पण खेळाच्या स्पर्धेच्या चौकटीत मात्र फार फरक नाही पडला. त्यामुळे या सर्वानाच आर्थिक प्रश्न कायमच भेडसावत राहिले, त्यांचा प्रेक्षकवर्गही मर्यादित राहिला. आता या खेळांनी त्यांची पारंपरिकता राखून, खेळाचे स्वरूप आधुनिक करणे व त्याचे ‘ऑनलाइन’ प्रमाणित स्पर्धात्मक अस्तित्व कसे तयार करता येईल याचा विचार करणे हे मोठे आव्हान या सर्व खेळांच्या खेळाडू, पंच, प्रशिक्षक, संघटक व संस्था यांच्यासमोर आहे. यामुळे सरावाची नवीन तंत्रे येतील, नवीन माध्यमांशी जुळवून घ्यायला सुरुवातीला अवघड जाईल; पण कात टाकून जो उभा राहील तो क्रीडाजगताला ताकदवान बनवेल.

कोणत्याही स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचलेले खेळाडू साधारणत: कौशल्याच्या दृष्टीने सारखे असतात, त्यामुळे स्पर्धा खेळताना जो मानाने कणखर राहतो, स्वत:च्या, इतरांच्या अपेक्षांचे दडपण घेऊ शकतो, ताणाचे समायोजन करू शकतो तो जिंकतो. यासाठी क्रीडा मानसतज्ज्ञाची गरज वादातीत आहे. टाळेबंदीच्या काळात काही मानसतज्ज्ञांनी खेळाडूंचे मनोधैर्य राखणे, कौशल्यांचा मानसिक सराव घेणे, संघभावना कायम ठेवणे आदी अनेक बाबींवर काम केले. टाळेबंदीनंतरही यांना चांगली मागणी राहणार आहे. प्रत्यक्षात शारीरिक सरावावर असलेली बंधनं अजून बरेच दिवस राहतील, त्यामुळे आहारतज्ज्ञदेखील आता आणि नंतरही महत्त्वाची भूमिका बजावतील. खेळाचे एक खूप मोठे काम जाणार आहे संगणकाची तांत्रिक बाजू चांगली सांभाळणाऱ्या व्यक्तींकडे. त्यामुळे खेळाच्या ‘बजेट’मध्ये या तंत्रज्ञानसंबंधित गोष्टींसाठी राखून ठेवणे गरजेचे होणार आहे.

करोनामुळे एक नक्की झाले आहे, तुमच्याकडे कितीही मोठ्ठे पद, रग्गड पैसा, तुडुंब भरलेले ज्ञानभांडार किंवा शस्त्रास्त्रांचा खजिना असला, तरी तुमचं अस्तित्व मुळात केवळ तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर अवलंबून असेल. ही रोगप्रतिकारक शक्ती फक्त आणि फक्त खेळातून, व्यायामातून, मेहनतीतूनच मिळविता येते. खेळाडूंची चांगली रोगप्रतिकारक शक्ती ही मोठी जमेची बाजू आहे. आता खेळाचा, व्यायामाचा वसा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला तर निरोगी समाजाला कोणताही विषाणू रोखू शकणार नाही आणि खेळ बंद पडणार नाही. आपले वैयक्तिक प्रावीण्य वाढविण्याबरोबर, खेळ, व्यायाम यांचे महत्त्व खेळाडूंनीसुद्धा समाजापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. यामुळे खेळाच्या ‘पिरॅमिड’चा पाया विस्तृत होईल आणि खेळाडू त्याच्या टोकावर सहज जाऊन बसतील. हो ना?