महानगरी मुंबईतील डबेवाल्यांना व त्यांच्या एकूणच कार्यप्रणालीला एक प्रदीर्घ व गौरवशाली परंपरा लाभली आहे. सुमारे २९० वर्षांपासून मुंबईत काम करणाऱ्या लाखो चाकरमान्यांना त्यांचे जेवणाचे डबे वेळेत, योग्य ठिकाणी आणि प्रसंगी पाऊस-पाणी, अपघात-घातपात या साऱ्यांवर मात करून सातत्याने डबा पुरवणाऱ्या या डबेवाल्यांचे कौतुक जनसामान्यांपासून ब्रिटनच्या राजकुमारापर्यंत व इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेन्टपासून जगद्विख्यात हॉवर्ड बिझनेस स्कूलपर्यंत साऱ्यांनीच केले असून त्याचा अभ्यास-अनुकरण या साऱ्यांनाच फलदायी ठरले आहे.
सद्यस्थितीत मुंबईतील डबेवाल्यांची संख्या सुमारे पाच हजारांवर असून ते नूतन मुंबई टिफिन सप्लायर्स ट्रस्ट व मुंबई डबे-संस्थान लवाद समिती या मध्यवर्ती संस्थांशी संलग्न आहेत. त्यांचे कामकाजाचे जाळे चर्चगेटपासून वसई-विरापर्यंत आणि छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून कर्जत-कसाऱ्यापर्यंत व्यापले असून, महाराष्ट्रातील विशेषत: पुणे जिल्ह्य़ातील जुन्नर-राजगुरूनगर परिसरातून येणाऱ्या डबेवाल्यांच्या पिढय़ान-पिढय़ांनी मोठय़ा निष्ठेने हा व्यवसाय केला आहे.
मात्र आपलं काम चोख करणाऱ्या मुंबईतील डबेवाल्यांपुढे मुंबईतील त्यांची संख्या कमी होण्याचे एक वेगळेच संकट गेल्या काही वर्षांपासून उभे ठाकले आहे. विशेषत: २००६ मध्ये मुंबईत झालेल्या लोकल गाडय़ांमधील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणानंतर मुंबईतील डबेवाल्यांची संख्या रोडावत चालली असून, गेल्या पाच वर्षांत त्यांची संख्या सुमारे २५ टक्के कमी होणे ही बाब केवळ मुंबईसाठीच नव्हे तर प्रत्यक्ष डबे-वाहतूक करणाऱ्या डबेवाल्यांसाठीसुद्धा काळजीचा विषय ठरला आहे.
नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स ट्रस्टचे अध्यक्ष यमाजी घुले यांच्या मते, त्यावेळच्या बॉम्बस्फोटानंतर लोकलमधील जेवणाच्या डब्यांकडे पण काळजीपूर्वक-संयमाने बघितले जात असून, सर्वच प्रमुख कार्यालये-कंपन्या व शाळांमध्ये डब्यांची कसून तपासणी करण्यात येते. परिणामी डबे इच्छितस्थळी पोहोचविण्यात वेळ होत असून, यातून डबेवाल्यांचे वेळापत्रक पुरतेपणी बिघडले आहे. याशिवाय अनेक कार्यालये-कंपन्यातील कर्मचाऱ्यांनी या साऱ्या प्रकारावर तोडगा म्हणून आपापल्या ठिकाणचेच जेवण घेण्यास सुरुवात केली. याचाच परिणाम डबेवाल्यांची संख्या घटण्यात झाला असून, हा प्रकार गेली पाच वर्षे सुरूच आहे.
मुंबईतील डबेवाल्यांची संख्या कमी होण्याचे अन्य महत्त्वपूर्ण कारण म्हणजे पूर्वी ग्रामीण भागातील तरुणांना मुंबईत जाऊन त्यांच्या घरी पिढय़ान्पिढय़ा करण्यात येणाऱ्या या जिकिरीच्या कामाबद्दल जे आकर्षण होते, ते आता झपाटय़ाने कमी होऊ लागले आहे. पूर्वीच्या तुलनेत आता पुण्याच्या ग्रामीण भागातही बऱ्यापैकी औद्योगिक विकास होत असल्याने त्या भागातील युवक अर्थातच आपल्या परिसरातील उद्योगांमध्ये काम करण्यास प्राधान्य देत असून, मुंबईत डबेवाला म्हणून दाखल होणे त्यांच्या दृष्टीने दुय्यम ठरत आहे.
अशा प्रकारे मुंबईच्या डबेवाल्यांना कवी केशवसुतांच्याच भाषेत सांगायचे म्हणजे ‘गडय़ा अपुला गाव बरा’ असे वाटू लागल्याने व त्यामुळे मुंबईतील त्यांची संख्या लक्षणीय स्वरूपात घटू लागल्याने मुंबईकरांपुढे नजीकच्या भविष्यात एक वेगळीच समस्या उभी राहू शकते, हे निश्चित.