जेमतेम बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या तामिळनाडूतल्या उसीलामपट्टी या गावात राहणाऱ्या एम. नागराजन यांनी तयार केलेल्या लसूण सोलणाऱ्या यंत्राविषयी..
कोणताही मसालेदार पदार्थ कांदा आणि लसूण यांच्या वापराशिवाय केला जात नाही, असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. अन्नपदार्थाला चटकदार चव आणि स्वाद देणारे कांदा आणि लसूण हे दोन वैशिष्टय़पूर्ण पदार्थ. लसणामध्ये आम्ल रस सोडला तर कटू, तिक्त, कशाय, मधुर, लवण हे पाचही रस असतात. त्यामुळे लसणाच्या वापराने पदार्थाला चांगली चव येते. लसणाचे औषधी गुणधर्मही सर्वश्रुत आहेत. पण अन्नपदार्थाला चटकदार चव देणाऱ्या लसणाचा वापर करण्यापूर्वी काहीशी त्रासदायक आणि कंटाळवाणी वाटणारी लसूण सोलण्याची क्रिया करावी लागते. लसणाचा वापर जर जास्त प्रमाणात करावा लागत असेल तर हे काम आणखीनच जिकिरीचं होतं. मोठमोठी हॉटेल्स, लग्नसमारंभाचे कॅटर्स, त्याचप्रमाणे मसाले, लोणची आणि पापड उद्योजक यांची लसणाची मागणी मोठय़ा प्रमाणावर असते. अशा वेळी लसणाच्या पाकळ्या वेगळ्या करून त्या सोलण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो आणि त्यासाठी जास्त मजुरीही मोजावी लागते. तामिळनाडूतल्या मदुराईपासून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या उसीलामपट्टी या गावात राहणाऱ्या एम. नागराजन यांनी लसूण सोलण्याची क्रिया अतिशय सोपी केली आहे.
नागराजन यांनी लसूण सोलणारं एक यंत्र तयार केलं आहे. पिठाच्या गिरणीमध्ये ज्याप्रमाणे वरच्या बाजूला असलेल्या फनेलमधून धान्य टाकल्यावर खालच्या बाजूने पीठ बाहेर पडतं, अशाच प्रकारचं हे यंत्र आहे. या यंत्राच्या वरच्या बाजूला असलेल्या फनेलमधून लसूण आतमध्ये टाकल्यावर खालच्या बाजूने सोललेले लसूण बाहेर येतात. या यंत्राला वरच्या बाजूला असलेल्या पाइपमधून हवेच्या झोताद्वारे फोलपटं बाहेर फेकली जातात.
मदुराई जिल्ह्यातला उसीलामपट्टी या गावाच्या आजूबाजूचा परिसर भातशेतीसाठी प्रसिद्ध आहे. उसीलामपट्टी गावात नागराजन यांच्या वडिलांचा तांदूळ सोलण्याचा ‘व्हर्गो इंडस्ट्री’ नावाचा एक लहानसा कारखाना होता. गावातले लोक शेतातून निघालेला तांदूळ या कारखान्यातून सडून घेऊन तो भात गिरण्यांना पुरवत असत. नागराजन या कामात आपल्या वडिलांना मदत करत असत. सारं काही ठीकठाक सुरू असताना दुष्काळ पडला. सतत काही र्वष दुष्काळाची परिस्थिती राहिल्याने जिल्ह्यातल्या भातशेतीवर विपरीत परिणाम झाला. त्यामुळे भात गिरण्या बंद पडल्या. साहजिकच नागराजन यांच्या कारखान्यात फोलपटं काढण्यासाठी येणारा तांदूळ बंद झाला आणि उपजीविकेची समस्या निर्माण झाली.
कामाच्या शोधात असलेल्या नागराजन यांना लोणचं तयार करणाऱ्या एका स्थानिक कारखान्यातून लसूण सोलण्यासाठी एखादं यंत्र तयार करण्याची ऑफर आली. तांदूळ सडण्याचं यंत्र वापरण्याचा अनुभव असलेले नागराजन ताबडतोब असं यंत्र तयार करण्याच्या कामाला लागले. या कामात त्यांच्या वडिलांनी त्यांना आवश्यक ती तांत्रिक मदत केली. दोन वर्षांच्या अथक परिश्रमानंतर प्राथमिक स्वरूपातलं लसूण सोलणारं यंत्र तयार करण्यात नागराजन यांना यश आलं. ही घटना २००२ सालातली. नागराजन यांनी उत्तरोत्तर या यंत्रात प्रगती केली आहे.
नागराजन यांनी तयार केलेलं लसूण सोलणाऱ्या या यंत्रात दोन अश्वशक्तीची मोटर आहेत. ही मोटर अर्थातच विजेवर चालते. यंत्रात विशिष्ट प्रकारे बसवण्यात आलेल्या ब्लेडस्मुळे लसणाच्या पाकळ्या सोलल्या जातात. विशेष म्हणजे, या यंत्रातून सोलले जाताना लसणाचे तुकडे होत नाहीत तर लसणाच्या आख्ख्या पाकळ्या मिळतात. या यंत्रामध्ये बसवण्यात आलेल्या ब्लोअर्समधून जोराने हवा बाहेर टाकली जाते आणि या हवेमुळे फोलपटं बाहेर फेकली जातात. बाहेर टाकलेली फोलपटं एका ठिकाणी गोळा होतात. एका तासात तब्बल २०० किलो लसूण या यंत्राच्या मदतीने सोलला जातो. म्हणजेच या यंत्रामुळे लसूण सोलणं सोपं आणि जलद झालं आहे. हे यंत्र साफ करणंसुद्धा अतिशय सोपं आहे.
लसूण सोलण्याच्या या यंत्रानंतर नागराजन यांनी िलबाच्या फोडी करणारं यंत्र तयार केलं. या यंत्राच्या मदतीने मध्यम आकाराच्या एका िलबासारख्या आकाराच्या आठ फोडी केल्या जातात. एका तासात सुमारे ४५० किलो िलबांच्या फोडी करण्याची या यंत्राची क्षमता आहे.
या यंत्रामुळे लोणचं उद्योगात महत्त्वाची असलेली दोन कामं अतिशय सुलभतेने आणि कमी वेळात करणं शक्य झालं. या दोन्ही यंत्रांचं एकस्व मिळवून देण्यासाठी आणि या यंत्रांचं उत्पादन सुरू करण्यासाठी अहमदाबादच्या ‘नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन’ या संस्थेने नागराजन यांना मदत केली. ‘व्हर्गो इंजिनीअिरग वर्क्‍स’ याच नावाने नागराजन यांनी ही यंत्रं तयार करण्याचा कारखाना सुरू केला.
आजतागायत नागराजन यांनी लसूण सोलण्याची अडीचशेहून अधिक यंत्रे तयार करून विकली आहेत. सुमारे दोन लाख ६० हजार किमतीच्या या यंत्राला अगदी काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत मागणी आहे. मुंबई- पुण्यातही लोणची आणि पापड तयार करणाऱ्या उद्योजकांनी ही यंत्रं विकत घेतल्याचं नागराजन नमूद करतात.
अलीकडेच नागराजन यांनी ‘फाइव्ह इन वन’ म्हणजे पाच कामं करणारं यंत्र तयार केलं आहे. या यंत्राचा वापर करून लसूण सोलता येतात, लहान आणि मोठय़ा आकाराचे कांदे सोलता येतात, काजू फोडता येतात आणि शेंगा फोडून शेंगदाणे वेगळे करता येतात. या यंत्राची किंमत साडेचार लाख रुपये आहे. आत्तापर्यंत अशी २० यंत्रं तयार करून नागराजन यांनी
विकली आहेत.
http://virgofe.com/ या इंटरनेट संकेतस्थळावर नागराजन यांच्या ‘व्हर्गो इंजिनीअिरग वर्क्‍स’ आणि त्याद्वारे तयार करण्यात येणाऱ्या सर्व यंत्रांची माहिती उपलब्ध करण्यात आलेली आहे.  
जेमतेम बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या या तुमच्या-आमच्यातल्या संशोधकाने आज यशस्वी उद्योजक म्हणूनही नाव कमावलं आहे. उपजतच असलेली यंत्रांची आवड आणि अन्नप्रक्रिया उद्योगात काम करण्याचं मिळालेलं बाळकडू या जोरावर नागराजन यांची वाटचाल सुरू आहे; भविष्यात आणखीही अशी यंत्रं तयार करण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
 hemantlagvankar@gmail.com

CIDCO lottery winners, possession of home
दोन वर्षांपासून ताबा न मिळालेले लाभार्थी सिडकोच्या दारी
Concerned about the security of Indians in Iranian custody
जहाजावरील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय चिंतेत; इराणच्या ताब्यातील भारतीयांच्या सुरक्षेची चिंता
Anti Gundam Squad beaten Goon
पिंपरीत नागरिकांना त्रास देणाऱ्या गुंडाला गुंडा विरोधी पथकाचा चोप; ठोकल्या बेड्या
Nagpur RTO has succeeded in getting 90 percent revenue compared to target given by government
नागपूर ‘आरटीओ’ मालामाल! गेल्यावर्षीच्या तुलनेत…