News Flash

तणावरहित वातावरण गरजेचे!

परीक्षेत यश मिळण्याकरता घराचे मानसिक आरोग्य उत्तम राहणे अत्यावश्यक आहे.

तणावरहित वातावरण गरजेचे!
डॉ. हरीश शेट्टी, मानसोपचार तज्ज्ञ

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअरची पुढील दिशा सुस्पष्ट व्हावी, याकरता ९ व १० डिसेंबर रोजी ठाण्याच्या टिपटॉप प्लाझा येथे विद्यालंकार प्रस्तुत आणि एसआरएम युनिव्हर्सिटी यांच्या सहकार्याने ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादाचे उद्घाटन ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या उपस्थितीत झाले. या परिसंवादात करिअर विषयक विविध पैलूंबाबत तज्ज्ञांनी केलेल्या मार्गदर्शनाचा संपादित अंश देत आहोत..

परीक्षेत यश मिळण्याकरता घराचे मानसिक आरोग्य उत्तम राहणे अत्यावश्यक आहे. आपल्या पाल्याने उत्तम मार्क मिळवावेत म्हणून पालकांचा असणारा दबाव, मुलांच्या अभ्यासातील प्रगतीवर नाराज असणाऱ्या पालकांची धुसफुस या सगळ्याचा मुलांच्या प्रगतीवर अनिष्ट परिणाम होतो आणि मुलांमध्ये अभ्यासाबाबत भीती आणि तणाव वाढू लागतो, केलेला अभ्यासही त्यांच्या लक्षात राहत नाही. मुलाच्या केवळ अभ्यासातील प्रगतीसाठी नव्हे तर त्याच्या सर्वागीण यशासाठी घरातील वातावरण हलकेफुलके, हसरे आणि तणावरहित असणे आवश्यक आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी हे शाळा-महाविद्यालयांमधून नव्हे तर घरातील प्रयोगशाळेत घडतात, हे पालकांनी लक्षात ठेवायला हवे. मुलांना अभ्यास करण्याची प्रेरणा मिळेल, प्रोत्साहन मिळेल असे घरातील वातावरण असायला हवे. मुलाला आपली थोरवी सांगण्यापेक्षा पालकांनी मुलांशी मित्रत्वाचे नाते प्रस्थापित करायला हवे. मुलांशी संवाद कायम ठेवायला हवा. फोन, गेम्स, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सची भेट देऊन मुलांच्या लेखी अशा गोष्टींचे महत्त्व वाढवू नका. फोनचा अतिरेकी वापर स्वत: टाळा आणि मुलालाही स्मार्ट फोनपासून दूर ठेवा. स्मार्ट फोन हा अभ्यासातील सर्वात मोठा व्यत्यय आहे, हे लक्षात असू द्या.
दहावी-बारावीचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी ज्या मित्रांच्या सोबतीने आपला आत्मविश्वास वाढतो, अशा मित्रांसोबत अभ्यास करावा. प्रत्येकाच्या अभ्यासाच्या पद्धती आणि वेळा वेगवेगळ्या असतात. लिखाण, वाचनासारख्या कुठल्या पद्धतीने तसेच कुठल्या वेळात आपला अभ्यास चांगला होतो, हे लक्षात घेऊन अभ्यास करावा. परीक्षा जवळ आली की केलेला अभ्यास आठवत नाही, अशी अनेक विद्यार्थ्यांची तक्रार असते. त्यामागचे कारण म्हणजे राग अथवा भीती. प्रश्नपत्रिका सोडवताना आधी येत असलेले प्रश्न सोडवावेत, अख्खा पेपर चाळत बसून कुठले येत नाहीत, याचा तणाव घेऊ नये. प्रश्न सोडवल्यानंतर जमल्यास १० सेकंदांची विश्रांती घ्यावी. या कालावधीत दीर्घश्वसन करावे.

अभ्यास करताना..
* अभ्यास करताना ३५ मिनिटांनी दहा मिनिटांचा ब्रेक जरूर घ्या. ब्रेकमध्ये टीव्ही पाहू नका, त्याऐवजी व्यायाम करा, फळे खा, घरातल्या व्यक्तींशी
गप्पा मारा.
* अभ्यासाची सुरुवात सोप्या विषयांनी करा, म्हणजे अभ्यास करण्यात स्वारस्यही येते आणि ताजातवाना झालेला मेंदू कामाला सुरुवात करतो.
* अभ्यास करताना फोन पूर्णपणे बंद ठेवा, सायलेंट मोडवरही नको.
* परीक्षेची अथवा अभ्यासाची भीती बाळगू नका, त्यामुळे आत्मविश्वास कमी होतो. भीतीची कारणे शोधलीत तर त्यावर उपाय योजणे सोपे होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2015 12:03 am

Web Title: dr harish shetty career guidance
Next Stories
1 अंगभूत गुणांना झळाळी मिळो!
2 नवी संधी
3 एमबीए: संभ्रम दूर करा..
Just Now!
X