डॉ. सिद्धीविनायक बर्वे

सजीवांच्या अंतरंगात डोकावत सजीवांतील अभिक्रियांचा वापर करून मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता असलेले शास्त्र आहे जीवतंत्रज्ञान..एकीकडे जीवतंत्रज्ञानामुळे मानवी जीवन अधिक सुखकर होते आहे, तर दुसरीकडे सजीव सृष्टीची गुपिते जाणून घेत जीवतंत्रज्ञानामुळे संपूर्ण सजीव सृष्टीवर नियंत्रण मिळवता येणे आता शक्य होते आहे. जीवतंत्रज्ञानामुळे सजीव सृष्टीचे नियंत्रण करणाऱ्या डीएनए रेणूचे अंतरंग उलगडणे शक्य झाले आहे. रेणवीय जीवतंत्रज्ञानातील डीएनए रेणूच्या जोडीतोडीतून नवीन जनुकीय प्रजाती निर्माण करणे शक्य झाले आहे. जीनोमिक्स, बायोइन्फर्मेटिक्ससारख्या तंत्रज्ञानामुळे सजीव सृष्टीची जणू बाराखडीच मानवाच्या हाती लागली आहे. अन् यावर कळस म्हणजे सजीव सृष्टीची अनमोल निर्मिती मानल्या गेलेल्या मानव प्राण्यांची हुबेहूब प्रतिकृती बनविण्याचे तंत्र विकसित झाले आहे. प्रतिरूप सजीव निर्मिती किंवा क्लोनिंग तंत्र..

Sandhya Devanathan
व्यवसाय वाढीमध्ये ‘एआयʼची महत्त्वाची भूमिका, मेटाच्या व्यवस्थापकीय संचालक संध्या देवनाथन यांचे मत
indias first hydrogen powered ferry
विश्लेषण : पंतप्रधान मोदींकडून हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या देशातील पहिल्या बोटीचे उदघाटन, काय आहेत वैशिष्ट्ये? जाणून घ्या…
mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips
MPSC मंत्र : भूगोल मूलभूत अभ्यास
pune,Giant Metrewave Radio Telescope, indigenous technology, research, 38 countries, scientists, narayangaon
पुणे : स्वदेशी ‘जीएमआरटी’चा ३८ देशातील शास्त्रज्ञांकडून वापर

आपल्या सभोवतालच्या जीवसृष्टीवर नियंत्रण मिळविण्याची मानवाची अनादिकाळापासून इच्छा राहिली आहे. मानवाच्या या प्रयत्नातून वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीवावर नियंत्रण मिळविण्यात जीवतंत्रज्ञानाच्या साहाय्याने मानवाला यश मिळाले. आता पाळी आहे ती मानव प्राण्याची. जणू एखादी परीकथा प्रत्यक्षात यावी किंवा एखादी विज्ञानकथा प्रत्यक्षात साकारावी असे जीवतंत्रज्ञान आहे. या आधुनिक शास्त्रातील प्रगतीमुळे रोज नवनवीन क्रांतिकारी शोध लागत आहेत अन् या साऱ्यांवर कळस म्हणजे विकसित झालेले सजीवांची हुबेहूब प्रतिकृती निर्माण करणारे क्लोनिंगचे तंत्र.

जीवतंत्रज्ञानाच्या साहाय्याने सजीवावर नियंत्रण मिळवीत आगेकूच करत जीवतंत्रज्ञानाची क्रांती जगभर उलगडते आहे. या शास्त्रातील आव्हाने तरुणाईला खुणावत आहेत.. अमर्याद शक्यता असलेल्या या शास्त्राचा वापर शेती, उद्योग, वैद्यकीय एवढेच काय पण पर्यावरण क्षेत्रातही वाढत आहे. जीवतंत्रज्ञान हे आंतरशाखीय शास्त्र आहे..जीवनावर नियंत्रण मिळविणाऱ्या शास्त्रात अनेक ज्ञानशाखांचा समावेश होतो.. क्लोनिंग तंत्रज्ञानात बहुतेक ज्ञानशाखांचा समन्वय होतो. रेणवीय जीवशास्त्र, प्राणिशास्त्र, वैद्यकशास्त्र अशा अनेक ज्ञानशाखांच्या समुच्चयातून साकारते ते क्लोनिंगचे तंत्र..

जनुकीयदृष्टय़ा एकसारखे असलेल्या सजीवांची निर्मिती करणारे तंत्र आहे प्रतिरुप सजीव निर्मितीचे क्लोनिंग तंत्रज्ञान.. पृथ्वीवरील सर्वप्रथम सस्तन सजीवांचे क्लोनिंग एका मेंढीचे करण्यात आलं.. ब्रिटनमधील एडिंबरा येथील रोझ्ॉलिन इन्स्टिटय़ूटमधील डॉ. इयान विल्मट या शास्त्रज्ञाने जगातील सर्वप्रथम प्रतिरूप सजीवाची प्रयोगशाळेत निर्मिती करण्यात यश संपादन केले.. या क्रांतिकारी शोधामुळे जीवनाची संकल्पना बदलून गेली.. पृथ्वीवरील अनमोल निर्मिती असणाऱ्या सजीव प्राण्यांची प्रतिरूप निर्मिती हे अशक्यप्राय असणारे काम आता क्लोनिंग तंत्रामुळे शक्य झाले आहे.

प्रतिरूप तंत्राचा वापर केवळ जनुकीयदृष्टय़ा समान असणाऱ्या सजीवांची निर्मिती करणे एवढाच मर्यादित नसून या तंत्राचा वापर जीवतंत्रज्ञानात अनेक प्रकारे करण्यात येतो. या तंत्राद्वारे उत्तम जनुकीय गुणधर्म असलेल्या सजीवांची निर्मिती केली जाऊ शकते..या तंत्राद्वारे उत्तम जनुकीय गणधर्म असलेल्या सजीव पेशीच्या केंद्रकातील जनुकीय घटक त्याच प्रजातीच्या फलित बीजांडात संक्रमित केले जातात. अशा तऱ्हेने तयार केल्या गेलेल्या नवीन बीजांडाची वाढ त्या प्रजातीच्या गर्भाशयात केली जाते.. अशा तऱ्हेने तयार करण्यात येतात क्लोन प्रजाती.. कुठल्याही सामान्य सजीवातील जनुकीय रचनेत त्या सजीवाच्या माता-पित्याकडून प्राप्त झालेले जनुकीय घटक समप्रमाणात अस्तित्वात असतात, पण प्रतिरूप सजीवांची जनुकीय रचना हुबेहूब क्लोन केलेल्या प्राण्यासारखी असते.

या तंत्राच्या साहाय्याने जनुकांचे क्लोनिंग करणेही शक्य होते. सजीवांतील उपयोगी जनुके सूक्ष्मजीवांत संक्रमित करून या तयार झालेल्या पारजनुक म्हणजेच ट्रान्सजेनिक सूक्ष्मजीवांचे तसेच प्राण्यांचेही क्लोनिंग करता येणे शक्य होणार आहे. मानवी शरीरातील मधुमेहावर नियंत्रण मिळविणाऱ्या इन्सुलिनची निर्मिती करणारे जनुक पारजनुक तंत्रज्ञानाद्वारे जीवाणूंच्या पेशीत संक्रमित करण्यात येऊन या नवीन जीवाणू प्रजातीची वाढ क्लोनिंग तंत्राद्वारे करण्यात येते. या जीवाणूंद्वारे मोठय़ा प्रमाणावर इन्सुलिनची निर्मिती करता येणे शक्य होते.

याच प्रकारे वनस्पती, प्राणी तसेच सूक्ष्मजीवातील मानवास उपयोगी ठरणाऱ्या जनुकांचे मोठय़ा प्रमाणावर क्लोनिंग करून अनेक मानवोपयोगी घटकांची निर्मिती करण्यात येते. मानवास लागणारे औषधी घटक, प्रथिनं तसेच वितंचकांची निर्मिती करण्यात येते. या तंत्राद्वारे निर्मित घटक उच्च गुणवत्तेचे तसेच मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होऊ शकतात. जीनोम तंत्र तसेच जीवमाहिती शास्त्राद्वारे उपलब्ध माहितीद्वारे योग्य जनुके शोधून त्यांचे क्लोनिंग करुन त्याचा मानवजातीस फायदा करून देणे हे एक मोठे आव्हान आहे. जीवतंत्रज्ञानाची क्रांती उलगडत असताना युवकांनी या आव्हानाला पेलण्यासाठी सज्ज होण्याची गरज आहे.

जीवतंत्रज्ञानातील क्लोनिंग तंत्राचा उपयोग जगातील अनेक उद्योगधंद्यांत करण्यात येतो. जगातील अनेक नामांकित विद्यापीठे तसेच महाविद्यालयांतून हा विषय शिकविला जातो. भारतात प्रतिरूप सजीवांची निर्मिती करणाऱ्या अनेक प्रगत संस्था कार्यरत आहेत. कर्नाल येथील नॅशनल डेअरी रिसर्च फाउंडेशन (http://www.ndri.res.in) तसेच हिस्सार येथील आयसीएआर संचालित सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ रिसर्च या संस्था आणि अनेक महाविद्यालयांतून प्रतिरूप सजीव निर्मिती तंत्रज्ञान विषय अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

प्रतिरूप सजीव तंत्रज्ञान हे अत्यंत प्रगत आधुनिक आणि सजीवांवर नियंत्रण मिळवू शकणारे शास्त्र आहे. त्याचा अत्यंत विवेकी वापर करणे, हे आपले कर्तव्य ठरते. झपाटय़ाने पसरणाऱ्या जीवतंत्रज्ञानाच्या क्रांतीतील हा महत्त्वाचा टप्पा आहे, त्याची योग्य ती माहिती करून घेणे ही काळाची गरज आहे.

(लेखक, केळकर शिक्षण संस्थेच्या सायंटिफिक रिसर्च सेंटर, मुलुंड येथे संचालक म्हणून कार्यरत आहेत.)