18 March 2019

News Flash

हरित दिवाळीचा धडा

दिवाळीमध्ये मोठय़ा प्रमाणात फटाके लावले गेल्याने ध्वनी आणि वायुप्रदूषण होते.

|| रोहिणी शहा

दिवाळीमध्ये मोठय़ा प्रमाणात फटाके लावले गेल्याने ध्वनी आणि वायुप्रदूषण होते. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो. तोच कमी करण्याच्या हेतूने केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाकडून हरित दिवाली – स्वस्थ दिवाली मोहीम राबविण्यात येते. या मोहिमेची ठळक वैशिष्टय़े पुढीलप्रमाणे –

 • ही मोहीम पथदर्शी तत्त्वावर सन २०१७ च्या दिवाळीमध्ये राबविण्यात आली. सन २०१८ पासून संपूर्ण देशातील शाळा व महाविद्यालयांमध्ये राबविण्यात येणार आहे.
 • दिवाळीमध्ये फटाके वाजविण्याऐवजी गरीब व वंचित मुलांना भेटवस्तू, मिठाई व खाद्यपदार्थ वाटण्यास प्रोत्साहन देणे असे या मोहिमेचे स्वरूप आहे.
 • तसेच फटाक्यांमुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या ऱ्हासाबाबत जागृती निर्माण करणे आणि सर्व हितसंबंधीयांमध्ये प्रदूषणाचा मुकाबला करण्याची प्रेरणा निर्माण करणे यासाठी पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात.
 • सन २०१७ च्या मोहिमेनंतर दिल्लीमधील दिवाळीतील प्रदूषणाची पातळी लक्षणीयरीत्या कमी झाली असल्याचे निदर्शनास आल्याने मोहिमेची व्याप्ती सन २०१८ मध्ये संपूर्ण देशामध्ये वाढविण्यात आली आहे.
 • यावर्षी ही मोहीम ‘ग्रीन गुड डीड’ या मोहिमेशी संलग्न करण्यात आली आहे.

आनुषंगिक मुद्दे

हिवाळ्यामध्ये उत्तर भारतातील विविध भागांमध्ये खरीप पिकांचा खोडवा जाळणे, कचरा जाळणे आणि दिवाळीतील फटाके यांचा एकत्रित परिणाम म्हणून धुक्याचे रूपांतर धुरक्यामध्ये होते. तसेच थंड हवामानामुळे प्रदूषित हवा उंचावर जाण्याचे प्रमाण कमी झाल्याने वायुप्रदूषणाची तीव्रता मोठय़ा प्रमाणात वाढते. यामुळे राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने सन २०१६ मध्ये खोडवा जाळण्यावर बंदी घातली. तर फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाशी मुकाबला करण्याच्या दृष्टीने हरित दिवाली मोहिमेचा फायदा होऊ लागला आहे.

फटाक्यांचे अपाय

फटाक्यांमध्ये पोटॉशिम क्लोरेट पावडर, अ‍ॅल्युमिनिअम, मॅग्नेशिअम, बेरिअमचे क्षार, तांब्याचे क्षार, सोडिअम, लिथिअम, स्ट्रॉन्शिअम इत्यादी ज्वलनशील पदार्थ असतात. यांच्या ज्वलनातून विषारी वायू, तसेच नुकसानकारक धूर निघतात. सल्फर डाय ऑक्साईड आणि नायट्रोजनची ऑक्साईड हे प्रदूषक वायू आणि ध्वनिप्रदूषण यांचा विशेषत: लहान मुले, वयोवृद्ध आणि रुग्णांवर अपायकारक परिणाम होतो. शिवाय त्यातून मोठय़ा प्रमाणात कचरा निर्माण होतो. जो परत जाळलाच जातो त्यामुळे पुन्हा वायुप्रदूषण होते.

वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन संस्थेचे हरित (कमी प्रदूषक) फटाके

वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन संस्थेने कमी वायुप्रदूषण करणारे हरित फटाके विकसित केले आहेत. या फटाक्यांमध्ये अपायकारक रासायनिक संयुगेरहित आहेत. म्हणून त्यांना हरित फटाके म्हणण्यात येते. या फटाक्यांची वैशिष्टय़े

पुढीलप्रमाणे –

 • राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, नागपूर व केंद्रिय इलेक्ट्रो रासायनिक संशोधन संस्था, करैकुडी (तामिळनाडू) यांनी एकत्रितपणे हे फटाके विकसित केले आहेत.
 • SWAS (Safe Water releaser), SAFAL(Safe Minimal Aluminium) आणि STAR(Safe Thermite Cracker) अशी या फटाक्यांची नावे आहेत.
 • या फटाक्यांमध्ये धूळ खाली बसविणारे (dust suppressant) आणि वायू उत्सर्जनाची तीव्रता कमी करणारे घटक म्हणून पाण्याच्या वाफेचा वापर करण्यात आला आहे.
 • STAR फटाके हे पोटॅशिअम नायट्रेट आणि गंधक (Sulphur) रहित आहेत. त्यामुळे हवेतील pm प्रदूषके ३० ते ३५ टक्क्यांनी कमी होतील.
 • SAFAL फटाके हे अ‍ॅल्युमिनिअमचा कमीत कमी वापर करून बनविण्यात आले आहेत. त्यामुळे हवेतील pm प्रदूषके ३५ ते ४० टक्क्यांनी कमी होतील.
 • या फटाक्यांची ध्वनी तीव्रता नेहमीच्या फटाक्यांइतकीच म्हणजे १०५ ते ११० डेसिबल इतकी आहे. मात्र यांची किंमत १५ ते २० टक्क्यांनी कमी आहे.
 • हवेतील pm प्रदूषके २० ते २५ टक्क्यांनी कमी होतील अशा प्रकारे फुलबाजी आणि पाऊस (flower pots) या फटाक्यांचे रासायनिक सूत्र बदलण्यात यश मिळाले आहे. यांची क्षमता इतर फटाक्यांइतकीच पण कमी वायू आणि ध्वनिप्रदूषण करणारी आहे.
 • खनिज तेल आणि स्फोटके सुरक्षा संघटनेकडून (PESO) सर्व प्रकारच्या स्फोटक पदार्थाच्या उत्पादन, साठवणूक आणि वाहतुकीतील सुरक्षेबाबत नियमन करण्यात येते. पेसोकडून मान्यता मिळाल्यावर या फटाक्यांचे सन २०१८ च्या दिवाळीसाठी शिवकाशीमध्ये उत्पादन सुरू करण्यात येईल.
 • भारतातील फटाके उद्योगामध्ये पाच लाख कुटुंबांना रोजगार मिळतो तर दरवर्षी या उद्योगातून ६००० कोटी रुपये इतकी उलाढाल होते.

सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

 • सर्वोच्च न्यायालयाने देशातील फटाक्यांच्या वापराबाबत पुढील निर्देश २४ ऑक्टोबर रोजी दिले आहेत
 • फटाक्यांमध्ये बेरिअमचे क्षार वापरण्यावर पूर्ण बंदी.
 • पेसोने ध्वनी तीव्रता आणि वायुप्रदूषणाच्या मर्यादा निश्चित कराव्यात.
 • पेसोने विहित केलेल्या कमी प्रदूषण करणाऱ्या तसेच हरित फटाक्यांची विक्री परवाना धारकांकडून करण्यात यावी.
 • ई-कॉमर्स संकेतस्थळांनी फटाक्यांची ऑनलाइन विक्री करू नये.
 • दिवाळीमध्ये सायंकाळी ८ ते १० व ख्रिसमस, नववर्षांच्या समारंभात रात्री ११.५५ ते १२.३० इतक्या कालावधीमध्येच फटाके वाजविण्यात यावेत.

First Published on November 7, 2018 12:23 am

Web Title: eco friendly diwali celebration 2018