News Flash

.. कसं असेल दहा वर्षांनंतरचं शिक्षण?

‘दहा वर्षांनंतर शिक्षण कसे असेल.. याची कल्पना करा बरं,’ आमच्या एका प्रशिक्षकानं आम्हाला उद्देशून सांगितलं आणि मग एकाहून एक गमतीदार (आजच्या काळात स्वप्निल मानली जातील

| April 14, 2014 01:08 am

‘दहा वर्षांनंतर शिक्षण कसे असेल.. याची कल्पना करा बरं,’ आमच्या एका प्रशिक्षकानं आम्हाला उद्देशून सांगितलं आणि मग एकाहून एक गमतीदार (आजच्या काळात स्वप्निल मानली जातील अशी) उत्तरं येऊ लागली.. कुणी सांगितलं, ‘१० वर्षांनी कदाचित शाळा नसेल.. मूल घरी संगणकाच्या आधारे शिकेल..’ कुणीतरी म्हणालं, ‘तंत्रज्ञानाचा जास्तीतजास्त समावेश शिक्षणात केला जाईल.’ कुणी म्हणालं, ‘मुलं माहितीसाठी अथवा ज्ञानासाठी शिक्षकावर अवलंबून नसतील, कारण अद्ययावत गॅझेट्स त्यांच्या हाताशी असतील, त्यामुळे शिक्षकांची भूमिका आणि त्याचे महत्त्व नंतरच्या काळात कमी होईल..’ या चर्चेतून असे अनेक मुद्दे पुढे आले. यातून एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित झाला तो असा की, माहितीचे इतर स्रोत उपलब्ध झाल्यामुळे शिक्षकांची भूमिका यापुढच्या काळात फॅसिलिटेटर म्हणून राहील.
इस्रायलचे परराष्ट्र मंत्रालय, मशाव ही इस्रायलची आंतरराष्ट्रीय विकास साधण्यासाठी कार्यरत असणारी संस्था आणि दि ए. ओफ्री इंटरनॅशनल ट्रेनिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने २५ दिवसीय ‘शिक्षणव्यवस्थेतील इनोव्हेशन आणि उद्योजकता’ हा अभ्यासक्रम जेरुसलेम येथे आयोजित करण्यात आला होता. त्यातील एका सत्रात बोलताना इस्रायलच्या उच्च शिक्षण परिषदेचे सदस्य आणि जागतिक कीर्तीचे डिझायनर प्रा. एझ्री तेर्झी यांनी सांगितले की, आगामी काळ अधिक गुंतागुंतीचा आणि सततच्या बदलांचा असल्याने या बदलांसाठी विद्यार्थ्यांना तयार करणे अत्यावश्यक आहे. त्यांच्या बोलण्यातील अनेक मुद्दे आपल्या शिक्षणव्यवस्थेतील त्रुटींना लागू होत होते..
सध्या कुठल्या विद्याशाखांना महत्त्व प्राप्त झालंय, हे लक्षात घेत पालक आणि विद्यार्थी अमुक एका विद्याशाखेला प्रवेश घेण्यासाठी जिवाचा आटापिटा करतात. पण अनेकदा असं होतं की, जेव्हा शिक्षणक्रम संपवून विद्यार्थ्यांच्या हातात डिग्री येते, तोपर्यंत त्या विशिष्ट विद्याशाखेची क्रेझ आणि बाजारपेठेतील त्या शिक्षण- प्रशिक्षणाचा अंमल संपुष्टात आलेला असतो. हे दुष्टचक्र भेदण्याचा दाद देण्याजोगा प्रयत्न इस्रायलच्या शिक्षणव्यवस्थेत होताना दिसतो. समाजविकासाच्या दूरगामी गरजा लक्षात घेत इस्रायलच्या शिक्षणव्यवस्थेची बांधणी करण्यात आली आहे. पुस्तकी ज्ञान, घोकंपट्टी यांना अवाजवी महत्त्व न देता शालेय पातळीवर प्रकल्प काम, सादरीकरण, वाद-संवाद या गोष्टींचे महत्त्व इस्रायली शिक्षणव्यवस्थेत अधोरेखित करण्यात आले आहे. तेथील शिक्षणक्रमात प्रयोगशील शाळांचा अभ्यासक्रम अत्यंत लवचीक पद्धतीने रचला जातो. त्यात शाळा आणि शिक्षकांनाही अभ्यासक्रमाचा २५ टक्के भाग रचण्यास वा निवडण्यास वाव मिळतो.
विद्यार्थ्यांमधील पाच आयामी बुद्धिमत्ता- आकलनविषयक बुद्धिमत्ता, सर्जनशील बुद्धिमत्ता, भावनिक बुद्धिमत्ता, नैतिक, सामाजिक बुद्धिमत्ता आणि त्याचे उपयोजन यांचा विकास कसा होईल, यावर इस्रायलच्या शिक्षणक्रमात भर देण्यात आला आहे.
प्रा. तेर्झी म्हणाले की, विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट देताना तो विषय विद्यार्थ्यांच्या कुतूहलाला चालना मिळेल, त्यांच्या सर्जनशीलतेला उत्तेजन मिळेल आणि नवं काहीतरी शोधण्याची त्यांना प्रेरणा मिळेल, असा असायला हवा. उदा. त्यांच्या कॉम्प्युटरमध्ये कुठल्या सॉफ्टवेअरचा समावेश असावा, असे त्यांना वाटते, हा जर प्रोजेक्टचा विषय दिलेला असेल तर मुलं नक्कीच न कंटाळता काम करतात, हा स्वानुभवही त्यांनी कथन केला.
भविष्यात ज्या गोष्टींना वाव आहे, अशा गोष्टींसाठी मुलांना आताच तयार करायला हवे, याबाबत ते आग्रही होते. या मुद्दय़ाच्या पुष्टीकरता त्यांनी एक उदाहरण दिले. अमुक एका वंशीय लोकवस्तीत एकटय़ा राहणाऱ्या  वयस्कर महिलांसोबत काही वेळ व्यतीत करणे. अथवा त्यांच्याकडून वेगवेगळे खाद्यपदार्थ शिकायला जाणे आणि त्या बदल्यात मुलांनी या महिलांना पसे देणे अशा तऱ्हेचा प्रोजेक्ट इस्रायलच्या एका शाळेत राबवला गेला. यामुळे एकटय़ा राहणाऱ्या या महिलांना सोबत मिळाली, त्यांना माफक पसे मिळाले. मुलांना त्यांच्याकडून शिकता आले, जो खाद्यपदार्थाचा वारसा जनरेशनेक्स्ट जपेल आणि त्यापलीकडे समाजातील दोन पिढय़ांमध्ये सुसंवाद निर्माण व्हायला संधी मिळाली आणि वयस्कर पिढीचा एकटेपणा दूर झाला. शाळकरी मुलांच्या या प्रोजेक्टला सामाजिक, वांशिक, सुरक्षिततेचा, नतिक असा संदर्भ होता.
मुलांना प्रोजेक्ट देताना सर्जनशीलता, बहुआयामी गुणवत्ता, तंत्रज्ञानाची आणि डिझायिनगची ओळख या गोष्टींचा समावेश केल्यास त्यातून मुलाची प्रगती हा अंतिम उद्देश साधला जातो, हे तेथील शाळांच्या भेटीत सुस्पष्ट झाले.
प्रोजेक्टवर काम करताना मुलाने संकल्पनात्मक उडी घेणे आवश्यक आहे, असेच विषय विद्यार्थ्यांना देण्यात येतात. यात विद्यार्थ्यांने डिझाइनपासून प्रत्यक्ष उत्पादन निर्मिती करणे अपेक्षित असते. आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे या उत्पादनाला उपयोजन असणे (त्याचा प्रत्यक्ष उपयोग करता येणे) आवश्यक असते. इस्रायलच्या शाळा-शाळांच्या भेटींमध्ये तिसरी-चौथीतल्या मुलांच्या प्रोजेक्टच्या विषयाची निवड ते त्यासंबंधीचे टप्प्याटप्प्यातील संशोधन काम आणि अंतिम उत्पादन वा अहवाल हे डोळ्यात अंजन घालणारे होते. यानिमित्ताने आपल्याकडे प्रोजेक्टच्या नावाखाली पालकवर्गाने इंटरनेटच्या मदतीने पाल्याचा प्रकल्प पूर्ण करण्याचा सारा प्रकार प्रोजेक्ट वर्कच्या संकल्पनांनाच सुरुंग कसा लावतो, हेही पुरते कळले. इस्रायलमधला शाळकरी विद्यार्थी (पहिली ते बारावी) समूहाने अथवा स्वतंत्ररीत्या आपले प्रोजेक्ट इतरांसमोर सादर करतो.. आणि त्यासाठी आवश्यक ठरणारी संवादकौशल्ये, देहबोली, वाद-संवाद या कौशल्यांची रीतसर तासिका तिथल्या शाळांमध्ये असते. आइन करेम या प्रयोगशील शिक्षण देणाऱ्या माध्यमिक शाळेत वनौषधी, रसायने यांच्यापासून साबणनिर्मिती, आकर्षक पॅकिंगपर्यंतचे सारे काम विद्यार्थी करत होते. शालेय पातळीवरील संशोधनात्मक प्रकल्पाचे अंतिम रूप हे उत्पादन असू शकते आणि त्यातून प्रत्यक्ष उद्योजकतेची बीजे कशी रुजत जातात, हे सुस्पष्ट करणारी होती.
प्रा. प्रा. तेर्झी यांनी हीच संकल्पना उलगडून सांगितली. उत्पादन प्रक्रियेत नव्या कल्पना मांडणे, मतभेदांना तोंड देणे, सामंजस्याने काम करणे या सर्व गोष्टी अंतर्भूत असतात. बाजारपेठ, मार्केटिंगची कल्पना, यशस्वी प्रकल्पाचे डॉक्युमेन्टेशन या सर्वाचाही त्यात समावेश असतो. या सर्व गोष्टी शिक्षणाला कशा लागू करता येतील, याचा विचार करण्याची निकड त्यांनी व्यक्त केली आणि त्यासाठी मुळात शिक्षक कसा असायला हवा, हेही सांगितले. शिक्षकाने विद्यार्थ्यांना योग्य प्रश्न विचारायला शिकवायला हवं. तो स्वत: ज्ञानाचा भोक्ता हवा. निवडक माहिती मुलांना देत त्याने विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना द्यायला हवी. तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा हे शिकवायला हवे, असे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले.
इनोव्हेशन म्हणजे काय तर सारखे शिकत राहणे आणि प्रयोगशील असणे. विद्यार्थ्यांना सततच्या बदलांना तयार करणे हे केवळ इनोव्हेशन आणि प्रयोगशीलता या तंत्रांचा शिक्षणक्रमात केलेल्या समावेशानेच शक्य होते, हे लक्षात घेत इस्रायली शिक्षणव्यवस्थेत इनोव्हेशनसाठी शाळा लॅब म्हणून उपयोगात आणल्या जात आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना नवनवे विषय शोधून त्यावर संशोधन काम करायला दिलं जातं. यामुळे विद्यार्थी आपोआपच ‘कम्फर्ट झोन’च्या पलीकडे झेपावत विचार करण्याची सवय त्यांना लागते. इतर क्रमिक विषयासोबत प्रत्यक्ष संशोधन आणि निर्मितीचा अनुभव त्यांना कमी वयात मिळतो.
इस्रायलच्या प्रयोगशील शाळांमध्ये विद्यार्थी जे प्रकल्प करतात, त्या प्रत्येकाचा विषय हा अभिनव (आजवर शाळेत कुणीही न केलेला) असा असावा लागतो. त्याखेरीज सद्य गरजांशी मिळताजुळता असा तो प्रकल्प असणे अपेक्षित असते. त्यात विद्यार्थ्यांने कृती संशोधन करणे अपेक्षित असते. विद्यार्थ्यांनी तयार केलेले प्रोजेक्ट आणि त्याचे सादरीकरण याला किती गुण द्यावेत, हे शिक्षक त्या विद्यार्थ्यांशी चर्चा करून ठरवतात.
इस्रायलच्या शिक्षण विभागात इनोव्हेशनसंबंधीचा स्वतंत्र विभाग आहे. त्या विभागाच्या संचालक गनित वाइनस्टाइन यांनी सांगितले की, आतापर्यंत देशातील इनोव्हेटिव्ह शाळांमधून इस्रायलमध्ये एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे. १५ हजार शिक्षक, एक हजार मुख्याध्यापक आणि इस्रायलच्या २५ शहरांतील ६०० शाळा यात सहभागी झाल्या आहेत. यात शिकलेल्या विद्यार्थ्यांच्या नंतरच्या शैक्षणिक आणि करिअरच्या कारकिर्दीवरही लक्ष ठेवले जाते. औद्योगिक क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, कौशल्ये, नेतृत्वगुण, सामाजिक जागरूकता, संघभावना, आऊट ऑफ बॉक्स विचारसरणी आणि नवीन आयडियाज या शाळा मुलांमध्ये रुजवतात.
क्लिनिकल सायकोलॉजिस्ट डॉ. शहाफ गल यांच्या मते, शिक्षणाचा खरा अर्थ म्हणजे पोकळी शोधून ती भरून काढणे हा आहे. इस्रायलच्या शिक्षणपद्धतीत नवे शोधणे, आव्हाने आणि बदलत्या परिस्थितीचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला जातो. प्रत्येक शाळेच्या भेटीत तिथले शिक्षक, मुख्याध्यापक आवर्जून सांगत होते, पुढच्या वर्षी जर तुम्ही शाळा बघायला याल, तर हे उपक्रम दिसणार नाहीत. आणखी काहीतरी वेगळं, नवीन तुम्हाला दिसेल. सतत बदल करणं आणि विकास साधत राहणं, हे वाक्य शिक्षणक्रमाशी जोडणारा इस्रायलसारखा दुसरा देश क्वचितच असेल.     
भविष्यकालीन समाज आणि त्यातील संभाव्य गरजांवर उतारा शोधणारे युवा नेतृत्त्व आजच्या शिक्षणव्यवस्थेतून तयार व्हावे, या दृष्टीने शक्य तितके प्रयत्न इस्रायलमध्ये होताना दिसतात. नवनवे संशोधन आणि सर्जनशीलता आणि उपयुक्ततेचा मेळ घालणाऱ्या उत्पादनांनी उभ्या जगाला समृद्ध करणाऱ्यांमध्ये इस्रायलचे आणि तिथल्या नागरिकांचे प्रमाण अधिक का आहे, याचे उत्तर तिथल्या प्रयोगशील शिक्षणात दडलेले आहे.                                                     
suchita.deshpande@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2014 1:08 am

Web Title: education after ten years
Next Stories
1 संशोधनाच्या पद्धती
2 विदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
3 यूपीएससी : वैद्यकीय सेवा परीक्षा
Just Now!
X