|| योगेश बोराटे

संस्थेची ओळख – देशाची ईशान्येकडील राज्ये ओळखली जातात, ती त्यांच्या निसर्गसंपन्नतेमुळे. आसामही त्याचाच एक भाग. याच आसाममधील तेजपूर विद्यापीठ सध्या नसíगक संसाधनांच्या सुयोग्य वापराद्वारे आधुनिक ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणारे महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित होत आहे. विद्यापीठ स्थापनेसाठी आवश्यक अशा स्वतंत्र कायद्याच्या आधाराने २१ जानेवारी, १९९४ रोजी स्थापन झालेले हे निवासी केंद्रीय विद्यापीठ यंदा ‘एनआयआरएफ’च्या राष्ट्रीय पातळीवरील मूल्यांकनामध्ये पहिल्या तीस विद्यापीठांपकी एक ठरले आहे. पारंपरिक अभ्यासक्रमांच्याच जोडीने चालणारे निवडक विशेष अभ्यासक्रम आणि विद्यार्थ्यांसाठीच्या अत्याधुनिक सोयी-सुविधांच्या मदतीने केवळ स्थानिकच नव्हे, तर परराज्यामधील तसेच परदेशांमधील विद्यार्थ्यांनाही आपल्याकडे आकृष्ट करून घेऊ लागले आहे. मध्य आसामच्या सोनितपूर जिल्ह्य़ामधील नपाम परिसरामध्ये हे विद्यापीठ वसले आहे. विद्यापीठाच्या २६२ एकरांच्या निसर्गरम्य आवारामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्जनाला आणि उद्यमशीलतेला चालना देण्याचे व्यापक प्रयत्न केले जात आहेत.

विभाग आणि अभ्यासक्रम – तेजपूर विद्यापीठाच्या स्थापनेपासूनच या विद्यापीठामध्ये प्रत्यक्ष सराव आणि प्रशिक्षणावर भर देणारे अभ्यासक्रम चालविण्यास चालना देण्यात आली. सध्या या विद्यापीठामधील चार स्कूल्समधून जवळपास वीस वेगवेगळे विभाग चालतात. या विभागांच्या मदतीने विद्यापीठाने आपल्या विद्यार्थ्यांसाठी निवडक असे ७४ अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले आहेत. त्यामध्ये वेगवेगळ्या पदवी, पदव्युत्तर पदवी, संशोधन, पदव्युत्तर पदविका आणि प्रमाणपत्र स्वरूपातील अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

विद्यापीठामध्ये पदवी पातळीवरील इंटिग्रेटेड अभ्यासक्रमांना चालना दिली जात आहे. विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनीअिरगमध्ये सिव्हिल इंजिनीअिरग, कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनीअिरग, इलेक्ट्रिकल इंजिनीअिरग, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन इंजिनीअिरग, फूड इंजिनीअिरग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल इंजिनीअिरग या विषयांमधील बी. टेक.चे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. स्कूल ऑफ ह्य़ुमॅनिटीज अ‍ॅण्ड सोशल सायन्सेस अंतर्गत चालणाऱ्या शिक्षणशास्त्र विभागामध्ये बी. एड., तर इंग्लिश अ‍ॅण्ड फॉरेन लँग्वेज विभागामध्ये सर्टिफिकेट इन चायनिज, इंटिग्रेटेड बी.ए.बी.एड., इंटिग्रेटेड एम.ए. इंग्लिश हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. स्कूल ऑफ मॅनेजमेंट सायन्सेसमधील कॉमर्स विभागांतर्गत इंटिग्रेटेड एम. कॉम.चा अभ्यासक्रम चालविला जातो. तर स्कूल ऑफ सायन्सेसमध्ये विद्यार्थ्यांना केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स, फिजिक्स या विज्ञानाच्या मूलभूत विषयांसाठी इंटिग्रेटेड बी. एस्सी. बी.एड. आणि इंटिग्रेटेड एम.एस्सी.चे अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याच स्कूलमध्ये मॉलिक्युलर बायोलॉजी अ‍ॅण्ड बायोटेक्नोलॉजी विभागांतर्गत बायोसायन्सेस अ‍ॅण्ड बायोइन्फम्रेटिक्स विषयामधील इंटिग्रेटेड एम.एस्सीचा अभ्यासक्रमही चालविला जातो.

तेजपूर विद्यापीठाने पदव्युत्तर पातळीवरही विद्यार्थ्यांसाठी नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले आहेत. त्यामध्ये एम. टेक. बायोइलेक्ट्रॉनिक्स, एम. टेक. एनर्जी टेक्नॉलॉजी, कल्चरल स्टडिज विभागांतर्गत चालणाऱ्या एम. ए. कल्चरल स्टडिज, इंग्लिश अ‍ॅण्ड फॉरेन लँग्वेजेस विभागांतर्गत चालणाऱ्या लिंग्विस्टिक्स अ‍ॅण्ड लँग्वेज टेक्नॉलॉजी आणि लिंग्विस्टिक्स अ‍ॅण्ड एन्डेंजर्ड लँग्वेजेस या दोन विषयांमधील एम. ए. अभ्यासक्रमांचा समावेश होतो. विद्यापीठाच्या हिंदी विभागामध्ये एम. ए. हिंदी आणि हिंदी भाषांतरासाठीचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम चालतो. जनसंज्ञापन व पत्रकारिता विभागांतर्गत एम. ए., तसेच एम. ए. कम्युनिकेशन फॉर डेव्हलपमेंट हा वेगळा अभ्यासक्रमही उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याशिवाय एम. ए. सोशल वर्क, एम. ए. सोशिओलॉजी, एलएलएम, चाईल्ड राइट्स अ‍ॅण्ड गव्हर्नन्स आणि विमेन्स स्टडिज या दोन विषयांमधील पदव्युत्तर पदविकाही विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. विद्यापीठाच्या कम्युनिटी कॉलेजमध्ये डिप्लोमा इन पॅरालिगल प्रॅक्टिस हा एक वेगळा अभ्यासक्रम चालविला जातो. त्याशिवाय विद्यापीठामध्ये केमिस्ट्री, एन्व्हायर्न्मेंटल सायन्स, मॉलिक्युलर बायोलॉजी अ‍ॅण्ड बायोटेक्नोलॉजी, फिजिक्स या विषयांमधील एम. एस्सी., एम. सी. ए., एम. कॉम., तसेच विविध विषयांमधील पीएच.डी.चे अभ्यासक्रमही चालविले जातात. योग आणि व्हायोलिनविषयक अभ्यासक्रम करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

सुविधा – या विद्यापीठामधील शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या प्रवेशपूर्व चाचण्यांमधील गुणांच्या आधारावर प्रवेश निश्चिती केली जाते. त्यामुळे केवळ आसाम वा आजूबाजूच्या परिसरामधीलच नव्हे, तर देशाच्या इतर राज्यांमधील विद्यार्थ्यांना या विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणे शक्य होते. इंजिनीअिरगच्या अभ्यासक्रमांसाठी जेईई- मेन आणि गेट, व्यवस्थापनविषयक अभ्यासक्रमांसाठी कॅट आणि मॅट, बायोटेक्नोलॉजीविषयक अभ्यासक्रमांसाठी सीईईबी, तर इतर विषयांसाठी विद्यापीठाच्या स्वत:च्या अशा प्रवेश परीक्षेमधील विद्यार्थ्यांच्या कामगिरीच्या आधारावर प्रवेश निश्चिती केली जाते. देशभरात महत्त्वाच्या शहरांमध्ये या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रे उपलब्ध करून दिली जातात. त्या आधारे या विद्यापीठामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाच्या निवासी संकुलामध्ये सुसज्ज वसतीगृहांच्या जोडीने मध्यवर्ती ग्रंथालयाची सुविधाही उपलब्ध आहे. विद्यापीठाच्या संकुलामध्ये जवळपास साडेतीन हजारांवर विद्यार्थी आणि संशोधक राहू शकतील अशी निवासी व्यवस्था उपलब्ध आहे. संशोधन करू इच्छिणाऱ्या विवाहित उमेदवारांसाठीही या विद्यापीठामध्ये स्वतंत्र वसतीगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. निवासी व्यवस्थेसाठी विद्यापीठ केवळ गुणवत्तेच्या आधारावरच प्रवेश देते. विद्यापीठाच्या मध्यवर्ती ग्रंथालयामध्ये सर्व अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी एकत्रितपणे ८० हजारांवर पुस्तकांचा ठेवा उपलब्ध करून देण्यात आला आहे. या जोडीने दहा हजारांवर नियतकालिके, विविध डेटाबेस, ई- जर्नल्स वापरण्याची सुविधाही विद्यार्थ्यांना मिळते. अत्याधुनिक संशोधनासाठी आवश्यक अशी अ‍ॅनालिटिकल इन्स्ट्रमेंटेशन सेंटरची स्वतंत्र सुविधाही विद्यापीठामध्ये उभारण्यात आली आहे. विद्यापीठामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवरील १४ शिष्यवृत्ती योजनांचा लाभ मिळू शकतो, ही प्रवेशोच्छुक उमेदवारांसाठी तशी जमेची बाजू ठरते.

borateys@gmail.com