जागतिक स्तरावर शिक्षणासंदर्भात जागतिक बँक आणि इतर संस्था सातत्याने सर्वेक्षण करीत असते. सर्वच देशांमधील विद्यार्थ्यांचे मूल्यांकन काढण्यासाठी ‘पिसा’चा (प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेण्ट) अहवाल आणि आकडेवारी महत्त्वाची मानली जाते. सातत्याने या अहवालामध्ये अमेरिका आणि युरोप खंडांतील विद्यार्थ्यांपेक्षा चीन आणि दक्षिण आशियातील विद्यार्थ्यांचे मूल्यांकन सर्वोत्तम दिसत आहे. काही वर्षांपूर्वी युरोपातील सर्वच प्रगत राष्ट्रांपेक्षा चीन, जपान, दक्षिण कोरियामधील विद्यार्थ्यांची गणित आणि इतर विषयांतील  प्रगती सर्वाधिक दिसत होती. पिसाच्या अहवालानुसार युरोपीय राष्ट्रांनी आपल्या शिक्षण कार्यक्रमात आशियाई प्रारूप अंगीकारले. यंदाच्या जागतिक बँक आणि पिसाच्या पाहणीत चीन आणि व्हिएतनाममधील विद्यार्थ्यांमध्ये आपल्या समकक्ष अमेरिकी विद्यार्थ्यांहून अधिक गुणवत्ता असल्याचे सिद्ध झाले आहे. गणित, वाचन, आकलन आणि उपक्रम यांच्याबाबत पाहणीमध्ये व्हिएतनाम, जपान, चीनमधील विद्यार्थी अधिक प्रगत असल्याचे समोर आले आहे. गंमत म्हणजे कमी शिक्षणसाधनांत आशियाई विद्यार्थी अमेरिकी विद्यार्थ्यांहून सरस असल्याचे हा अहवाल म्हणतो. त्यामुळे अमेरिका आपल्या पुढील शिक्षण आराखडय़ात दक्षिण आशियाई प्रारूप राबविते का, याबाबत उत्सुकता आहे.

संकलन – रसिका मुळ्ये