द आइनस्टाइन सेंटर फॉर न्युरोसायन्सेस बर्लिन (ECN) या संशोधन संस्थेकडून न्युरोसायन्सेस विषयातील पीएच.डी.च्या संशोधनासाठी प्रवेश घेऊ  इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठय़वृत्ती दिली जाते. या पाठय़वृत्ती कार्यक्रमाअंतर्गत पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी प्रवेश व त्यासहित पाठय़वृत्तीचे इतर सर्व लाभ देण्यात येतात. या पाठय़वृत्तीसाठी जीवशास्त्र शाखेतील कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी पूर्ण केलेल्या आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

पाठय़वृत्तीविषयी

द आइनस्टाइन सेंटर फॉर न्युरोसायन्सेस बर्लिन (ECN) ही जर्मनीतील संशोधन संस्था न्युरोसायन्सेस या विषयातील मूलभूत व महत्त्वाचे संशोधन करणारी प्रमुख संशोधन संस्था आहे. न्युरोसायन्सेसमध्ये अद्ययावत संशोधन होत असलेली संस्था म्हणून नावलौकिक मिळवलेली ईसीएन ही फक्त युरोपमध्ये नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरसुद्धा परिचित आहे. जर्मनीतील ‘द बर्लिन स्कूल ऑफ माईंड अँड ब्रेन’, ‘द बर्नस्टेन सेंटर फॉर कॉम्प्युटेशनल न्युरोसायन्सेस बर्लिन’, ‘द सेंटर फॉर स्ट्रोक रिसर्च बर्लिन’, ‘द क्लस्टर ऑफ एक्सलन्स न्युरोकेअर’ या न्युरोसायन्सेसमध्ये गेली अनेक वर्षे संशोधन करणाऱ्या चार प्रमुख संशोधन संस्थांनी एकत्र येऊन द आइनस्टाइन सेंटर फॉर न्युरोसायन्सेस बर्लिनची स्थापना केलेली आहे. याबरोबरच ईसीएनला इतरही काही विद्यापीठांचे आर्थिक सहकार्य नेहमी मिळालेले आहे. म्हणूनच अशा अनेक प्रमुख विद्यापीठांच्या सहकार्याने ईसीएन विविध शैक्षणिक व संशोधन उपक्रम राबवण्यामध्ये नेहमी पुढाकार घेत असते. या उपक्रमांमधील एक म्हणजेच दरवर्षी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना पीएच.डी. अभ्यासक्रमांसाठी मोफत प्रवेश व पाठय़वृत्तीचे लाभ बहाल करणे. दरवर्षीप्रमाणे ऑगस्ट २०१८ साली सुरू होणाऱ्या या पाठय़वृत्ती कार्यक्रमाअंतर्गत पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी यावर्षी ठरावीक अर्जदारांची निवड केली जाणार आहे. या पाठय़वृत्ती कार्यक्रमासाठी संस्थेकडून प्रतिमाह १४६८ युरोजची आर्थिक मदत अर्जदाराला मिळणार आहे. याव्यतिरिक्त अर्जदारास आंतरराष्ट्रीय आरोग्य विम्याचे फायदे घेता येतील. यासंबंधित अधिक माहिती त्याने दुव्यामध्ये दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन मिळवावी.

आवश्यक अर्हता

ही पाठय़वृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे. अर्जदार नामांकित विद्यापीठ किंवा संशोधन संस्थेमधून जीवशास्त्राशी संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर पदवीधर असावा. अर्जदाराची पदवी व पदव्युत्तर स्तरावर शैक्षणिक पाश्र्वभूमी अतिशय उत्तम असावी. पदव्युत्तर पातळीवर त्याचा विशेष श्रेणीमध्ये जीपीए असावा. अर्जदाराचा पदव्युत्तर अभ्यासक्रमादरम्यान केलेल्या संशोधनाचा प्रकल्प अहवाल हा एक महत्त्वाचा निकष निवडीकरिता संस्थेने ठरवलेला आहे. त्यामुळे अर्जदाराने गुणात्मक संशोधन व दर्जात्मक अहवाल या बाबींना प्राधान्यक्रम द्यावा. अर्जदाराचे इंग्रजी व जर्मन भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. अर्जदाराने जीआरई परीक्षा देणे बंधनकारक नाही. मात्र दिली असल्यास, जीआरई परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेला असावा. तसेच भारतीय विद्यार्थ्यांनी टोफेल किंवा आयईएलटीएस यांपैकी एक इंग्रजीची परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

अर्ज प्रक्रिया

या पाठय़वृत्तीसाठी अर्जदाराने त्याचा अर्ज संस्थेच्या ऑनलाइन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून यादीमध्ये दिलेल्या कागदपत्रांच्या सॉफ्ट प्रतींसह संस्थेच्या संकेतस्थळावरच जमा करायचा आहे. यासाठी अर्जदाराला अर्जप्रणालीच्या माध्यमातून स्वत:ची प्रोफाईल तयार करावी लागेल. या प्रोफाईलच्या माध्यमातून फक्त पूर्ण झालेला अर्जच स्वीकारला जाईल. अर्जासह अर्जदाराने त्याचे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रशस्तिपत्र, एसओपी, सीव्ही, जीआरई व टोफेल या परीक्षांचे गुण, शाळा सोडल्याचे प्रशस्तिपत्र, दोन शिफारसपत्रे, संशोधनाचे किंवा कार्यानुभवाचे प्रशस्तिपत्र, पदवी / पदव्युत्तर अभ्यासक्रमादरम्यान केलेल्या संशोधनाचा प्रकल्प अहवाल, अर्जदाराच्या प्रस्तावित संशोधनाचा लघू प्रबंध, तसेच त्याच्या आवडीच्या संशोधन-विषयांची माहिती व या संस्थेशी संबंधित असलेल्या तीन प्रयोगशाळांची प्राधान्यक्रमाने तयार केलेली यादी इत्यादी गोष्टी जोडाव्यात. शिफारसपत्रांसाठी मात्र अर्जदाराने त्याच्या संशोधन पाश्र्वभूमीशी संबंधित असलेल्या प्राध्यापकांचे ई-मेल अर्जामध्ये नमूद न करता प्रत्यक्ष शिफारसपत्रे अर्जासह जोडावीत.

निवड प्रक्रिया 

अर्जदाराची संशोधनातील गुणवत्ता लक्षात घेऊन गुणवत्तेनुसार अंतिम निवड करण्यात येईल. अंतिम निवड झालेल्या अर्जदारांना त्यांच्या निवडीबाबत कळवले जाईल.

 

उपयुक्त संकेतस्थळ 

https://www.ecn-berlin.de/

अंतिम मुदत 

या पाठय़वृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. १४ जानेवारी  २०१८ आहे.

 

प्रथमेश आडविलकर

itsprathamesh@gmail.com