फॅशन क्षेत्रात उदयाला आलेल्या नवा संधींचा परिचय करून देणारा लेख
फॅशन इंडस्ट्रीत बदलत्या ट्रेण्डस्ची दखल घेणे, पावलोपावली असणाऱ्या स्पर्धेत तरणे या दोन महत्त्वाच्या आव्हानांचा सामना करावा लागतो. अलीकडे या क्षेत्रातील ‘स्पेशलायझेशन’मुळे करिअरच्या नवनव्या संधी निर्माण होऊ लागल्या आहेत. गुणवत्ता, प्रशिक्षण आणि अनुभव या तिन्ही आघाडय़ांवर तुम्ही बाजी मारलीत तर या क्षेत्रात स्थिरावता येते.
डेडलाइनचा ताण सांभाळत वेळेत सर्जनशील काम पूर्ण करणे या क्षेत्रात आवश्यक ठरते. मातब्बर फॅशन इन्स्टिटय़ूटमधील वातावरण फॅशनविषयक अभ्यासाला पोषक असते. त्याचबरोबर तांत्रिक गोष्टींसोबत प्रत्यक्ष व्यवसाय करताना अपेक्षित असणारी अनेक कौशल्ये या ठिकाणी शिकायला मिळतात. इंडस्ट्रीची गरज, ओळख इथे विद्यार्थ्यांना करून दिली जाते आणि विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला आकार देण्याचे कामही संस्था करतात. शिवाय या क्षेत्रातील बदलते ट्रेण्ड, लोकांच्या गरजा या बाबींविषयीचे ज्ञान फॅशन इन्स्टिटय़ूटमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांला होते. त्यामुळेच संस्थेमधील प्रशिक्षण हे ढोबळमानाने फक्त पाठय़पुस्तकी ज्ञान असलेले डिझायनर तयार करणे हे नसून तिथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्वत:च्या सृजनशीलतेबाबत आत्मविश्वास निर्माण हा असतो. यातूनच विद्यार्थी व्यावसायिकदृष्टय़ा सक्षम होतात.
फॅशन डिझायनिंग क्षेत्र म्हणजे एक सातत्याने शिकण्याची आणि नवनिर्मितीची प्रक्रिया आहे. तुमच्यामध्ये दडलेला कलाविष्कार सर्वासमोर आणण्यासाठी या डिझाइिनगच्या क्षेत्रात प्रचंड वाव तर आहेच, पण त्यासाठी आवश्यक असणाऱ्या मुबलक संधीदेखील उपलब्ध आहेत.
या क्षेत्रातील संधी – फॅशन डिझायिनगच्या सहा महिन्यांच्या इंटर्नशिपसह प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तुम्हाला डिझायनर लेबल/ बुटीक/ स्थानिक कापड कंपनीत/ निर्यात कंपनीत किंवा कॉश्च्युम डिझायनर/ स्टायलिस्ट अथवा अ‍ॅड एजन्सीमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होते.
फॅशन डिझायनिंगची पदवी घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणार्थी म्हणून सुरुवातीला पाच ते दहा हजार रुपयांपर्यंत विद्यावेतन मिळते. जसजसा कामाचा अनुभव वाढतो तसतसे काही वर्षांत दरमहा २५ ते ३० हजार रु.पर्यंत कमवता येतात. एखाद्या कंपनीचे आíथक पाठबळ आणि तुमच्यामधील कौशल्य या आधारांवर कमाईच्या आकडय़ांमध्ये अधिक-उणे होऊ शकते.
पुरेशा अनुभवाच्या जोरावर तुम्ही नाव कमावले की, तुम्हांला स्वत:चे लेबल सुरू करता येईल आणि मग तुमची उत्पादने तुम्ही वेगवेगळी बुटीक, शोरूम किंवा स्टोअर्समध्ये विकू शकता. फॅशन डिझायनरला डिझाइनबरोबर आपल्या व्यवसायाशी निगडित हरेक बाबीचे – जसे पॅटर्न मेकिंग, क्वॉलिटी कंट्रोल, टेक्स्टाइल संदर्भातील ज्ञान, डाय, इलुस्ट्रेशन, को- ऑर्डिनेशन, मर्चन्डायजिंग, अकाऊंटस् आदी गोष्टींचे ज्ञान असणे आवश्यक ठरते.
अ‍ॅक्सेसरीज् डिझायिनग – जर कुणाला कापड डिझायिनगमध्ये विशेष स्वारस्य नसेल, परंतु तरीही डिझायिनगमध्ये काही करून दाखवायचे असेल, अशांसाठी अ‍ॅक्सेसरीज् डिझायिनग हा उत्तम पर्याय ठरू शकतो, कारण डिझायिनगच्या दृष्टीने यात करायला भरपूर वाव आहे आणि अद्याप या क्षेत्रात मर्यादित स्पर्धा असल्यामुळे, इतर शाखांपेक्षा यात लवकर यश मिळू शकते. त्यासाठी अनुभवाने स्वत:ची नजर विकसित होणेदेखील तितकेच आवश्यक ठरते. जसे, एखाद्या पेहरावावर ज्वेलरी, बूट-चपला, पर्स यांसारख्या कोणकोणत्या अ‍ॅक्सेसरीज् शोभून दिसतील याचे ज्ञान असणे जरुरीचे ठरते. कधी कधी एखाद्या प्रसंगात विशिष्ट संकल्पना राबवूनदेखील एक वेगळा लूक निर्माण करता येऊ शकतो.
टेक्स्टाइल डिझायिनग – गेल्या काही वर्षांत टेक्स्टाइल डिझायनिंगमध्ये आमूलाग्र बदल घडून आला आहे. त्यामुळे फॅशन डिझायिनगमधून पदवी पूर्ण केल्यानंतर या क्षेत्रातदेखील, जसे टेक्स्टाइल डिझायिनग, स्टायिलग व अ‍ॅपरलमध्ये कामाच्या दृष्टीने अनेक चांगल्या संधी उपलब्ध आहेत. टेक्स्टाइल विषय घेऊन स्पेशलायझेशन करणारे विद्यार्थी टेक्स्टाइल डिझायनर किंवा एम्ब्रॉयडरी डिझायनर म्हणून काम करू शकतात. त्याचबरोबर फíनिशग टेक्स्टाइलमध्ये म्हणजे पडदे, टेबल क्लॉथ, उशांचे कव्हर, आभ्रे आदी गोष्टींसाठी डिझायिनग करणे शिवाय अ‍ॅपरलच्या क्षेत्रात म्हणजेच अनेकदा फॅशन हाऊस स्वत:ची डिझाइन्स तयार करून ती कापडांवर िपट्र करून घेत असतात व ते कापड बाजारात आणत असतात. या दृष्टीने डिझायनर म्हणून या क्षेत्रात चांगलाच वाव आहे. याव्यतिरिक्त ज्यांना फॅब्रिकचे इत्थंभूत ज्ञान आहे, म्हणजे एखादे फॅब्रिक कोणत्या पेहरावासाठी योग्य आहे, त्याचा दर्जा, ते मिळण्याची ठिकाणे वगरे.. अशा मंडळींसाठी फॅब्रिक खरेदी-विक्री क्षेत्रात कामाच्या दृष्टीने मुबलक संधी उपलब्ध आहेत. याच शाखेतील खुणवणारे आणखी एक क्षेत्र म्हणजे टेक्स्टाइल टेक्नॉलॉजी. यामध्ये फायबर केमिस्ट्रीच्या अभ्यासावर अधिक भर असतो. जसे फायबरचे धागे, त्या धाग्यांमध्ये रंग, केमिकल्स यांची असलेली प्रमाणबद्धता आदी गोष्टींचा समावेश यात असतो. ज्यांना या विषयाची नेमकी जाण आहे, त्यांना फायबर अ‍ॅनालिसिस किंवा टेक्स्टाइल एक्स्पर्ट म्हणून टेक्स्टाइल इंडस्ट्रीज, खासगी डिझायनर वर्कशॉपमध्ये किंवा बडय़ा टेक्स्टाइल मिल्समध्ये कामाच्या दृष्टीने अनेक संधी उपलब्ध आहेत.
फॅशन स्टायिलग / फॅशन को-ऑर्डिनेशन – या स्वरूपाचे काम करणाऱ्या व्यावसायिक मंडळींना मॉडेिलग, जाहिरात एजन्सी, फिल्मस्, दूरचित्रवाणी मालिका त्याचबरोबर एअरलाइन्स आणि हॉस्पिटॅलिटी या क्षेत्रांत प्रामुख्याने वाव मिळतो. या कामाचे स्वरूप विशिष्ट पद्धतीचे असून यात स्टाइल, फॅब्रिक, रंगसंगती आणि अ‍ॅक्सेसरीज् यांचा आकर्षक व योग्य तो मेळ घालून फॅशन मॉडेल्सना सादर करणे हे मुख्य काम असते. या स्वरूपाच्या कामामध्ये कामसू समन्वयक एका कामामध्येही भरपूर कमाई करू शकतात.
व्हिज्युअल मर्चण्डायिझग – या स्वरूपाच्या कामासाठी आवश्यक असलेला घटक म्हणजे निर्मितीक्षम मन आणि वेगवेगळ्या कल्पना वेगवेगळ्या तऱ्हेनं सादर करण्याची वृत्ती. अलीकडे आपल्या देशात मॉल संस्कृती झपाटय़ाने फोफावत आहे. या मॉल्समध्ये सजवलेल्या मॅनिकिनकडे (पुतळे) पाहून कुठल्या प्रकारचे पेहराव अथवा अ‍ॅक्सेसरीज विक्रीस ठेवल्या आहेत, याची कल्पना येते. त्यामुळे ते जितके जास्त आकर्षक तितका मालाचा खप अधिक. मोठमोठय़ा फॅशन बुटीकमध्ये दर तीन आठवडय़ांनी या मॅनिकिनची स्टाइल बदलावी लागते. हे मॅनिकिन सजवणे हे व्हिज्युअल मर्चण्डाइजरचे काम असते. याशिवाय व्यापार प्रदर्शनांमध्येही व्हिज्युअल मर्चण्डाइजरची गरज भासते. व्हिज्युअल मर्चण्डाइजरची नेमणूक ही कंत्राटी पद्धतीवर केली जाते आणि एका कंत्राटाद्वारे ही मंडळी ८ ते २० हजार रुपयांपर्यंत कमवू शकतात. या पद्धतीच्या कामामध्ये पूर्णवेळ काम करण्याची गरज नसते.
मर्चण्डाइजिंग – या कामामध्ये प्रामुख्याने रिटेल – होलसेलच्या दृष्टीने खरेदी-विक्री करणे, सेल्स, स्टोअर्स ऑपरेशन, व्यवस्थापन, वितरण, मर्चण्डाइज प्लॅिनग आणि विक्री सहाय्य या कामांचा अंतर्भाव होतो. टेक्स्टाइलची खडान्खडा माहिती आणि उत्तम संभाषण कौशल्य या गुणांवर या क्षेत्रात यशस्वी होता येतं. टेक्स्टाइल्सची खरेदी-विक्री करताना केवळ त्याचा रंग, पोत यांसारख्या गोष्टी लक्षात घेऊन चालत नाही तर एखाद्या फॅब्रिकला कोणत्या ठिकाणी उठाव मिळेल, त्यावरील कोणते डिझाइन अधिक आवडेल, हे लक्षात घेऊन विशिष्ट संस्कृती, व्यक्तींच्या आवडीनिवडी इ. गोष्टींवर संशोधन करून त्यानुसार इंडस्ट्रीजमध्ये सर्वेक्षण केले जाते. अशा अभ्यासपूर्ण निरीक्षणांचा नेहमीच उपयोग होत असतो. बऱ्याचदा या मर्चण्डाइजर मंडळींना कामानिमित्त देशात अथवा देशाबाहेर विविध ठिकाणी िहडावे लागते. त्यांच्या कामाच्या वेळ ठरावीक नसतात. यांना नेहमीच सतर्क राहावे लागते. या कामासाठी सहनशीलता, सतर्कता, करारीपणा या गुणांची गरज असते. या स्वरूपाच्या कामामध्ये ज्युनिअर मर्चण्डाइजर दरमहा ६,५०० पर्यंत कमावू शकतो; परंतु काही वर्षांतच योग्य ज्ञान व अनुभवाच्या जोरावर या कामासाठी तो ४० ते ६० हजार किंवा याहून अधिक मानधन प्राप्त करू शकतो. एखाद्या बडय़ा कॉर्पोरेट कंपनीत (टेक्स्टाइल किंवा कॉस्मेटिक) मानधनाचा आकडा लाखांच्या घरात जातो.
क्वॉलिटी कंट्रोलर – दर्जा नियंत्रक म्हणून काम करताना पॅटर्न मेकिंग, अ‍ॅपरल कन्स्ट्रक्शन, फिनििशग ट्रीटमेंटस् आणि त्यामध्ये टेक्स्टाइल्सचा केला जाणारा उपयोग याचे ज्ञान असणे आवश्यक ठरते. प्रॉडक्शन युनिटमध्ये दर्जा निश्चिती करताना डिझायिनग, फॅब्रिक व उत्पादनाचा विशिष्ट दर्जा विकसित करणे हे मुख्य काम असते. पदवीधरांना सुरुवातीस दरमहा सात हजार रुपये इतके वेतन मिळते. या क्षेत्रात योग्य प्रगतीच्या आधारे तुम्ही उत्पादन पर्यवेक्षक म्हणून काम करू शकता आणि तुम्हाला ३० हजारांर्प्यत वेतन मिळू शकते.
फॅशन जर्नालिझम – अलीकडे विविध वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाहिन्यांवर फॅशन  विषयाला महत्त्व दिले जाते. फॅशन समीक्षा हादेखील स्वतंत्र विभाग म्हणून गणला जातो. फॅशन जर्नलिझममध्ये प्रवेश करताना लिहिण्याची आवड व संपादनाचा अनुभव असणे गरजेचे आहे. शिवाय ज्या विषयावर लिहिणार आहोत त्या विषयाच्या तांत्रिक बाबींसोबतच इतर अन्य गोष्टींचे, जसे आंतरराष्ट्रीय स्तरांवरील घडामोडी, तिथले ट्रेण्डस् यांची माहिती या फॅशन पत्रकाराला असणे अपेक्षित आहे. फॅशन जर्नालिस्ट म्हणून वर्तमानपत्रे, फॅशनविषयक मासिके किंवा फ्री-लान्सर म्हणूनदेखील काम करता येते. या क्षेत्रातील नेमक्या संधी शोधण्यासाठी तुम्हाला सतर्क राहावे लागते. त्यासाठी विशिष्ट वर्तमानपत्राची अथवा मासिकाची नेमकी गरज काय आहे, हे ओळखून तशा पद्धतीने काम केल्यास चांगला पसा कमावता येऊ शकतो.
स्टायिलग – अलीकडे दूरचित्रवाणी वाहिन्यांमध्ये व्हीजे / कलाकार मंडळी / मॉडेल्स यांना चांगली मागणी आहे. कॅमेऱ्यासमोर आपले रूप अधिकाधिक खुलून दिसण्यासाठी ही मंडळी स्टायिलग तज्ज्ञांची नेमणूक करतात. या कामात आपल्या क्लायन्टस्चा प्रेझेंटेबल लूक ठरवणे, यासाठी पेहराव, मेकअप, हेअरस्टाइल, अ‍ॅक्सेसरीज याबाबत विचार करून क्लायंटस्ला उचित लूक देणे, क्रमप्राप्त ठरते. याव्यतिरिक्तही या क्षेत्रात अशा अनेक संधी आहेत, ज्यांचा भारतीय फॅशन उद्योगामध्ये अजून तितकासा गांभीर्याने विचार केला जात नाही.  म्हणूनच जर एखाद्या नामवंत फॅशन इन्स्टिटय़ूटमध्ये प्रवेश घेतला तर या क्षेत्रातील विविध व्यावसायिक बाबींचे प्रशिक्षण मिळते आणि विद्यार्थी चांगला तयार होऊन बाहेर पडतो. या क्षेत्रातील प्रत्येक स्पध्रेला तोंड देण्याचा आत्मविश्वास तो प्राप्त करतो. मात्र, या क्षेत्रात यशस्वी व्हायचे असल्यास तुमच्याकडे निर्मितीक्षमता असणं अत्यावश्यक आहे. या क्रिएटिव्हिटीच्या जोरावर तुम्ही केवळ भारतातच नाही तर जागतिक पातळीवरदेखील स्वत:चा ठसा उमटवू शकता.