|| प्रथमेश आडविलकर

विद्यापीठाची ओळख-स्विस फेडरल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात ई.टी.एच. झुरिक हे स्वित्र्झलडमधील विज्ञान-तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयांमध्ये संशोधन-अध्यापन करणारे एक प्रथितयश विद्यापीठ आहे. २०१९सालच्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सटिी रँकिंगनुसार ई.टी.एच. झुरिक हे जगातले सातव्या क्रमांकाचे तर युरोप खंडातील तिसऱ्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील जगातील अग्रगण्य विद्यापीठांमध्ये ई.टी.एच. झुरिक या विद्यापीठाचा समावेश आहे. ई.टी.एच. झुरिक त्याच्या अत्याधुनिक संशोधन आणि व त्यातील अभिनव कल्पनांसाठी सर्वत्र ज्ञात आहे. इसवी सन १८५४मध्ये स्वीस फेडरल पॉलिटेक्निक स्कूल म्हणून स्थापना झालेल्या संस्थेचे रूपांतर कालांतराने विद्यापीठामध्ये झाले. ई.टी.एच. झुरिक हे स्वित्र्झलडमधील सर्वात प्रतिष्ठित आणि अग्रगण्य विद्यापीठ आहे.

ई.टी.एच. झुरिक विद्यापीठ एकूण दोन कॅम्पसमध्ये विभागले गेले आहे. यामध्ये झुरिक झेन्त्रम परिसरातील मुख्य वास्तू व हाँगर्बर्ग परिसराचा समावेश आहे. विद्यापीठाच्या १५०व्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने हाँगर्बर्ग परिसरात ‘सायन्स सिटी’ या प्रमुख प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यापीठाच्या या कॅम्पसमध्ये प्रमुख शैक्षणिक-संशोधन विभाग, कार्यालये, सायन्स सिटी, ई.टी.एच.लॅबोरेटरी ऑफ आयन बीम फिजिक्स, ग्रंथालय यांसारखे महत्त्वाचे विभाग वा स्कूल्स आहेत. आज ई.टी.एच. झुरिकमध्ये सुमारे साडेसहा हजारच्या आसपास एवढा प्राध्यापक-संशोधकवर्ग आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत आहे. तर जवळपास दहा हजार पदवीधर तर सहा हजारांहून अधिक पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण पूर्ण करत आहेत.

अभ्यासक्रम – ई.टी.एच. झुरिक विद्यापीठातील सर्व पदवी अभ्यासक्रम हे पूर्णवेळ अभ्यासक्रम आहेत. पदवी अभ्यासक्रम जर्मन भाषेमध्ये असून पदव्युत्तर अभ्यासक्रम मात्र जर्मन व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहेत. जवळपास सर्व आंतरराष्ट्रीय विद्यार्थी या विद्यापीठामध्ये पदव्युत्तर आणि पीएचडी अभ्यासक्रमांसाठी अर्ज करतात. आंतरराष्ट्रीय विद्यार्थी विज्ञान आणि अभियांत्रिकी शाखेतील बहुतांश विषयांवर आपले लक्ष्य केंद्रित करतात. विद्यापीठातील फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इंजिनिअरिंग, गणित या प्रमुख विभागांमार्फत विद्यापीठातील विविध पदवी व पदव्युत्तर विभाग चालतात. विद्यापीठाचे मुख्य संशोधन मेडिसिन, डेटा, सस्टेनेबिलीटी, मॅन्युफॅक्चिरग टेक्नॉलॉजी, क्रिटीकल थिंकिंग इनिशिएटिव्ह या क्षेत्रांमध्ये चालते. सर्व विभागांमधून विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी वा संशोधन पातळीवरील अभ्यासक्रमांचे पर्याय विद्यापीठाने उपलब्ध करून दिले आहेत. विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी त्या त्या पदवी वा पदव्युत्तर स्तरासाठी आवश्यक असलेली प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे विद्यार्थ्यांसाठी गरजेचे आहे.

सुविधा – ई.टी.एच. झुरिक विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्क, निवास व भोजन सुविधा विविध निकषांद्वारे उपलब्ध करून दिलेल्या आहेत. विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आíथक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर यासाठी असलेली अर्जप्रक्रिया व इतर बाबींबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. विद्यापीठाचे ग्रंथालय व सर्व प्रयोगशाळा अद्ययावत आहेत. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना हेल्थ इन्शुरन्स व वैद्यकीय सुविधा काही अटींवर विद्यापीठाकडून दिल्या जातात.

वैशिष्टय़ – ई.टी.एच. झुरिक विद्यापीठ हे विज्ञान व अभियांत्रिकीमधील शिक्षण आणि संशोधन यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. या विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय स्तरावरील जागतिक दर्जाचे संशोधक व तंत्रज्ञ दिलेले आहेत. यामध्ये महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन व विल्यम रॉन्टजेन यांचा समावेश आहे. आतापर्यंतच्या उपलब्ध सांख्यिकीनुसार, विद्यापीठातील एकूण ३२ माजी विद्यार्थी वा प्राध्यापक नोबेल पारितोषिक विजेते आणि एक टय़ुरिंग पुरस्कार विजेते आहेत.

संकेत स्थळ:  https://www.ethz.ch/en.html

itsprathamesh@gmail.com