News Flash

प्राकृतिक, आर्थिक आणि सामाजिक भूगोल

महाराष्ट्राच्या मुख्य हवामान विभागांचा नकाशाच्या आधारे अभ्यास करणे अवश्यक आहे.

 

एमपीएससी मंत्र : रोहिणी शहा

मागील लेखामध्ये भूगोल घटकाच्या संकल्पनात्मक तयारीबाबत चर्चा करण्यात आली. या लेखामध्ये प्राकृतिक, आर्थिक व सामाजिक भूगोलाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे.

 

प्राकृतिक भूगोल

खरे तर संकल्पनात्मक भूगोल हा भाग प्राकृतिक भूगोलाचाच एक भाग आहे. त्याची चर्चा मागील लेखामध्ये करण्यात आली आहेच. उर्वरित भागाची तयारी पुढीलप्रमाणे करता येईल.

यामध्ये नकाशावर आधारित, बहुविधानी किंवा जोड्या लावणे अशा प्रकारचे संकल्पनात्मक प्रश्न विचारले जातात. नकाशा समोर ठेवून हा अभ्यास करायला हवा.

नदीप्रणाली, पर्वतप्रणाली, प्राकृतिक विभाग, मान्सूनचे वितरण इ. बाबत प्रामुख्याने प्रश्न विचारले जातात.

भारतातील हिमालयीन व द्विकल्पीय नदी प्रणालींचा तुलनात्मक अभ्यास आवश्यक आहे.

भारतातील पर्वतप्रणालीचा नकाशावरील अभ्यास करतानाच त्यांचे आर्थिक महत्त्व, पर्जन्यनिर्मिती व हवामान इत्यादीमधील महत्त्व या बाबींचाही अभ्यास आवश्यक आहे. या नदी व पर्वतप्रणालीची उत्तर ते दक्षिण क्रमाने सलगता समजून घ्यायला हवी.

भारतातील महत्त्वाचे हवामान विभाग, मृदा आणि वनांचे प्रकार यांचा नकाशा समोर ठेवून आढ़ावा घ्यावा.

महाराष्ट्राच्या मुख्य हवामान विभागांचा नकाशाच्या आधारे अभ्यास करणे अवश्यक आहे. प्रत्येक विभागाची भौगोलिक वैशिष्ट्ये, हवामानाचे वैशिष्ट्यपूर्ण घटक, त्यामुळे होणारी मृदा, पिके, इतर आर्थिक उत्पादनांमध्ये या वैशिष्ट्यांचे योगदन या बाबी समजून घ्याव्यात. महाराष्ट्राचे हवामान विभाग हे दक्षिणोत्तर पसरले आहेत. त्यांचा पश्चिाम ते पूर्व अशा क्रमाने अभ्यास केल्यास मान्सून, पर्जन्याचे वितरण, तापमानातील फरक  यांचा तुलनात्मक अभ्यासही शक्य होईल.

जागतिक भूगोलाचा फक्त प्रसिद्ध नद्या, पर्वत, प्राकृतिक विभाग इ. चा कोष्टक आखून फॅ क्चुअल अभ्यास पुरेसा आहे.

नैसर्गिक आपत्ती, चक्रीवादळांची नावे यांचा आढावा घेणे आवश्यक आहे.

आर्थिक भूगोल

आर्थिक भूगोल हा पूर्णत: तथ्यात्मक घटक आहे. भारताच्या आर्थिक भूगोलावर प्रश्नांची संख्या कमी असली तरी आर्थिक पाहणी अहवालामधून महत्त्वाची पिके, खनिजे, उद्योग यांची देशातील सर्वाधिक उत्पादन, उत्पन्न व निर्यातीमधील वाटा असणारी राज्ये यांची माहिती अद्ययावत करून घ्यायला हवी.

यामध्ये खनिजे व ऊर्जा स्रोत, महत्त्वाचे पायाभूत उद्योग, महत्त्वाची धरणे/प्रकल्प व महत्त्वाची पर्यटन स्थळे यांचा कोष्टक आखून अभ्यास करायचा आहे. कोष्टकामध्ये समाविष्ट करायचे मुद्दे पुढीलप्रमाणे – स्थान, वैशिष्ट्ये, आर्थिक महत्त्व, असल्यास वर्गीकरण, असल्यास पर्यावरणीय मुद्दे, संबंधित समस्या, कारण, उपाय, असल्यास संबंधित चालू घडामोडी.

महाराष्ट्रातील महत्त्वाची वने, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने, जैवविविधता क्षेत्रे यांचा भौगोलिक व पर्यावरणीय वैशिष्ट्ये व महत्त्व या दृष्टीने अभ्यास करावा. वनांचे आर्थिक महत्त्व समजून घ्यावे.

महाराष्ट्रातील खनिजांचे उत्पादन होणारी क्षेत्रे, त्यांची भूशास्त्रीय रचना, उत्पादनाचे प्रमाण व गुणवत्ता, खाणींचे प्रकार या बाबी समजून घ्याव्यात.

भारतातील आणि महाराष्ट्रातील खडकांचे प्रकार आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे असल्याने या भागाचा परिपूर्ण अभ्यास करायला हवा. खडकांचा प्रकार, निर्मिती, रचना, भौगोलिक, भौतिक व रासायनिक वैशिष्ट्ये, निर्मितीसाठी आवश्यक भौगोलिक / भूशास्त्रीय घटक, कोठे आढळतो, भौगोलिक व आर्थिक महत्त्व या मुद्द्यांच्या अनुषंगाने अभ्यास करावा.

 धार्मिक, वैद्यकीय, सांस्कृतिक पर्यटन,

eco -tourism , राखीव उद्याने इ. संकल्पना व्यवस्थित समजून घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील सर्व राष्ट्रीय उद्याने, वने माहीत असायला हवीत. भारतातील प्रसिद्ध वने, उद्याने व सद्यस्थितीत चर्चेत असलेली स्थळे याची माहिती करून घ्यावी. संदर्भ साहित्यातील संबंधित सगळे कोष्टक पाठ करणे आवश्यक नाही.

सामाजिक भूगोल

यामध्ये राजकीय, मानवी आणि लोकसंख्या भूगोल हे उपघटक विचारात घेता येतील.

राजकीय भूगोल

प्रशासकीय विभागातील जिल्हे, त्यांची मुख्यालये व त्यांची वैशिष्ट्ये, जिल्ह्यांची कालानुक्रमे निर्मिती, महत्त्वाची शहरे, आर्थिक व पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची ठिकाणे यांची कोष्टकामध्ये मांडणी काढून टिप्पणे काढावीत.

राज्यातील जिल्ह्यांच्या सीमा, इतर राज्यांच्या सीमेवरील जिल्हे, जिल्ह्यांच्या सीमा म्हणून उपयुक्त ठरणारी नदी/ डोंगर/नैसर्गिक भूरूप आणि राज्याचा राजकीय नकाशाही व्यवस्थित अभ्यासणे आवश्यक आहे.

लोकसंख्या भूगोल

भारताच्या व राज्याच्या लोकसंख्येचा साक्षरता, नागरीकरण, लिंगगुणोत्तर, रोजगार, लोकसंख्येची घनता या मुद्यांच्या आधारे आढावा घ्यावा. जन्मदर, मृत्युदर, बाल लिंगगुणोत्तर, माता मृत्युदर, अर्भक मृत्युदर, बाल मृत्युदर यांची माहिती असायला हवी.

यामध्ये सन २००१ व २०११च्या जनगणनेची तुलना, वरील मुद्यांबाबत सर्वाधिक व सर्वात कमी प्रमाण असलेली तीन राज्ये, तुलनेने सर्वात जास्त व सर्वात कमी वाढ झालेली राज्ये व सर्व बाबतीत महाराष्ट्राचे दोन्ही वर्षांमधील स्थान तसेच महाराष्ट्राच्या बाबतीत सर्वाधिक व सर्वात कमी प्रमाण व वाढीचे जिल्हे अशा कोष्टकामध्ये टिपणे काढणे फायदेशीर ठरेल.

मानवी भूगोल

वसाहतींचे प्रकार, आकार, स्वरूप, ठिकाण व आर्थिक महत्त्व पाहायला हवेत. राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी कोणत्या प्रकारची वसाहत आहे हे समजून घेता आले तर उत्तम.

स्थलांतराचा कारणे, स्वरूप, समस्या, परिणाम व उपाय इ. दृष्टींने अभ्यास आवश्यक आहे. या बाबतीत ‘आकडेवारी‘ हा मुद्दा महत्त्वाचा आहे. विशेषत: महाराष्ट्राच्या संदर्भातील स्थलांतराची आकडेवारी (म्हणजे टक्केवारी) आर्थिक पाहणी अहवालामधून अद्ययावत करून घ्यायला हवी. यामध्ये स्थलांतरातील सामाजिक घटकांचे उतरत्या क्रमाने प्रमाण, कारणांची उतरत्या क्रमाने टक्केवारी, कोणत्या ठिकाणाहून स्थलांतर होत आहे त्यांच्या टक्केवारीचा उतरता क्रम ही आकडेवारी महत्त्वाची आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2021 1:09 am

Web Title: exam study mpsc akp 94
Next Stories
1 आर्थिक आणि सामाजिक विकास
2 भूगोल प्रश्न विश्लेषण आणि संकल्पनात्मक अभ्यास
3 पर्यावरण परिस्थितिकी
Just Now!
X