अकौन्टिंग आणि फायनान्स याखेरीज भारतीय अर्थव्यवस्थेची परिस्थिती व तिचा व्यवसायावर होणारा परिणाम, व्यवसायाची पुनर्रचना करणे इ. अनेक महत्त्वाच्या विषयांचा समावेश     कौटुंबिक व्यवसाय व्यवस्थापन  या एमबीए अभ्यासक्रमाच्या स्पेशलायझेशनमध्ये होतो. त्याबद्दल-

कौ टुंबिक व्यवसाय व्यवस्थापन (फॅमिली बिझनेस मॅनेजमेंट) या विषयामध्ये स्पेशलायझेशन, एम.बी.ए.च्या दुसऱ्या वर्षांसाठी काही विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. ज्यांचा कौटुंबिक स्तरावर लहान किंवा मोठा व्यवसाय आहे किंवा ज्यांना तो सुरू करायचा आहे अशा सर्वासाठी हे स्पेशलायझेशन अतिशय उपयुक्त आहे. एम. बी. ए. झाल्यानंतर सर्वानीच नोकरी शोधली पाहिजे असे नाही. स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यास व त्यामध्ये वाढ करण्यास चांगली संधी आहे. मात्र स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा असेल तर धोका पत्करण्याची तयारी, अमर्यादित तास काम करण्याची जिद्द, तसेच प्रसंगी प्रतिकूल परिस्थितीशी सामना करण्याची शारीरिक व मानसिक तयारी या सर्व गुणांची आवश्यकता असते. असे म्हटले जाते की, उद्योजक होण्यासाठी कोणत्याही पदवीची गरज नसते. पण हेही तितकेच खरे आहे की, उद्योजक बनण्यापूर्वी काही गोष्टींचा अभ्यास केला आणि उद्योगविषयक कही मूलभूत तत्त्वे समजून घेतली तर त्याचा फायदा अवश्य होतो. या दृष्टीने ‘कौटुंबिक व्यवसाय व्यवस्थापन’ या स्पेशलायझेशनचा उपयोग करून घेता येईल. या विषयाचे नाव जरी कौटुंबिक स्वरूपाचा व्यवसाय या स्वरूपाचे असले तरी भविष्यामध्ये व्यवसाय वाढवून तो कौटुंबिक पातळीवरून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कसा नेता येईल यासंबंधीचे मार्गदर्शनसुद्धा या विषयात मिळेल. मात्र त्यासाठी विषयाचा योग्य अभ्यास करून त्याचा व्यवहारात उपयोग करून घेणे हे अत्यावश्यक आहे.
या स्पेशलायझेशनमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. यापैकी काही महत्त्वाचे विषय पुढे मांडले आहेत-
 १) कौटुंबिक व्यवसाय व्यवस्थापनाची आवश्यक तत्त्वे
या विषयामध्ये कौटुंबिक व्यवसायाचे स्वरूप तसेच त्याची उपयुक्तता त्याचप्रमाणे या व्यवसायाची बलस्थाने आणि कमकुवत बाजू किंवा मर्यादा या गोष्टींबरोबरच व्यवसाय वाढीसाठी आवश्यक असणारे दीर्घकालीन नियोजन, व्यवसायासमोरील आव्हाने इ. अनेक महत्त्वाच्या बाबींचा समावेश असतो. कौटुंबिक व्यवसायाचे विविध पैलू, म्हणजे त्यामध्ये असणारी लवचीकता तसेच कौटुंबिक व्यवसाय चालवणाऱ्यांच्या आयुष्याच्या चक्राचे (लाइफ सायकल) व्यवसायावर होणारे परिणाम यासारख्या अनेक बाबींचा अभ्यास करण्याची संधी मिळते. याशिवाय कौटुंबिक व्यवसायामध्ये वारसदाराचा प्रश्न (सक्सेशन) हा नियोजन करून कसा सोडवावा यासंबंधी मार्गदर्शन मिळते. कौटुंबिक व्यवसाय चालवताना येणारी अडचण म्हणजे कुटुंबांच्या बाहेर जाऊन, बाहेरील व्यक्तीला व्यवसायामध्ये सामील करून घ्यायचे किंवा नाही हा निर्णय घेणे. कित्येक वेळा कौटुंबिक व्यवसायामध्ये बाहेरील व्यक्तींना प्रवेश देण्यास सदस्यांचा विरोध असतो. पण अशा विरोधामुळे बाहेरील व्यक्तींना प्रवेश दिला नाही तर व्यवसायाच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते. यामुळेच असे अवघड निर्णय योग्य तो विचार करून कसे घ्यावेत याची माहिती मिळते. अर्थात असे अनेक अवघड निर्णय घेणे अनुभवातूनच शक्य होते. असे असले तरी अनुभवाला अभ्यासाची जोड दिली तर निर्णय घेणे तुलनात्मकदृष्टय़ा सोपे होते. व्यवसाय करताना अनेक प्रकारचे संघर्ष उद्भवतात तसेच परस्परसंबंध ताणले जातात, संघर्ष कशा पद्धतीने हाताळावेत आणि परस्परसंबंधांचे योग्य व्यवस्थापन कसे करावे याचे शिक्षण या विषयामधून मिळते. व्यवसाय चालवण्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण, कर्मचाऱ्यांची नेमणूक, कर्मचाऱ्यांचा मोबदला इ. महत्त्वाच्या घटकांचा समावेश या विषयात होतो.
२) संशोधन व त्याचे व्यवस्थापन : कोणत्याही व्यवसायाचे यश हे त्या व्यवसायाने नवीन संशोधन कसे केले आहे आणि ते कसे वापरले आहे यावर अवलंबून असते. संशोधन म्हणजे फक्त शास्त्रीय बाबतीतच आहे असे नाही, तर अगदी आपल्या दैनंदिन व्यवसायामधील वेगवेगळ्या गोष्टी आपण नवीन पद्धतीने कशा करू शकू आणि या नावीन्याचा व्यवसायाच्या वाढीसाठी कसा वापर करून घेऊ शकतो याचा सतत विचार करणे म्हणजे संशोधनाला चालना देणे. या विषयामध्ये संशोधनाची आवश्यकता, यासाठी लागणारी प्रेरणा (मोटिव्हेशन) तसेच संशोधनाची वेगवेगळी मॉडेल्स (उदा. क्लार्क मॉडेल, जीवनचक्र (लाइफ सायकल) मॉडेल) यांचासुद्धा समावेश होतो. तसेच संशोधन नेमके कोणत्या विभागात करावे आणि कसे करावे यासंबंधीचे मार्गदर्शन मिळते. याशिवाय व्यवसायामधील वेगवेगळ्या प्रक्रिया यातही संशोधनाचा कसा फायदा होतो याचाही समावेश होतो.
३) व्यवसाय नियोजन (बिझनेस प्लॅन) : स्वत:च्या व्यवसायामधला एक महत्त्वाचा भाग म्हणजे व्यवसायाचे नियोजन करणे. स्वत:चा व्यवसाय भविष्यकाळामध्ये वाढवण्यासाठी आणि योग्य प्रकारे चालवण्यासाठी योग्य त्या नियोजनाची गरज असते. व्यवसाय नियोजन (बिझनेस प्लॅन) यामध्ये व्यवसायाच्या वेगवेगळ्या पैलूंचा सविस्तर विचार करण्यात येतो. यामध्ये व्यवसाय ज्या क्षेत्रात आहे, त्या क्षेत्राचा संपूर्ण अभ्यास व विश्लेषण, स्पर्धेचे विश्लेषण, जोखमीचे नियोजन (रिस्क मॅनेजमेंट), व्यवसाय वाढवण्यासंबंधीचे नियोजन, रोख प्रवाहाचा अंदाज (कॅश फ्लो एस्टिमेंट), आर्थिक अंदाज, बलस्थाने व कमकुवत बाजू  इ. घटकांचा समावेश असतो. बिझनेस प्लॅन हा विषय योग्यपणे अभ्यासून यामध्ये प्रत्यक्ष बिझनेस प्लॅन तयार करण्याचा सराव केल्यास चांगला फायदा होतो.
४) अकौन्टिंग व फायनान्स : कौटुंबिक स्तरावर चालणाऱ्या व्यवसायाचे अकौन्टस् कसे ठेवावेत यांचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन या विषयातून मिळते. व्यवसाय लहान असला तरी त्यांचे हिशेब हे व्यवस्थितच ठेवले पाहिजेत. जर व्यवसाय हा खासगी मर्यादित कंपनीमार्फत चालवला असेल तर कंपनी कायद्याचे पालन करणे आवश्यक असते. यामध्ये नफा-तोटा पत्रक व ताळेबंद हा ठरावीक नमुन्यामध्ये तयार करणे, त्याचे ऑडिट करून घेणे तसेच कंपनी कायद्यामध्ये आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या सभा वेळेवर घेणे यांचा समावेश असतो. याशिवाय इन्कम टॅक्सविषयक वेगवेगळ्या तरतुदींचे पालन करणे आणि त्याप्रमाणे ठरावीक वेळेमध्ये रिटर्न भरणे याची माहितीसुद्धा आवश्यक असते. व्यवसाय जरी लहान असला तरी वित्तीय व्यवस्थापन (फायनान्शिअल मॅनेजमेंट) करणे अत्यंत जरुरीचे आहे. यामध्ये भांडवली खर्चाचे नियोजन कसे करावे, खेळते भांडवल कसे वापरावे तसेच आवश्यक भांडवल कसे उभारावे आदी गोष्टींचा समावेश असतो. अकौन्टिंग आणि फायनान्स याव्यतिरिक्त व्यवसायामध्ये अत्यंत आवश्यक असणारा कॉस्ट अकौन्टिंग हा विषयसुद्धा यामध्ये समाविष्ट असतो. कॉस्ट अकौन्टिंगचा वापर करून, आपण देत असलेल्या सेवा किंवा उत्पादित करीत असलेल्या वस्तू यांचा खर्च शास्त्रीयदृष्टय़ा कसा काढावा आणि स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी त्याचे नियंत्रण कसे करावे याचे मार्गदर्शन या विषयामध्ये मिळते. तसेच खर्च कमी करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे याची माहितीसुद्धा मिळते. कॉस्ट अकौन्टिंगमधील नवीन संकल्पना म्हणजे ‘कॉस्ट मॅनेजमेंट’ कशा पद्धतीने वापरावी याचीसुद्धा माहिती या विषयात मिळते.
अकौन्टिंग आणि फायनान्स हे व्यवसाय यशस्वीपणे चालवण्यासाठी अतिशय आवश्यक असणाऱ्या या गोष्टी आहेत. या शास्त्रांचा योग्य वापर करून व्यवसायात आर्थिक शिस्त आणल्यास व्यवसाय वृद्धिंगत करणे निश्चितच शक्य होईल.
वरील महत्त्वाच्या विषयांव्यतिरिक्त इतर अनेक महत्त्वाचे विषय म्हणजे नेतृत्वविकास, स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी वापराव्या लागणाऱ्या स्ट्रॅटेजीज्, जागतिक स्तरावरील प्रवाह, जागतिक परिस्थिती, भारतीय अर्थव्यवस्थेची परिस्थिती व तिचा व्यवसायावर होणारा परिणाम, व्यवसायाची पुनर्रचना करणे इ. अनेक महत्त्वाच्या विषयांचा समावेश या स्पेशलायझेशनमध्ये होतो.
कौटुंबिक व्यवसाय व्यवस्थापन हे विशेषीकरण, हा एक चांगला पर्याय आहे. यातील विषयाचा अभ्यास करून, उद्योजक म्हणून यशस्वी करिअर करणे हे शक्य आहे.