News Flash

फॅशन फोटोग्राफीचे तंत्र

फॅशन फोटोग्राफी म्हणजे फोटोग्राफरची मज्जा असाच अनेकांचा समज असतो.

फॅशन फोटोग्राफी म्हणजे फोटोग्राफरची मज्जा असाच अनेकांचा समज असतो. पण तसे काहीच नाही. या क्षेत्रातही प्रचंड मेहनत करावी लागते. इथे एखादी छोटीशी चूकही तुमच्या इतर सगळ्या कष्टांवर पाणी फिरवू शकते.

सध्या होतकरू तरुण-तरुणी डीएसएलआर कॅमेरा विकत घेतात, त्या संदर्भातली काही पुस्तके वाचतात. तसेच यूटय़ूबवर व्हिडीओही पाहतात. त्यानंतर नवोदित मॉडेल आणि रंगभूषाकार यांना घेऊन फोटोशूट करतात. चांगला एडिटर त्यातल्या चुका काढून तो फोटो परिपूर्ण बनवतो. त्यामुळे त्या छायाचित्रकाराला आपण खूप चांगले छायाचित्र काढले असेच वाटत असते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की, कोणताही डिजिटल कॅमेरा म्हणजे तुमच्या हातातले कॅलक्युलेटर आहे. त्यामुळे जसे तुम्ही चांगले गणिती होऊ  शकत नाही. तसेच एका चांगल्या कॅमेऱ्यामुळेही तुम्ही उत्तम छायाचित्रकार होऊ  शकत नाही. ही एक कला आहे आणि त्याचे परिपूर्ण शिक्षण घ्यावेच लागते. त्यातही फॅशन छायाचित्रण करणे म्हणजे फक्त फॅशन शो सुरू असताना काढलेले फोटो असाही होत नाही. कोणत्या क्षेत्रात जाताना त्या क्षेत्राचा प्राथमिक अभ्यास करणे केव्हाही चांगले. छायाचित्रणामध्ये अत्याधुनिक गोष्टी शिकण्यापूर्वी प्राथमिक गोष्टी जाणून घेणे फार आवश्यक आहे.

प्रकाशयोजना आणि शूटिंग तंत्र याशिवायही फॅशन छायाचित्रणामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचे असते ती म्हणजे कला. रंगसंगती, एखाद्या गोष्टीकडे बघण्याची तुमची दृष्टी, ग्राफिक या सगळ्या गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत. एखाद्या मॉडेलचा चेहरा कसा आहे इथपासून या सगळ्या गोष्टींना सुरुवात होते. तिच्या चेहऱ्याची ठेवण, हनुवटी, गाल या सगळ्याचा अभ्यास करावा लागते. त्यानंतर रंगभूषाकारालाही त्यानुसार सूचना द्याव्या लागतात. महत्त्वाचा विषय असतो तो म्हणजे मॉडेलचे केस. केसांच्या पोतानुसार कोणती केशभूषा चांगली दिसेल हेही बघावे लागते. केशभूषा, रंगभूषा आणि छायाचित्रण या सगळ्याच गोष्टी जुळून आल्या तर ते शूट लक्षात राहण्यासारखे होते.

हे काही एकटय़ाचे काम नाही. काही वेळा स्टुडिओमध्ये चित्रीकरण न करता ते बाहेर करावे लागते. फोटोशूट झाल्यानंतर प्रोडक्शनची महत्त्वपूर्ण जबाबदारी यात असते. कधी कधी स्टुडिओमध्ये चित्रीकरण न करता ते बाहेर करावे लागते. यात अनेक लोकांचे सहकार्य आवश्यक असते. अगदी सरकारकडून या छायाचित्रणासाठी परवानगी मिळवण्यापर्यंत कामे त्यात येतात. छायाचित्रकाराला त्या जागेचा अभ्यास करावा लागतो.

या क्षेत्राला कधीही मरण नाही. या क्षेत्रामध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्ही किती कमावता हे सर्वस्वी तुमच्या कामावर अवलंबून असते. तुम्ही किती चांगले, किती वेळात आणि कसे काम करता यावर तुमचे यश अवलंबून असते. कोणत्याही मॉडेलचे साडीचे फोटोशूट करताना त्या मॉडेलपेक्षा साडीला प्राधान्य दिले गेले पाहिजे हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. मॉडेल कशा पद्धतीने उभी हे यावरही ती साडी कशी चांगली दिसते हे अवलंबून असते. तसेच एखाद्या मासिकासाठी जर फोटोशूट करणार असाल तर त्यासाठी मॉडेल वेगळ्या पद्धतीने उभी असणे आवश्यक आहे. यात तिचा अ‍ॅटिटय़ूड अधिक दिसला पाहिजे. तसेच मॉडेलने जर काही दागिने परिधान केले असतील तर तेही योग्य प्रकारे दिसणे आवश्यक आहे. कोणत्या ब्रॅण्डसाठी फोटोशूट केले जात आहे हे पाहून त्या पद्धतीने प्रकाशयोजना आणि इतर तांत्रिक गोष्टींचा विचार छायाचित्रकारालाच करावा लागतो.

आता या सगळ्या गोष्टी कुठे शिकायच्या, असा प्रश्न तुम्हाला पडेल. कोणतीही संस्था निवडताना ती नावाजलेली आहे का? बाजारात तिला कसे स्थान आहे? हे लक्षात घ्या. आधी त्यांच्या संकेतस्थळांना भेट द्या. नंतर तेथील वरिष्ठ किंवा शिक्षकवर्गाला भेटा. संस्थेतील अभ्यासक्रमांसाठी लागणाऱ्या साधनसामुग्रीचाही विचार करा. ती आपल्या खिशाला परवडेल का हेसुद्धा लक्षात घेणे आवश्यक आहे. नाही तर एखाद्या दुसऱ्या संस्थेत प्राथमिक शिक्षण घेऊन त्यानंतर विविध कार्यशाळांमधून त्या विषयाचे प्रशिक्षण घेणे परवडू शकते.

शिक्षण देणाऱ्या संस्था

  • सिम्बॉयसिस स्कूल ऑफ फोटोग्राफी, पुणे ssp.ac.in/
  • शारी अकॅडमी, मुंबई shariacademy.com/
  • पर्ल अकॅडमी, मुंबई http://pearlacademy.com/
  • नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फोटोग्राफी मुंबई (http://focusnip.com)

 

दिलीप यंदे

dilipyande@gmail.com

(शब्दांकन – मधुरा नेरूरकर)

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2016 3:05 am

Web Title: fashion photography
Next Stories
1 लघु उद्योजकांसाठीची मुद्रा योजना
2 करिअरमंत्र
3 एमपीएससी मंत्र : शब्द शब्द जपून..
Just Now!
X