बायोटेक्नॉलॉजिस्ट असलेल्या सजल कुलकर्णीला पाळीव प्राण्यांबद्दल विशेष आस्था आहे. या आस्थेला त्याने अभ्यासाची जोड दिली आहे. विदर्भातील गावरान गाईचं वर्गीकरण तो करतोय. आदिवासी, गोवारी, कामाठी यांचं परंपरागत पशुधन काय आहे, ते ओळखायचं कसं, ही जनावरं खातात काय, काम किती करतात, दूध किती देतात, त्यांना आजार कोणते होतात, त्यावर उपाय काय, लोकसंस्कृतीत त्यांचं स्थान काय,  हे सारं तो जाणून घेत आहे.
वेळ सकाळी आठ-सव्वाआठची. ग्रामसभा सुरू व्हायला अद्याप अवकाश आहे. फावला वेळ मिळाल्यामुळे आम्ही आठ-दहा मुलं-मुली मेंढा लेखा गावाच्या मुख्य रस्त्यावर रेंगाळत होतो. सारेच निर्माण शिबिरांच्या निमित्ताने एकत्र आलेले. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या सामाजिक प्रश्नाचा परीसस्पर्श झालेला. समाजासाठी काहीतरी करायचं या विचाराने भारावलेला आमच्यापकी प्रत्येकजण आपली वाट शोधत होता. कुणी शाळेकडे वळालं, तर कुणी बायोडायव्हर्सटिी रजिस्टरकडे. कुणी गावातील गटारे आणि शौचालयांचा वेध घेत होतं, तर कुणी आरोग्यसेवांची चौकशी करत होतं. तेव्हा बारीक चणीच्या, गोरापान सजलला रस्त्याच्या कडेला उभारून, पाठीत वाकून, आपले दोन्ही हात गुडघ्यावर टेकवून, एखाद्या लहान बाळाशी बोलावं अशा प्रेमाने आणि कुतूहलाने कुणाशीतरी बोलताना मी पाहिलं. त्याचा चेहरा खुलला होता. सतत काहीतरी शोधणारे त्याचे नेहमीचे मिचमिचते डोळे अधिकच बोलू लागले होते. त्या वेळी सजलच्या चेहऱ्यावर विस्तारलेलं हसू समाधानात न्हाऊन निघालेलं होतं. सजलला मी अनेकवेळा पाहिलंय. कोपऱ्यात शांत बसून चर्चा-वाद ऐकताना. मोजकं पण कदाचित लागेल अशा तीक्ष्ण सुरात बोलताना. हातात गवताचं एखादं पात नाचवीत, झाडा-फुलांत नजर लावून चालताना. क्वचितच कधीतरी मस्ती करताना. पण लेखा मेंढय़ात पाहिला तो सजल माझ्या कायम आठवणीत राहील. रस्त्याच्या कडेला एका गोठय़ात उभारलेल्या जनावरांशी हा गप्पा-गोष्टी करत होता. अगदी सहज. कदाचित त्यांच्याच भाषेत. ‘कम ऑन सजल..’ म्हणून कुणीतरी त्याला चुचकारलं. ‘‘बसलेल्या त्या गाईला (की बलाला) उभं कर बरं..’’ म्हणालं. सजलनेही मग खर्ज लावून काही गंभीर आवाज काढले आणि काय आश्चर्य.. चांगदेवाला भेटायला दगडी िभत चालून यावी तसा त्या मुक्या जनावराने सजलच्या हाकेला प्रतिसाद दिला. तो जीव उठून उभा राहिला!
सजल गाई-गुरांविषयी काहीतरी काम करतोय, हे मला एकूण माहिती होतं. केंद्र सरकारात स्वतंत्र पशुमंत्री असावा, अशी त्याची मागणीही कधीतरी ऐकली होती. परंतु ज्या समाजगटासोबत आपल्याला काम करायचं आहे, त्याच्याशी एवढं ‘मत्र- जीवांचे’ मी पहिल्यांदाच पाहात होतो. ज्या सामाजिक प्रश्नाला सजल भिडू पाहतोय, त्या समाजाशी त्याची नाळ जुळली आहे, हे पहिल्यांदा लक्षात आलं, ते असं. पुढे अनेकवेळा त्याचं पशुप्रेम असंच ठसठशीतपणे पुढे आलं. सजल बायोटेक्नॉलॉजीचा पदवीधर. कुठल्यातरी आलिशान सोफेस्टिकेटेड लॅबमध्ये स्वत:ची प्राणप्रतिष्ठा करण्याचा विचार याला कधीच शिवला नाही. या पठ्ठय़ाला लहानपणापासून जनावरांसोबत खेळण्याचा नाद. ‘मी गोठय़ातच खेळलो, तिथेच लहानाचा मोठा झालो. शाळेतसुद्धा म्हशीवर बसून गेलो. एवढंच काय पण आईची नागपुराहून भंडाऱ्यास बदली झाली तेव्हा आमच्याकडे गुरं नव्हती तर मी आमच्या गवळ्याच्या घरी जाऊन त्यांच्या गोठय़ात खेळायचो,’ असं सजल अगदी सहज बोलून जातो. लहानपणी आपल्याला गाडय़ांचं-बंदुका-विमानं यांचं वेड असतं. कारण आपल्याला तेच दाखवलं जातं आणि आपण तेच बघू लागतो. शिकू लागतो. ते मिळवण्याचा अट्टहास धरतो. आपल्यापकी अनेकांना तर ते मिळतच नाही, पण अशी चन मिळालेले आणि न मिळालेले निराशेच्या एकाच खलबताचे प्रवासी होतात. हे आजच्या आधुनिकतेचं सत्य आहे. सजलला भाग्यवानच म्हटलं पाहिजे, कारण तो आभासी नव्हे खऱ्या-खुऱ्या जगात, खेळण्यांच्या रूपाने का होईना, पण मुक्या जीवासोबत लहानाचा मोठा झाला. म्हणूनच कदाचित तो आजही अशा
मुक्या जनावरांप्रती सहवेदना बाळगून आहे. माणसाच्या आयुष्यातील पाळीव जनावरांचं स्थान काय आहे, याची त्याला पक्की जाणीव आहे. बायोटेक्नॉलॉजीचा पदवीधर झाल्यानंतर देखील सजलला माणसाच्या आयुष्यातील बायो-लॉजिक कळतं, हे विशेष.
पदवी शिक्षण पूर्ण होता होता सजल ‘निर्माण’च्या प्रवासात सामावला. ‘जनावरांविषयीची आस्था, जीवाश्मांचं औपचारिक शिक्षण आणि माझ्या कामाचा समाजाला काहीतरी उपयोग झाला पाहिजे असं म्हणणारी अनामिक ओढ या साऱ्यांच्या संगमावर मला काय करायचं ते सापडलं,’ असं सजल म्हणतो. या शोधाचाच एक भाग म्हणून सजलने ‘बायफ’ या संस्थेसोबत फेलोशिप केली. उरुळीकांचनच्या गोठय़ात तो चांगलाच रमला होता. आपल्या देशी जनावरांची, विशेषत: गाई आणि बलांची, उत्पादकता वाढविण्यासाठी विदेशी वाण आणून संकरित पिढी तयार केली जाते. आर्टिफिशिअल इन्सिमिनेशन किंवा कृत्रिम बीजधारणेचं म्हणजे संकरित जनावरांच्या पुनरुत्पादनाचं आणि संवर्धनाचं तंत्रज्ञान सजलला उरुळीकांचनच्या प्रयोगशाळेत शिकायला मिळालं. आपल्याकडच्या जनावरांच्या देशी जाती त्या त्या भौगोलिक परिस्थितीशी जुळवून घेतात, तिथे कसं जगायचं आणि अडचणीच्या परिस्थितीत तग धरून कसं राहायचं हे त्यांना शिकवावं लागत नाही. लोकांनीही पिढय़ान्पिढय़ा हे वाण जोपासलेलं असतं. त्याची त्यांना पुरती माहिती असते. त्यामुळे देशी माणसं आणि देशी जनावरं परस्पर सहकाऱ्याने सहज जगू शकतात. विदेशी जनावरांचं तसं नाही. त्यांना इथली हवा मानवत नाही, त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. खाणं-पाणी-औषध-देखभाल सारं आलं. सरकारी विकासाचा वरवंटा फिरू लागल्यानंतर पशुधनाच्या बाबतीत हे दिसून आलं. पशुधनाची कमतरता आणि विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सरकारनं जर्सी गाई वाटल्या. आज त्या कुठे आहेत? यावर सजल सांगतो, ‘विकल्या, कापल्या किंवा मेल्या..  माती बदलली की रोप टिकतंच, असं नाही.’
अधिक उत्पादन, अधिक कमाई, अधिक विकास या हव्यासापायी स्थानिक संसाधानाकडे आपण दुर्लक्ष केलं. त्यात जमीन, पाणी, जंगलं इतकंच काय, माणसांचीही आपण फिकीर केली नाही, तिथे जनावरांची काय कथा? आंध्राची ‘ओंगल’ आणि गुजरातेतील ‘गिर’ गाय ब्राझीलमध्ये जाऊन चौपट दूध देते आणि इथे आपल्याच देशात तिच्या लेकरावासरांची आणि भावकीची साधी दखलसुद्धा घेतली जाऊ नये? सजल राहतो, त्या एकटय़ा नागपूर शहराला रोज २०-२५ लाख लिटर दूध लागते आणि संपूर्ण विदर्भातील ११ जिल्हे मिळून जेमतेम सव्वाआठ लाख दुधाचं उत्पादन करतात. गुजरात, आंध्र, छत्तीसगढमधून विदर्भात दुधाची गंगा वाहते आणि इथल्या स्थानिक गाईचं वाण कोणतं, त्यांचं नाव काय, क्षमता किती, हेही माहिती नसावं! का हे दारिद्रय़? शंभर म्हशी खरेदी करून, एक डेअरी चालवून हा प्रश्न सुटणार आहे का? नसेल तर मी काय केलं पाहिजे? हे प्रश्न बायोटेक्नॉलॉजिस्ट सजल कुलकर्णीला अस्वस्थ करताहेत. आणि त्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी सजल कंबर कसून कामाला लागला आहे. तो विदर्भातील गावरान गाईचं वर्गीकरण करतोय. आदिवासी, गोवारी, कामाठी यांचं परंपरागत पशुधन काय आहे? ते ओळखायचं कसं, ही जनावरं खातात काय? काम किती करतात? दूध किती देतात? त्यांना आजार कोणते होतात? त्यावर उपाय काय? लोकसंस्कृतीत त्यांचं स्थान काय, या सगळ्यांचा सजल अभ्यास करतोय.
येत्या डिसेंबरमध्ये अभ्यास पूर्ण झाला की ‘नॅशनल ब्युरो ऑफ अ‍ॅनिमल जेनेटिक रिसोस्रेस’ या संस्थेमार्फत विदर्भातील गावरान गाई-बलांना ओळख प्राप्त करून देण्याचा त्याचा मानस आहे. सजलच्या प्रयत्नातून विदर्भातील गाई-वासरांची सरकारदरबारी दखल घेतली जाईल. त्यामुळे अशा जनावरांच्या संवर्धनाचा, विदर्भामध्ये पुरेशी स्थानिक पशुधनवाढ होण्याचा  मार्ग प्रशस्त होईल, याविषयी विश्वास वाटतो.
दोन वर्षांपूर्वी सजल ‘विदर्भातल्या या गावठी जनावरांना काहीतरी नाव असेलच ना..’ म्हणायचा. इथल्या जनावरांना ओळखच नाही, हे बहुधा त्याला सहन होत नाही. अलीकडेच आमची चर्चा झाली तेव्हा त्याने सांगितलं, ‘त्यांना ‘कठाणी’ म्हणतात.’’ चामुर्शी नावाच्या गावात त्याला हा शोध लागला. ‘कठाणी’चा अर्थ आणि त्याच्या शोधाची रोचक गोष्टही त्याने सांगितली. ती त्याच्यासारख्या बायोटेक्नॉलॉजिस्टच्या तोंडूनच ऐकायला हवी. सजलाच्या या शोधाच्या वाटेवरच त्याच्याविषयी वाटणाऱ्या विश्वासाची बीजे रुजलेली आहेत.
सध्या सजल ‘बायफ’चा फेलो आहे. आपल्या कामासोबतच तो लेखा मेंढा गावाच्या वनसंपत्तीचं मोजमाप करण्यासाठी डॉ. माधव गाडगीळ यांना साहाय्य करतोय. जंगलांचं संवर्धन व्हावं, म्हणून आपल्या पूर्वजांनी देवराया निर्माण केल्या. त्याच धर्तीवर स्थानिक पशुधनाची वाढ व्हावी, संवर्धन व्हावं, म्हणून ठिकठिकाणी विकेंद्रित पशुसंशोधन-संवर्धन केंद्र निर्माण व्हावीत, स्थानिक पशूंचं गुणबीज जपणाऱ्या जर्म प्लास्म बँका निर्माण व्हाव्यात, असं सजलचं स्वप्न आहे.   

light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
feast of snowballs juicy fruits and green fodder for animals at Karunashram Orphanage in Wardha
वन्यप्राणी करताहेत उन्हाळा एन्जॉय! बर्फ के गोले, रसभरीत फळे अन हिरवा चारा यांची मेजवानी
Rejuvenation of water bodies Uran
वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी पाणवठे पुनर्जीवित
winners of patra chawl
पत्राचाळीतील ३०६ विजेत्यांची घरांची प्रतीक्षा संपेना, भोगवटा प्रमाणपत्र न मिळाल्याने ताबा प्रक्रियेस विलंब