तुमच्या मुद्दय़ाची चांगली बाजू समजावून सांगा. वाद घालताना तुम्ही भावनावश झालात तर तुमचा मुद्दा चांगल्या प्रकारे मांडला जाऊ शकत नाही. भावनावश होऊन आरडाओरडा करू नका. त्यामुळे विरोधकाला तुमच्यावर वरचढ होण्यास मदत होते.
तुमचा दृष्टिकोन सकारात्मक आणि व्यावसायिक असावा.
चर्चेमधून तुम्हाला काय साध्य करायचे आहे, हे विसरू नका. त्यामुळे विषयांतर होऊ देऊ नका. चर्चेला फाटे फोडण्याचा प्रयत्न होईल, ते हुशारीने टाळा.
सर्वाना रुचणारा विषय घ्यावा. संकुचित दृष्टिकोन ठेवू नका. संघभावनेवर भर द्या.
लोक चिथावणी देण्याचा प्रयत्न करतील व त्या सापळ्यात तुम्ही अडकाल. तुमचे डोके भडकले की तुम्ही विवेकहीन होता व चर्चा तर्कशुद्ध राहत नाही. अनुभवांतून याबाबत काही ठोकताळे तयार झाले आहेत.
तुमचा जो आदर्श असतो, ती व्यक्ती अशा परिस्थितीमध्ये कशी वागेल ते नजरेसमोर आणा व तसे वागा. पण या ठिकाणीही तारतम्य महत्त्वाचे.
एकंदर परिस्थितीकडे तटस्थपणे पाहा. भावनावश न होता परिस्थितीचे आकलन करून घ्या.
वाद घालणाऱ्या तुमच्यासमोरील व्यक्तींवर काल्पनिक प्रश्नांचा भडिमार करा. विरुद्ध पक्षाला विचार करायची संधी देऊ नका.
शांत राहा. त्यासाठी १० आकडे मोजा. रागाची पहिली लाट शांत झाली की तुमचा स्वत:वर ताबा राहील आणि त्यानंतरचे तुमचे प्रतिसाद तर्कशुद्ध होतील.
दीर्घ श्वसन करा, त्यामुळेही मानसिक शांतता मिळेल.
शेवटी एक लक्षात घ्या, आनंदी वृत्तीने वावरणे म्हणजेच सर्वात मोठा बदला घेणे होय. तुम्ही आनंदी झाला तर तुमच्या विरोधकाला ते डाचेल. त्यामुळे तुम्ही शांत राहणे हेच त्याच्या खोडसाळपणावर उत्तर असते. तुमचा तणाव नाहीसा झाला तर त्यांना चपराक बसल्यासारखे वाटते.
मोबाइल एमबीए – जो ओवेन, पिअर्सन, मराठी अनुवाद – डायमंड पब्लिकेशन.