हातात पदवी असते, पण नोकरी नसते.. स्ट्रगल पीरिअडच्या- लौकिकार्थाने रिकामपणाच्या म्हणवल्या जाणाऱ्या कालावधीतही करिअरला आकार देणारं असं बरंच काही आपण संपादन करू शकतो. त्याबद्दल.
पदवी संपादन करण्याच्या उंबरठय़ावर असताना अनेकांच्या मनात ‘पुढे काय?’ ही संभ्रमावस्था असते आणि मग पदवी पदरात पडल्यानंतर सुरू होतो तो स्ट्रगल पीरिअड.. हा कालावधी असतो मिश्र भावभावनांचा! एकीकडे शिक्षणाचा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण झाल्याने आलेला आत्मविश्वास, तर दुसरीकडे नोकरीचा नेमका रस्ता अद्यापही स्पष्ट न झाल्याने कातावलेला जीव. भावी करिअरविषयी ओळखीपाळखीतल्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना मेटाकुटीला आलेलो आपण! नोकरी करायची की पदव्युत्तर शिक्षण घ्यायचं, हा समोर उभा राहिलेला पेच! या सगळ्या अवस्थांतून युवावर्ग आणि त्यांचा पालकवर्ग जात असतो.
तुम्ही कुठल्याही विद्याशाखेचे पदवीधर असा, काही गोष्टी या सर्वाना सारख्याच पद्धतीने सोडवाव्या लागतात. खरं तर शिक्षण पूर्ण होऊन नोकरी संपादन करण्याचा हा मधला काळ साऱ्यांसाठीच खूप मौल्यवान असतो. हा वेळ तणावात अथवा संभ्रमावस्थेत घालवण्यापेक्षा या वेळेचा उपयोग कसा करून घेता येईल, याकडे युवावर्गाने लक्ष दिले तर या काळाचे चीज होऊ शकते.
शिक्षण पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्यांची अवस्था ही घाण्याला बांधलेल्या बैलासारखी असते आणि नोकरी मिळाल्यानंतरही या अवस्थेत फारसा बदल संभवत नाही. नोकरीची सुरुवातीची काही वर्षे नवे काम शिकण्याची, भोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची असतात. हे लक्षात घेता या मधल्या वेळात विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयाला पूरक असे प्रशिक्षण घेता येऊ शकते. आवडता छंद जोपासता येऊ शकतो किंवा भटकंतीत हा वेळ व्यतीत करता येईल. कारण असा ‘अवकाश’ पुन्हा लगेचच प्राप्त होणे तसे मुश्कीलच असते. विद्यार्थ्यांना ज्या क्षेत्रात झेप घ्यायची आहे, त्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कंपनीत छोटे-मोठे काम, सर्वेक्षणात सहभाग अथवा औपचारिक अल्पमुदतीचे प्रशिक्षण घेण्याच्या अनेक संधी शोधता येतात.
केवळ नोकरी कधी मिळणार याची काळजी करत डोकं धरून बसण्यापेक्षा प्रशिक्षण वा कामात मन गुंतवल्यास हे कामच ‘स्ट्रेसबस्टर’चं काम करतं. उत्तम मार्कानी पदवी हाती मिळण्यासाठी अभ्यासात डोकं खुपसून बसताना आणि परीक्षांच्या जंजाळात गुंतून बसताना विद्यार्थ्यांचे या उमेदीच्या वर्षांत शारीरिक तंदुरुस्तीकडेही दुर्लक्ष होतं. अशा वेळेस हा वेळ व्यायाम करण्याकरता, मनसोक्त खेळ खेळण्याकरता देता येईल. मुळात या वेळेचा आसुसल्यागत उपयोग करण्याची ओढ मुलांमध्ये हवी. सुरक्षित कवचाला भेदून व्यावसायिक जगात पाऊल टाकण्याआधी मुलाने चौफेर दृष्टी विकसित करायला हवी आणि त्यासाठी पालकांनीही आग्रही राहायला हवं. हे काही महिने, कदाचित वर्ष हे त्या मुलासाठी लौकिकार्थाने रिकामपणाचं असलं, तरी त्यामुळे पूर्ण आयुष्यभराच्या कारकिर्दीत फार फरक पडतो, असं नाही. त्यामुळे हा कालावधी मुलाने आणि त्यांच्या पालकांनीही सबुरीने आणि दमाने घ्यायला हवा.
आपल्याला ज्या क्षेत्रात शिरायचं आहे, त्या उद्योगक्षेत्रातील उदा. उत्पादन, सेवा, हॉस्पिटॅलिटी, बँकिंग, वित्त, विमा क्षेत्राचे स्वरूप नेमके काय आहे, त्यात कुठल्या संधी आहेत, त्यात कुठली कौशल्ये उपयुक्त ठरतात हे समजून घ्यायला हा कालावधी उपयुक्त ठरतो. त्या क्षेत्राशी निगडित एखादे बारीकसारीक काम करणे हेही त्या मुलांसाठी इंटरेस्टिंग ठरू शकतं. ते करताना कामासंबंधीच्या तांत्रिक बाबी, सहकाऱ्यांशी जमवून घेणे, प्रवास आणि कामाचे रुटीन कसे असेल, याची कल्पना मुलांना आपसूकच येते.
आज इंटरनेटमुळे आवडत्या क्षेत्रातील माहितीचा खजिना आपल्यासमोर खुला होऊ शकतो. हव्या त्या क्षेत्रातील माहिती गोळा करणे, त्याचे विश्लेषण करणे, ती पडताळून पाहणे हे करण्यासाठी हा वेळ उपयोगात आणता येईल. यामुळे क्षेत्रासंबंधीची अद्ययावत माहिती कळते. त्यासाठी आवश्यक ठरणारी अर्हता आणि कल यांचा मेळ घालायला मदत होते. आपली नोकरीची गरज आणि पर्याय यासंबंधी कुठली भूमिका घ्यायची, हेही विद्यार्थ्यांना स्पष्ट होऊ लागते. आपल्या नेमक्या अपेक्षा, कुठल्या स्पेशलायझेशनमध्ये काम करायचं, हे ठरायला यामुळे आपोआपच मदत होते.
या क्षेत्राशी संबंधित असलेल्या व्यक्तींना मग ते एखाद्या कंपनीतील अधिकारी असोत, कर्मचारी असोत वा त्यासंबंधी प्रशिक्षण देणारे प्राध्यापक असोत, अनुभवी व्यक्तींना भेटल्यामुळे आपल्या करिअरची दारे किलकिली होऊ शकतात. आपली संबंधित क्षेत्रासंबंधीची विचार प्रक्रिया वेग घेऊ लागते. त्यांच्या सल्ल्याने आपल्याला आश्वस्त वाटतं. आपली त्या प्रांतातील गती, कल याचा अंदाज येऊन दिशा स्पष्ट व्हायला मदत होऊ शकते.
एका बाबतीत मात्र स्पष्टता हवी; ती अशी की, आपले इतर मित्र अमूक एका- उदा. आयटी क्षेत्रात प्रवेश करतात, म्हणून आपण करू नये. आपल्याला काय झेपते, आपली नेमकी आवड काय आहे आणि आपली अर्हता लक्षात घेऊन नोकरी- करिअरची निवड करावी. कळप प्रवृत्ती बाळगणे करिअरसाठी धोकादायक ठरू शकते.
आज नोकरी शोधताना नोकरी संबंधित वेगवेगळ्या वेबसाइटवरही नोंदणी अवश्य करावी. कारण त्यांना नोकरीची नेमकी नस माहिती असते. कधी कधी तुमचा सीव्ही पाहून अनुभव नसला तरी एखाद्या चांगल्या ठिकाणी फ्रेशर्सना संधी मिळू शकते किंवा आयटी, बीपीओसारख्या क्षेत्रांतील बडय़ा कंपन्या जेव्हा घाऊकरीत्या रिक्रुटमेन्ट करतात, त्यावेळेस तुम्हाला पटकन संधी उपलब्ध होते.
अनेकदा आपण ज्या क्षेत्रात जाण्यास इच्छुक आहोत, त्या क्षेत्रात फ्रेशर्सना कामाची संधी मिळते खरी, पण ही कामं तितकीशी महत्त्वाची नसतात. साधंसोपं असलं तरीही, ते काम कमी दर्जाचं मानून नाकारू नये. कारण अशा प्रकारचं काम करताना त्या क्षेत्रातील वेगवेगळ्या विभागांचे कामकाज, त्यांच्यातील समन्वय समजून घेता येतो. ओळखी होतात. तुमच्या कामातील स्पार्क लक्षात आला, की तिथे तुम्हाला कायमची नोकरीची संधीची ऑफरही मिळू शकते. रोज ठरावीक वेळेत जाणे-येणे, सहकाऱ्यांचं एक्स्पोजर या साऱ्या गोष्टी तुमच्या करिअरला आकार देणाऱ्या ठरतात. मात्र, ही नोकरी नाकारून जर घरी बसलात तर यातील कुठलीच गोष्ट होऊ शकत नाही. त्यामुळे करिअरच्या अंगणात पाय ठेवताना कुठलंही काम करण्याची तयारी तुम्ही दाखवायला हवी. त्याउलट, जर विशिष्ट प्रकारच्या कामाचा आग्रह धरलात तर त्यापलीकडच्या क्षेत्रात डोकावता येत नाही. जितके कामाचे स्वरूप वेगवेगळे असेल, जबाबदाऱ्या वेगळ्या असतील, विविध विभागांसोबत काम करण्याचा अनुभव मिळेल, तसे तुमचे काम अधिकाधिक परिपक्व होते आणि कामाचा आवाका आपोआप वाढतो. लहानपणी ‘पानात वाढलेलं सगळं खायला हवं,’ याकडे पालकांचा कटाक्ष असतो. कारण त्यामुळे वेगवेगळ्या पदार्थाच्या चवी विकसित होत जातात. करिअरच्या क्षेत्रात रांगत असताना कामाबाबतही हाच नियम लागू होतो.
अनेकांना प्रश्न पडतो की नोकरी करावी की पदव्युत्तर शिक्षण घ्यावे? या प्रश्नाचे उत्तर शोधताना तुमचा प्राधान्यक्रम लक्षात घ्यावा. आर्थिकदृष्टय़ा गरज असल्यास नोकरी करावी अथवा शिकण्याची आवड असल्यास शिकावे. तुमच्या पहिल्या पदवीचे स्वरूप कसे आहे, यावरही बरेच काही अवलंबून असते. जर तुमच्याकडे बीएस्सी, बीए, बीकॉम ही पदवी असेल तर या डिग्रींना नोकरीच्या बाजारपेठेत वजन नाही, अशा वेळेस पदव्युत्तर शिक्षण उपयुक्त ठरते. मात्र जर तुमच्याकडे आयआयटीसारखी खणखणीत डिग्री असेल तर नोकरी करायची की शिकायचे हा निर्णय तुमच्यावर अवलंबून आहे. खरे तर तुमचा आतला आवाज तुम्हाला काय सांगतो, ते तुम्ही ऐकायला हवे. जर तुमच्या मनात व्यापार करायचा मनसुबा असेल तर पुढील शिक्षण घेण्यापेक्षा हव्या त्या व्यापारउदिमाच्या क्षेत्रात पाऊल टाकलेलं उत्तम! मात्र, जर तुमचा फॅमिली बिझनेस असेल तर मात्र बिझनेसचा पाया तयार असल्याने व्यवस्थापनाचे पदव्युत्तर शिक्षण घेतल्यास त्यासंबंधीची अद्ययावत तंत्रे अवगत करून ती तंत्रे आपल्या व्यापारात उपयोगात आणू शकाल. व्यवस्थापन शिक्षणाद्वारे कोअर टेक्निकल किंवा फायनान्स यासारख्या क्षेत्रात तुम्ही कॉम्बिनेशन पद्धतीचे ज्ञान संपादन करू शकता.
व्यवस्थापन शिक्षण हे पदवीनंतर लगेचच घ्यावे की नोकरीचा अनुभव घेतल्यानंतर घ्यावे, असाही प्रश्न काही विद्यार्थ्यांना पडतो. अशा वेळेस तुमची प्रवृत्ती उच्च शिक्षण घेण्याची आहे का, हे लक्षात घ्यावे. एखादी नोकरी करून दोन-तीन वर्षांनंतरही आपल्याला पुढे शिकता येईल यावर तुमचा विश्वास आहे की, नंतर शिक्षण घ्यायला जमणार नाही असं तुम्हाला वाटतं, यावरही बरंच काही अवलंबून आहे. खरे तर संबंधित क्षेत्रातील नोकरीचा अनुभव घेऊन नंतर तुम्ही व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले तर शिक्षणाचे उपयोजन तुम्हाला नोकरीत करता येते. आज अर्थार्जन करण्यासाठी घराबाहेरच पडावे लागते, असे नाही. ऑनलाइन कामे करून तुम्हाला पैसे मिळवता येतात. टेक्निकल रायटिंग, प्रोजेक्ट वर्क, सल्लामसलत यासारखी कामे करून तुम्हाला मानधन मिळवता येऊ शकते.
मात्र, करिअरची योजना बनवताना ‘प्लान बी’ म्हणजेच पर्यायी योजना तयार ठेवावी. एखाद्या क्षेत्राला बरकत आहे, म्हणून आपण तिथे जातो, इंडस्ट्रीत कुठे जायला आवडेल/ परवडेल, तिथला अनुभव घेऊन पुन्हा आपल्या ‘पॅशन’कडे परतायला आवडेल का आणि पुन्हा तिथे फ्रेशरपासून सुरुवात करण्याची तयारी आहे का, हेही पडताळणे गरजेचे आहे.
एखादे विशिष्ट करिअर मनात असेल तर तुमच्या क्षेत्रात भोवताली काय चाललंय, आघाडीच्या वर्तमानपत्रांत, मासिकांत त्याविषयी काय छापून येतेय हे जाणून घ्यायला हवे. त्यासंबंधीचे कार्यक्रम, प्रदर्शने यात सहभागी व्हायला हवे. यामुळे आपोआपच ज्ञानाच्या उपयोजनाच्या कक्षा रुंदावतात. आणि मग पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या कॅम्पस रिक्रुटमेन्टमध्ये वा नोकरीच्या मुलाखतीत क्षेत्राच्या बदलत्या विश्वासंबंधीची तुम्हाला असलेली जाणीव तुमच्या बोलण्यातून प्रतीत झाली तर प्रचंड फरक पडतो, कारण पुस्तकी ज्ञानापलीकडे झेपावत ज्ञानाचे प्रत्यक्ष उपयोजन तुमच्या बोलण्यातून डोकावत असते. तुम्हाला कुठल्या करिअरच्या वाटेला जायचे आहे, त्यात कुठल्या कौशल्यांची गरज असते, हेही तुम्हाला ठाऊक असायला हवे. सेल्समनच्या बोलण्यास स्मार्टनेस हवा. कामाची पॅशन, स्पार्क आणि फ्लेक्झिबिलिटी तुमच्या बोलण्यातून डोकावायला हवी.  
नवनवे बदल आत्मसात केले तर मग तूर्तास करिअरच्या अंगणात प्रवेश केला असलात तरी आभाळ कवेत घ्यायला वेळ लागत नाही.
suchita.deshpande@expressindia.com