व्यवस्थापनाच्या दुसऱ्या वर्षांमध्ये स्पेशलायझेशनचे जे अनेक पर्याय उपलब्ध असतात त्यामध्ये वित्तीय व्यवस्थापन (फायनान्शिअल मॅनेजमेंट) हा एक महत्त्वाचा पर्याय आहे. या स्पेशलायझेशनमध्ये अनेक वेगवेगळ्या विषयांचा समावेश होतो.
या वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करताना पाठय़पुस्तके तसेच संदर्भ पुस्तके याव्यतिरिक्त इतर अनेक गोष्टी शिकता येतात. वित्त विषयाचे काही पेपर्स गुंतवणुकीसंबंधी, बँकिंगविषयी तसेच स्टॉक एक्स्चेंजसंबंधी असतात. या विषयांचे मूलभूत तत्त्व समजून घेण्यासाठी त्या त्या संबंधित संस्थांना भेटी देऊन त्यांची कार्यपद्धती समजून घेणे आवश्यक आहे. स्टॉक एक्स्चेंजविषयक पेपर समजावून घेण्यासाठी स्टॉक एक्स्चेंजला प्रत्यक्ष भेट देऊन ऑनलाइन ट्रेडिंग कसे चालते हे पाहता येते. त्याचप्रमाणे स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाइटवर नोंदणीकृत कंपन्यांच्या आर्थिक परिस्थितीविषयक माहिती दिलेली असते. त्यामुळे मुंबई स्टॉक एक्स्चेंज व नॅशनल स्टॉक एक्स्चेंज यांच्या वेबसाइट्स बघण्याची सवय लावून घेतली पाहिजे. याशिवाय फायनान्स हे स्पेशलायझेशन घेतलेल्यांनी केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाची वेबसाइटसुद्धा आवर्जून बघितली पाहिजे. या वेबसाइटवर दर महिन्याला देशाच्या आर्थिक परिस्थितीचे विवरण दिले जाते. प्रत्येक महिन्यामध्ये देशाची आर्थिक परिस्थिती स्पष्ट करणाऱ्या निकषांची माहिती मिळते. उदा. अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर, औद्योगिक उत्पादनाची वाढ किंवा घट दाखवणारा दर, वेगवेगळ्या विभागांचा म्हणजे शेती, पायाभूत उद्योग, सेवाक्षेत्र यांच्या वाढीचा दर इत्यादी उपयुक्त माहिती या वेबसाइटवर उपलब्ध असते. देशाचे अंदाजपत्रक , परकीय थेट गुंतवणूक (फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट) अशा अनेक महत्त्वाच्या बाबींची माहिती या वेबसाइटवर मिळते. ही माहिती केवळ वित्तीय व्यवस्थापनाच्याच नाही तर एमबीए करणाऱ्या सर्वच विद्यार्थी-विद्याíथनींना उपयुक्त आहे. भांडवल बाजाराचे नियंत्रक (रेग्युलेटर) म्हणून काम करणाऱ्या सेबी या संस्थेची वेबसाइटसुद्धा अत्यंत उपयुक्त माहिती देते. या वेबसाइटवर सेबीचे वेगवेगळे नियम पाहता येतात. ‘मनी कंट्रोल’ या वेबसाइटवर म्युच्युअल फंडासंबंधी माहिती मिळते. हे सांगण्यामागचे प्रयोजन असे की, ‘फायनान्स’ हे स्पेशलायझेशन घेतलेल्यांना पुस्तकी अभ्यास करणे जसे अनिवार्य ठरते, त्याचप्रमाणे माहिती आणि ज्ञान अपडेट ठेवण्याकरता संगणकीय मदत गरजेची ठरते. वर नमूद केलेल्या वेगवेगळ्या वेबसाइट्स, पाहण्यासोबतच इतर काही महत्त्वाच्या गोष्टीही शिकाव्या लागतात. उदा. स्टॉक एक्स्चेंज इंडेक्स कसा काढतात? ग्राहक किंमत निर्देशांक (कन्झ्युमर प्राइम इंडेक्स’ म्हणजे काय? अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर कसा निश्चित केला जातो इत्यादी अनेक गोष्टींचा समावेश होतो. याचबरोबर स्वत:चे व आपल्या कुटुंबीयांचे आर्थिक नियोजन कसे करावे, गुंतवणूक कुठे करावी, गुंतवणूक करताना आपली फसवणूक कशी टाळावी, इन्कम टॅक्स रिटर्न कसे भरावे, पॅन नंबर कसा काढावा अशा अनेक गोष्टी शिकता येतील. आजच्या युगामध्ये माहिती -तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक माहिती मिळवता येते. स्वत:च्या मोबाइलवर अशी माहिती डाऊनलोड करून ज्ञानात भर टाकता येते.

म नुष्यबळ विकास (ह्य़ुमन रिसोर्स डेव्हलपमेंट) या स्पेशलायझेशनमध्ये या विषयाचा प्रत्यक्ष उपयोग करत अनेक महत्त्वाच्या बाबी लक्षात घेतात. सर्वप्रथम ज्याला आपण ‘बिहेव्हिअरल सायन्स’ म्हणतो, ते प्रत्यक्ष व्यवहारात शिकता येते. शेवटी एखाद्या व्यवस्थापकाचे किंवा उद्योजकाचे यश हे तो मानवी परस्परसंबंध कसे हाताळतो यावरच अवलंबून असते. यामुळे मनुष्यबळ विकास विषयातील वेगवेगळ्या संकल्पना आपण प्रत्यक्ष व्यवहारात कशा उपयोगात आणतो याकडे लक्ष देता येईल. वेगवेगळ्या कंपन्यांतील, सामाजिक संस्थांतील तसेच अगदी लहान व्यवसाय करणाऱ्या संस्था यामध्ये मनुष्यबळ विकासाचे काही धोरण आहे का हे बघता येईल. काही ठिकाणी असे लक्षात येईल की, काही कंपन्यांमध्ये असे कोणतेही धोरण अस्तित्वात ननाही. मग नकळतच असे धोरण असलेल्या संस्था किंवा कंपन्या आणि धोरण नसणाऱ्या कंपन्या यांची तुलना करता येईल आणि महत्त्वाचे निष्कर्ष काढता येतील. कंपन्यांना भेट हे याही स्पेशलायझेशनमध्ये आवश्यक ठरते. पण काही कारणांमुळे कंपन्यांना भेट देणे शक्य नसेल तर कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी आपले नातेवाईक, मित्र-मैत्रिणी इत्यादींशी बोलून त्यांच्या कंपनीतील धोरणांची माहिती करून घेता येईल. यामध्ये आपले काही परिचित सरकारी नोकरीत असतील, काही खासगी क्षेत्रात असतील त्यांच्याशी बोलून तुलनात्मक निष्कर्ष काढता येतील. औद्योगिक संबंध किंवा इंडस्ट्रिअल रिलेशन्स हा या स्पेशलायझेशनमधील एक महत्त्वाचा विषय असतो. याविषयी प्रत्यक्ष माहिती करून घेण्यासाठी कामगार संघटनांच्या कार्यालयाला भेटी, त्यांच्या नेत्यांशी चर्चा असा मार्ग वापरता येईल. यासाठी आपण एक ग्रुप करून किंवा आपण शिक्षण घेत असलेल्या संस्थेतर्फे अशा भेटी देता येतील. संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या काय समस्या आहेत हेही जाणून घ्यायला हवे. अलीकडे असाही मतप्रवाह आहे की, आपल्या देशातील कामगार कायदे हे जुने व कालबाह्य झाले आहेत आणि म्हणून ते बदलायला हवे. मात्र, वेगवेगळ्या संस्थांमधील विशेषत: असंघटित कामगारांची परिस्थिती बघितल्यावर खरोखरच हे कामगार कायदे रद्द करावे का, यावर स्वत:चे मत बनवता येते.
याशिवाय मनुष्यबळ विकास विभागाचे एक महत्त्वाचे काम म्हणजे कामगिरीचे मूल्यमापन (परफॉर्मन्स अप्रेझल.) हे मूल्यमापन करण्याच्या कोणत्या पद्धती प्रत्यक्ष व्यवहारात वापरल्या जातात हे पाहता येते. आपण जी वेगवेगळी तंत्रे शिकतो ती प्रत्यक्षात कशी वापरली जातात हे बघणे उपयुक्त ठरते. उदा. बॅलन्स्ड स्कोअरकार्ड कंपन्यांमध्ये कसे वापरले जाते हे पाहता येते.
सारांश, याबाबत असे म्हणता येईल की, मनुष्यबळ विकास व व्यवस्थापन (ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड मॅनेजमेंट) या स्पेशलायझेशनमध्येसुद्धा बाहेरील जगात शिकण्यासारख्या खूप बाबी आहेत. यामध्ये महत्त्वाचा भाग असा की, आपले लक्ष केवळ आंतरराष्ट्रीय कंपन्या, माहिती तंत्रज्ञान कंपन्या किंवा मोठय़ा भारतीय कंपन्या यावरच केंद्रित न करता सामाजिक संस्था, सरकारी व निमसरकारी संस्था, रुग्णालये, शैक्षणिक संस्था इ. अनेक संस्थावरसुद्धा देता येईल. या संस्थांतूनसुद्धा अनेक महत्त्वाच्या गोष्टी शिकता येतील. इतर स्पेशलायझेशन्सचा विचार पुढील लेखात करू.

Upsc ची तयारी: अर्थव्यवस्था : भारतातील बेरोजगारीचे अंत:प्रवाह
mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था – मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये
Force Motors out of tractor business news
फोर्स मोटर्स ट्रॅक्टर व्यवसायातून बाहेर

nmvechalekar@yahoo.co.in

नचिकेत वेचलकर

(लेखक पुण्याच्या संस्थेचे अधिष्ठाता आहेत.)