– फारुक नाईकवाडे

महाराष्ट्र गट क सेवेसाठी पहिली संयुक्त पूर्व परीक्षा १० जून २०१८ रोजी प्रस्तावित आहे. या परीक्षेचे अभ्यास नियोजन कसे असावे याबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे. दुय्यम निरीक्षक, लिपिक टंकलेखक आणि कर सहायक या वेगवेगळ्या विभागांमधील वर्ग तीनच्या पदांवरील भरतीकरिता पूर्वी आयोगाकडून स्वतंत्र जाहिरात, स्वतंत्र अर्ज व स्वतंत्र पूर्व परीक्षा घेतल्या जात होत्या. राज्य लोकसेवा आयोगाच्या नव्या योजनेनुसार या तिन्ही पदांसाठी सन २०१८ पासून संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून ते यापकी एक, दोन किंवा तिन्ही पदांसाठी बसू इच्छितात का असा विकल्प देण्यात येईल. ज्या आणि जेवढय़ा पदाकरिता उमेदवारांनी विकल्प दिलेला असेल त्या सर्व पद भरतीसाठी हा एकच अर्ज विचारात घेण्यात येईल. पण प्रत्येक पदासाठीचा या संयुक्त पूर्व परीक्षेचा निकाल वेगवेगळा घोषित करण्यात येईल. प्रत्येक पदासाठी भरायच्या जागांची संख्या वेगळी असल्याने त्या आधारावर त्या पदाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र करावयाच्या उमेदवारांची संख्या ठरविण्यात येते. ही संख्या लक्षात घेऊन संयुक्त पूर्व परीक्षेचा या तीन पदांकरिता स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

यापकी लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक या दोन पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या पूर्व परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम समानच होता तर दुय्यम निरीक्षक पदासाठीचा अभ्यासक्रम वेगळा होता. नव्या योजनेनुसार लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक या पदांच्या पूर्व परीक्षेतील मराठी व इंग्रजी हा भाग मुख्य परीक्षेमध्ये टाकण्यात आला आहे. तर मुख्य परीक्षेतील अभ्यासक्रमाचा सामान्य क्षमता चाचणीचा भाग पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. दुय्यम निरीक्षक पदासाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांना अभ्यासक्रमामध्ये काही बदल जाणवणार नाही. नव्या योजनेनुसार पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहे.

पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम

१.      चालू घडामोडी- जागतिक तसेच भारतातील

२.      नागरिकशास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन), ग्राम व्यवस्थापन (प्रशासन)

३.      इतिहास – आधुनिक भारताचा विशेषत महाराष्ट्राचा इतिहास

४.      भूगोल – (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी

५.      अर्थव्यवस्था – भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय़ व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीति इत्यादी

६.      सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र (Physics) , रसायनशास्त्र (Chemistry), प्राणीशास्त्र (Zoology) , वनस्पतीशास्त्र (Botany), आरोग्यशास्त्र (health)

७.      बुद्धिमापन चाचणी व अंकगणित बुद्धिमापन चाचणी – उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न

अंकगणित – बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णाक व टक्केवारी

स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाचे नियोजन करताना मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे स्वरूप समजून घेणे आणि त्यांचे विश्लेषण करणे ही मूलभूत पायरी असते. पण गट क पदांसाठीच्या संयुक्त पूर्व परीक्षेचे हे पहिलेच वर्ष आहे आणि अभ्यासक्रमही दोन पदांच्या आधीच्या अभ्यासक्रमापेक्षा वेगळा आहे. त्यामुळे दुय्यम निरीक्षक पदाच्या सन २०१४ पासून झालेल्या पूर्व परीक्षांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासणे हा उत्तम पर्याय आहे. प्रत्येक प्रश्न वाचून त्याबाबत काही विचार करणे आवश्यक आहे. अमुक एक प्रश्न का विचारला आहे; तो अभ्यासक्रमाच्या कोणत्या घटकावर आधारित आहे; त्यातील मुद्दे अभ्यासक्रमातील दुसऱ्या कोणत्या घटकांशी संबंधित आहेत का आणि या घटकाच्या कोणकोणत्या पलूंवर प्रश्न विचारता येतील यावर विचार करायला हवा. या विश्लेषणाच्या आधारावर अभ्यासक्रमाच्या कोणत्या भागावर किती आणि कशा स्वरूपाचे प्रश्न आले आहेत ते समजून घेणे आणि याबाबत आयोगाच्या अपेक्षा समजून घेणे शक्य होते. असे विश्लेषण तयारीला दिशा मिळण्यासाठी उपयोगी पडेल. त्या आधारे अभ्यासक्रमातील कोणत्या घटकावर जास्त भर द्यायचा, कोणत्या घटकावर कमी कष्ट घेतलेले चालतील याचा अंदाज येतो आणि अभ्यासाची दिशा व नियोजन निश्चित करता येईल. जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करताना या दृष्टीने ‘महाराष्ट्र गट क सेवा अभ्यासप्रश्नपत्रिका’ हे राष्ट्रचेतना प्रकाशनाचे पुस्तक विश्लेषण आणि सराव दोन्हीसाठी उपयुक्त ठरेल.

या परीक्षेच्या उत्तर पत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेत नमूद केलेल्या योग्य उत्तरांनाच गुण दिले जातात व प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतात. प्रत्येक पदासाठी उपलब्ध एकूण पदसंख्येच्या सुमारे पंधरा पट उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र होतील अशा रीतीने पूर्व परीक्षेच्या गुणांची सीमारेषा निश्चित करण्यात येते. या सीमारेषेच्या वर ज्या विद्यार्थ्यांचे एकूण गुण असतील त्यांना मुख्य परीक्षेसाठी प्रवेश मिळतो.