02 March 2021

News Flash

फ्लोरल डिझायनिंग

कलात्मकता आणि उत्तम अर्थार्जनाचा मिलाफ असलेल्या फ्लोरल डिझायनिंग या क्षेत्रातील अभ्यासक्रम आणि व्यवसाय संधींची सविस्तर माहिती-

कलात्मकता आणि उत्तम अर्थार्जनाचा मिलाफ असलेल्या फ्लोरल डिझायनिंग
या क्षेत्रातील अभ्यासक्रम आणि व्यवसाय संधींची सविस्तर माहिती-

फ्लोरल डिझाइन म्हणजे पानाफुलांचे उत्तमरीत्या केलेले सादरीकरण. म्हटली तर ही कलाही आहे आणि विज्ञानही. बदलती जीवनशैली आणि वाढते दरडोई उत्पन्न यामुळे देशातील फ्लोरल डिझायिनग बाजारपेठेत मोठी वाढ झाली आहे. यामुळे साहजिकच प्रशिक्षित फ्लोरल व्यावसायिकांची मोठी निकड निर्माण झाली आहे.
फ्लोरल डिझायनर क्षेत्रात काम करणाऱ्यांना सर्जनशील आव्हानांचे आणि कलात्मक संधीचे विश्व खुले आहे.
फ्लोरल डिझायनिंग हा अनोखा आणि उत्तम अर्थार्जनाची क्षमता असलेला व्यवसाय असून यामध्ये वैविध्यपूर्ण कौशल्य आणि क्षमतांचा मेळ साधला जातो. हा व्यवसाय आपली नोकरी तसेच स्वत:चा व्यवसाय सांभाळूनही करता येतो.
फ्लोरल डिझायनर सर्जनशील, सेवा देणारा तसेच आपल्या कल्पनांना दृश्यरूपात व्यक्त करण्याचे कौशल्य असावे लागते. फ्लोरल डिझायनिंगमधील बदलत्या ट्रेण्ड्सचा विचार करता डिझायनरना नवनवीन कल्पनांना सामोरे जावे लागते आणि बदलत्या ट्रेण्ड्सना प्रत्युत्तर द्यावे लागते. समस्यांचे उत्तर शोधण्याचे कौशल्य आणि स्वतंत्रपणे काम करण्याची क्षमता याही महत्त्वपूर्ण बाबी आहेत. या क्षेत्रातील व्यक्तींकडे स्वयंशिस्त असण्याची गरज असून आपल्या वेळेचे व्यवस्थापन करून डेडलाइन पाळणेही गरजेचे आहे. कामात सर्जनशीलता, सातत्य आणि परिश्रमांची गरज असते. सजावटीच्या ऑर्डर्स पूर्ण करण्याकरिता वारंवार लांबचा प्रवास करणे हाही या व्यवसायाचाच एक भाग आहे. फ्लोरल डिझायनरना इंटरनेट डिलिव्हरी, रिटेल फ्लॉवर स्टोअर याकरता वर्कशॉप सुरू करता येतात, तसेच फ्रीलान्स फ्लोरल डिझायनर म्हणून स्वतंत्रपणे काम करू शकतात. नियमित स्वरूपात हॉटेल्स, वेडिंग प्लॅनर, इव्हेन्ट मॅनेजमेन्ट कंपन्यांशी समन्वय साधत ऑर्डर मिळवता येतात.
प्रशिक्षित फ्लोरल डिझायनरसाठी आखण्यात आलेल्या अभ्यासक्रमात सैद्धांतिक माहिती आणि प्रात्यक्षिके यांचा समावेश असतो. फ्लोरल डिझायनिंगचा इतिहास, विविध प्रकारची फुले ओळखणे, स्थानिक तसेच आयात केली जाणारी फुले यांचा परिचय करून, पानांचे बोटॅनिकल नाव आणि ती किती दिवस टिकतात, याबाबत माहिती दिली जाते. फुलांचे उपयोग आणि वैशिष्टय़ेही सांगितली जातात. फुले अधिक टिकावीत यासाठी कोणती प्रक्रिया करावी लागते, त्याची पद्धत शिकवली जाते. त्याकरता उपयोगात आणल्या जाणाऱ्या उत्पादनांची माहिती दिली जाते. विविध प्रकारची फ्लोरल फोम उत्पादने आणि अ‍ॅक्सेसरीज यांची माहितीही अशा प्रकारच्या अभ्यासक्रमादरम्यान दिली जाते. विविध कार्यक्रम, समारंभ याकरता केल्या जाणाऱ्या फ्लोरल अरेंजमेन्टचा बेस असलेल्या रंगाची थिअरी या वर्गात स्पष्ट केली जाते. तसेच डिझाइनची मूळ तत्त्वे आणि घटक शिकवले जातात.
फ्लोरल डिझायनिंग कलेत उपयोगात आणली जाणारी विविध फ्लोरल तंत्रे, आकार आणि स्टाइल्स शिकवल्या जातात. प्रात्यक्षिकांवर आधारित विविध संकल्पनांवर विद्यार्थ्यांना काम करावे लागते. या संदर्भातील अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना स्थानिक फुले वापरण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.
जर फुले सहज उपलब्ध होणारी असली तर संपूर्ण अरेंजमेंट सवलतीच्या दरात होऊ शकते. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन आणि पर्यायाने फ्लोरिकल्चर उद्योगाला चालना मिळते.
फ्लोरल डिझायनिंगच्या अभ्यासक्रमांमध्ये शेतकरी तसेच नर्सरीत फील्ड ट्रीप करण्यावर भर देण्यात येतो. अनेक अभ्यासक्रमांच्या अंती फ्लोरल डिझायनर्सकडे इंटर्नशिप करण्याची संधी मिळू शकते.
फुलांची आवड आणि स्वतंत्र उद्योजक बनण्याची इच्छा असलेल्यांना हा करिअरचा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
विविध प्रकारची फुले आणि पाने यांची सजावट योग्य पद्धतीने करण्याचे प्रशिक्षण तर संबंधित अभ्यासक्रमात मिळतेच, त्याबरोबरच रंगसंगतीचे सिद्धान्त, डिझाइन तंत्र विद्यार्थ्यांना शिकता येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2013 9:32 am

Web Title: floral designing
टॅग : Loksatta,Marathi News
Next Stories
1 अभियांत्रिकीची सामायिक प्रवेश प्रक्रिया
2 सेन्ट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिटय़ूट, लखनौ
3 सामाजिक-सांस्कृतिक विविधता आणि विज्ञानशिक्षण
Just Now!
X