कायदाविषयक अभ्यासक्रम हा उत्तम सामाजिक-व्यावसायिक प्रतीकेसह आर्थिक स्थैर्य देणारा अभ्यासक्रम आहे. गेल्या काही वर्षांत यासंबंधीचा पेशा स्वीकारण्याच्या दृष्टीने मोठय़ा प्रमाणावर विद्यार्थी कायदा संबंधित अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना दिसतात. परंपरागतरीत्या कायदा विषयातील पदवीधर आपले करिअर हे दिवाणी, फौजदारी वा राजस्वविषयक क्षेत्रात सुरू करायचे. आज मात्र, या संदर्भात कामगार वा कंपनीविषयक कायदे, करविषयक मामले, उत्पादनशुल्क, आंतरराष्ट्रीय व्यवहार, जंगल वा पर्यावरणविषयक कायदे इ. बहुविध, आकर्षक पर्याय उपलब्ध होत असून या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
परिणामी, कायदा या क्षेत्रानुसार त्यातील व्यावसायिक उदा. वकील तसेच अन्य स्वरूपाचे काम करणाऱ्यांमध्येही आमूलाग्र  बदल होत आहेत. या क्षेत्रात काम करणाऱ्यांना आता पैशासह प्रतिष्ठाही मिळू लागली आहे. पूर्वी उमेदवारीसह वैयक्तिक स्वरूपात काम करणाऱ्या वकिलांनी आज एकत्रित स्वरूपात व विविध गरजांनुसार सल्ला व मार्गदर्शन देण्यासाठी विविध स्वरूपात संघटित संस्था वा प्रतिष्ठान तयार करण्यावर भर दिला आहे. याचा लाभ  विशेषत: नव्याने क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या वकिलांना होताना दिसतो.
वकिलीसह कायदाविषयक कामगिरी आणि कामकाजाला गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय स्तरावर स्थापन होऊन कार्यरत असणाऱ्या नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीसारख्या संस्थांचे मोठे पाठबळ लाभले आहे. सिम्बॉयसिस, शारदा यासारख्या खासगी विद्यापीठांमध्येसुद्धा आता कायदा विषयातील पदवी-पदव्युत्तर व विशेष अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
ज्या विद्यार्थ्यांना कायदा विषयांत पदवीसह शिक्षण घेऊन आपले करिअर सुरू करायचे असेल अशा विद्यार्थ्यांसाठी बारावीनंतर कायदा विषयातील पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमाला बार कौन्सिल ऑफ इंडियाची मान्यता असते. कायदा विषयातील पदवीधरांना याच विषयातील पदव्युत्तर पदवी, एम.फिल्. वा पीएच.डी. यासारखे पर्याय उपलब्ध असतात.
कायदा विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी विविध ठिकाणच्या नॅशनल-लॉ युनिव्हर्सिटीजतर्फे राष्ट्रीय स्तरावर सामायिक प्रवेश पात्रता परीक्षा घेण्यात येते. या प्रवेश पात्रता परीक्षेत संबंधित विद्यार्थ्यांच्या कायदाविषयक ज्ञानाखेरीज इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान, वैचारिक आकलन, कल विषयीची चाचणी करण्यात येऊन त्यानुसार उमेदवारांची संबंधित अभ्यासक्रमासाठी निवड करण्यात येते. कायदाविषयक पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी फौजदारी, दिवाणी, कामगारविषयक, करसंबंधी, कंपनी कायदाविषयक, अबकारी क्षेत्र, बँकिंग व आर्थिक व्यवहार, ग्राहक हक्क संबंधित, माहिती अधिकार इ. क्षेत्रांत वकील वा सल्लागार म्हणून काम करता येते.
कायदा विषयातील पात्रताधारकांना नमूद केल्याप्रमाणे वकिलीचा व्यवसाय करण्याशिवाय खासगी कंपन्यांच्या कायदा विषयातील संधी, केंद्रीय लोकसेवा आयोग- राज्य लोकसेवा आयोग व विविध स्तरावर न्यायाधीश निवड पात्रता परीक्षा, बँकांमधील संधी इत्यादी बहुविध पर्याय उपलब्ध असल्याने त्या दृष्टीने कायदा या विषयातील अभ्यासक्रमाकडे वळण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे.