शिक्षकी पेशात रुची असलेले अनेक  पदवीधर शिक्षकी पेशात यायचे असेल तर द्यावी लागणारी सामाईक प्रवेश परीक्षा  देतात आणि शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छितात. अशा शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांना अनेकांना शिक्षण क्षेत्रातील एक पर्याय असलेल्या ‘विशेष शिक्षण’ या विषयी फारशी माहिती नसते. शिक्षक व्हायचे आहे पण काही वेगळ्या वाटा निवडायच्या आहेत असे वाटणाऱ्या धडपडय़ा तरुण-तरुणींसाठी विशेष शिक्षण हा एक आव्हानात्मक पेशा ठरू शकतो. त्यासाठी विशेष शिक्षक, विशेष शिक्षण इत्यादी शब्दांचा अर्थ आधी समजून घेऊयात.
विशेष शिक्षक म्हणजे विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिक्षक. विशेष गरजा असणारे विद्यार्थी म्हणजे साधारणपणे अपंग विद्यार्थी. आपण देशातील विविध कायद्यांद्वारे १० प्रकारचे व्यंग असणाऱ्या विद्यार्थ्यांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळते. त्यांच्यापैकी बऱ्याच जणांसाठी विशेष शाळांचा एक शैक्षणिक पर्याय असतो. विशेष शाळा म्हणजे कोणत्याही एका प्रकारच्या अपंग मुलांसाठी विशेष करून बनवलेल्या शाळा. या विशेष शाळांमध्ये विशेष शिक्षकांची नेमणूक केली जाते. राज्यात स्वयंसेवी संस्थांद्वारे चालवल्या जाणाऱ्या आणि अपंग विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या विशेष शाळांचे जाळे तयार झाले आहे. मोठय़ा संख्येने मान्यताप्राप्त शाळांतील शिक्षकांचे वेतन हे समाज कल्याण विभागातर्फे (राज्य सरकार) दिले जातात. अर्थात बी.एड. (विशेष शिक्षण) करणाऱ्या उमेदवारांना फक्त विशेष शाळेतच नोकरी मिळते असे नाही. मुख्य प्रवाहाच्या आपल्या नेहमीच्या (अव्यंग मुलांच्या) शाळेतही वर्गशिक्षक, रिसोर्स शिक्षक, श्ॉडो शिक्षक, उपचारात्मक शिक्षक अशा विविध पदांवर हे विशेष शिक्षक नोकरी करू शकतात. नव्या धोरणांनुसार अपंग विद्यार्थ्यांना शक्यतो विशेष शाळेत वेगळे काढून शिकवण्यापेक्षा नेहमीच्या मुख्य प्रवाहाच्या शाळेतच शिक्षण देण्याचा प्रयत्न आहे. अशा वेळी मोठय़ा संख्येने विशेष शिक्षकांची गरज साध्या शाळांनाही पडणार आहे. दिल्ली हायकोर्टाने तर प्रत्येक साध्या शाळेने दोन तरी विशेष रिसोर्स शिक्षक नेमावे असा अध्यादेश जारी केला आहे. सर्व शिक्षा अभियान व राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान याद्वारेसुद्धा अनेक प्रकारच्या संधींची दारे विशेष शिक्षकांसाठी खुली झाली आहेत. तेव्हा चाकोरीबाहेर विचार करणाऱ्या युवा वर्गाने या क्षेत्राची माहिती करून घेणे श्रेयस्कर ठरेल.  
 विशेष शिक्षक होण्यासाठीची अर्हता
विशेष शिक्षक होण्यासाठी बी.एड. (विशेष शिक्षण) ही पदवी आवश्यक असते. डी.एड (विशेष शिक्षण) सुद्धा आपल्या देशात उपलब्ध आहे. ज्या विषयी माहिती अन्यत्र उपलब्ध होऊ शकते. बी.एड. (विशेष शिक्षण) या पाठय़क्रमात पदवी परीक्षा (कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापन, माध्यम अभ्यास, गृहविज्ञान, वैद्यकीय इत्यादी) उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येतो. बी.एड. (विशेष शिक्षण) हा पाठय़क्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर विशेष शिक्षक म्हणून नोकरी किंवा कार्य करता येते. बी.एड. विशेष शिक्षण हे बी.एड. (कर्णबधिर), बी.एड. (अंध), बी.एड. (मतिमंद) आणि बी.एड. (अध्ययन अक्षम) अशा चार प्रकारांमध्ये सध्या उपलब्ध आहे.
 बी.एड. विशेष शिक्षण या पाठय़क्रमात प्रवेश घेण्यासाठी  कोणत्याही शाखेच्या (कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापन, माध्यम अभ्यास, गृहविज्ञान, वैद्यकीय इत्यादी) पदवी परीक्षेत किमान ५०% गुण (मागास वर्गीयांसाठी ४५% गुण) मिळणे आवश्यक आहे. ही पात्रता असल्यास विद्यार्थी प्रवेश परीक्षा देऊ शकतात.
 बी.एड. (विशेष शिक्षण)ची प्रवेश प्रक्रिया  
बी.एड.साठी सामाईक प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते. काही विशेष शिक्षण महाविद्यालये स्वत:ची वेगळी सीईटी घेतात तर काही महाविद्यालयांत महाराष्ट्र सामाईक प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेता येतो. या महाराष्ट्र सीईटी फॉर्ममध्येच विशेष शिक्षण हा पर्याय दिलेला असतो. तो निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष शिक्षण महाविद्यालयात प्रवेशासाठी पाठवले जाते.
 महाराष्ट्र सीईटी
ही प्रवेश परीक्षा साधारण जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात होते. त्याचा फॉर्म ऑनलाइन भरायचा असून तो http://www.oasis.mkcl.org/bed या संकेतस्थळावर साधारण एप्रिल महिन्यापासून उपलब्ध होतो. वर दिलेल्या संकेतस्थळावर मार्गदर्शनपर तपशीलवार माहिती उपलब्ध असते.
याव्यतिरिक्त हशु अडवाणी विशेष शिक्षण महाविद्यालयात विशेष शिक्षणात बी.एड. करू इच्छिणाऱ्यांसाठी मार्गदर्शन कक्ष उघडला आहे. याद्वारे ही प्रवेश परीक्षा देण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना एकत्रित करून मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्याची योजना आहे. या योजनेअंतर्गत विनामूल्य कार्यशाळा ११ मे २०१५ रोजी या महाविद्यालयात घेण्यात येणार आहे. नाव नोंदणीसाठी संपर्क साधा (०२२-२५५३०४१५ व २५५३१०४१).   ऑनलाइन फॉर्म भरताना मदत करणे, प्रवेश चाचणीची तयारी करणे, पर्याय निवडताना मार्गदर्शन करणे इत्यादीबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण देणे  हे या कार्यशाळेचे स्वरूप आहे.  
 बी.एड. (विशेष शिक्षण)   पाठय़क्रमांविषयी..  
होय. बी.एड. (विशेष शिक्षण) पाठय़क्रम व महाविद्यालय हे भारतीय पुनर्वास परिषदेतर्फे मान्यताप्राप्त असतात (असणे आवश्यक असतात.) विविध अपंगत्वाविषयीची विविध बी.एड. महाविद्यालये ही विविध विद्यापीठांशी संलग्न असतात. उदा.  मुंबई विद्यापीठाशी तसेच ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठाशी अनेक संलग्न  विशेष बी.एड. कार्यक्रम  उपलब्ध आहेत.  
 प्रवेश परीक्षा व बी.एड. (विशेष शिक्षण) पाठय़क्रम दोनही इंग्रजीवर प्रभुत्व नसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मराठी माध्यमातूनसुद्धा उपलब्ध आहेत.
प्रत्येक माणसात एक लहान मूल दडलेले असते असे सर्वच जण मानतात. परंतु प्रत्येक माणसात एक शिक्षकही दडलेला आहे असे बी.एड. कॉलेजेस मानतात. या दडलेल्या शिक्षकांना बाहेर काढून, प्रशिक्षण देऊन ‘सर्वासाठी शिक्षण’ या भारताच्या धोरणात खारीचा वाटा उचलायची संधी द्यायची हे विशेष शिक्षण महाविद्यालयाचे ध्येयविधान असते. कारण ‘सर्व’ म्हणजे त्यात विशेष गरजा असणारे अपंग विद्यार्थीसुद्धा आलेच! त्यांच्या शैक्षणिक हक्कांचे संरक्षण करणारे आणि  नोकरी, करिअरसोबत  समाधान, सामाजिक उत्तरदायीत्व असे दोन्हीही साधणारे हे व्यवसाय क्षेत्र निवडायला तुम्हाला नक्कीच आवडेल.
*  डॉ. अस्मिता हुद्दार
प्राचार्य,
हशु अडवाणी विशेष शिक्षण  महाविद्यालय principal.hacse@gmail.com

Centers for training of medical teachers are insufficient in the state
राज्यात वैद्यकीय शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी केंद्र अपुरे; वैद्यकीय शिक्षक संघटना म्हणते…
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी
Palghar, teachers election training,
पालघर : निवडणूक प्रशिक्षणाकरिता शिक्षकांची तारांबळ, मुल्यांकन चाचणी व निवडणूक प्रशिक्षण एकाच वेळेत
Inquiry into deterioration of health of police trainees Neelam Gorhes letter to Home Minister
पोलीस प्रशिक्षणार्थ्यांची प्रकृती बिघडल्याप्रकरणी चौकशी; विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे गृहमंत्र्यांना पत्र