डॉ. नीता ताटके,  क्रीडा मानसतज्ज्ञ

करोनानंतर नोकरी व्यवसायाच्या संधी कशा बदलत जातील, याबद्दल अनेकांच्या मनात शंका आहेत.  टाळेबंदीच्या काळातील ठप्प झालेले व्यवहार आणि अर्थचक्रातील बदल पाहता त्या रास्तही आहेत पण पुढे काय हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहेच. पुढच्या काळातील करिअरचा मार्ग कसा असेल, याविषयी विविध विषयांतील तज्ज्ञांनी लिहीलेली ही लेखमाला..

नवीन वर्षांत पदार्पण करत असताना भारतातसुद्धा ‘करोना’ची चाहूल लागली होती; पण या करोनाचा कहर होणार आहे आणि आपल्याला दोन महिन्यांच्या टाळेबंदीला सामोरे जावे लागणार आहे, असे तेव्हा कोणी सांगितले असते, तर आपण त्या व्यक्तीला अक्षरश: वेडय़ातच काढले असते. मार्च महिन्यात आधी ‘जनता कर्फ्यू’ आणि नंतर टाळेबंदी जाहीर झाल्यावरही, ‘ही थोडे दिवसांची बाब आहे’ म्हणून त्याच्याकडे सुरुवातीला फारसे गांभीर्याने बघितलेही जात नव्हते. मात्र करोना संसर्ग वाढू लागला आणि टाळेबंदी वाढली. सर्वच व्यवहार ठप्प झाले, क्रीडा क्षेत्रही याला अपवाद नव्हते. सर्व व्यायामशाळा, क्रीडा स्थाने बंद झाली आणि याचे कोणते विपरीत परिणाम क्रीडा क्षेत्रावर झाले हे आपण मागच्या लेखात बघितले.

टाळेबंदीमुळे प्रदूषण कमी झाले. प्राणी-पक्ष्यांचा मुक्त संचार सुरू झाला आणि जगण्याच्या धडपडीत व धावपळीत असलेल्या आपणा सर्वानाच या सर्व बदलांनी अंतर्मुख होण्यास भाग पाडले. करोनाच्या प्रतिबंधक उपायांमध्ये ‘चांगली प्रतिकारशक्ती’ असण्याचे महत्त्व अधोरेखित झाले. करोनासाठी औषध वा लस येण्यास किमान डिसेंबर महिना उजाडेल, तोपर्यंत आपण काही घरी बसून राहणार नाही, सर्वासाठीच प्राधान्यक्रमामध्ये ‘आरोग्य’ प्रथम स्थानावर असणार आहे, त्यामुळेच सर्वच स्तरांवर ‘आरोग्यासाठी व्यायाम’ यावर भर दिला जाणार असल्याने व्यायाम वा खेळ प्रशिक्षकांचे महत्त्व वाढणार आहे. करोनाच्या संकटाने या क्षेत्रामध्ये नव्या संधीचे दरवाजे उघडून दिले आहेत आणि क्रीडा प्रशिक्षकांनीदेखील नव्या कौशल्यांसहित पुन्हा जोमाने उभे राहण्याची वेळ आली आहे.

कोणती आहेत ही कौशल्ये? कमी जागेत सर्वागसुंदर व्यायाम देणाऱ्या, सर्व वयोगटांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या व्यायाम प्रकारांना जास्त महत्त्व येणार आहे, त्यामुळेच आपले भारतीय पारंपरिक व्यायाम प्रकार – सूर्यनमस्कार, योगासने, जोर, बैठका यामध्ये प्रशिक्षित प्रशिक्षकांची गरज भासणार आहे. छोटीमोठी मैदाने, सभागृहे, रस्ते या ठिकाणी ‘सामाजिक अंतर’ ठेवून वैविध्यपूर्ण तसेच सर्जनशीलतेची जोड असणाऱ्या व्यायाम प्रकारांना मागणी येणार आहे. गच्चीत चौकोन, वर्तुळ आदी आकारांची, सरळ, मध्येच वळण घेणारी एक लांबलचक ओळ आखून त्यावर विविध पद्धतींच्या उडय़ा, गिरक्या, रांगणे, एका वर्तुळात दोरीच्या उडय़ा मारणे, एका चौकोनात उठाबश्या काढणे असे विविध व्यायाम प्रकार करणाऱ्या एका छोटय़ा मुलीची चित्रफीत समाजमाध्यमांवर खूप गाजते आहे. जागा चिंचोळी आहे, काही साधने नाहीत अशा ठिकाणीसुद्धा अशा प्रकारचे मनोरंजनात्मक, पण शरीराला उत्कृष्ट व्यायाम देणाऱ्या व्यायामांचे छोटे-छोटे संच जो प्रशिक्षक घेऊ शकेल तो करोनानंतर येणाऱ्या ‘नवीन जीवनशैलीत (New Normal)चपखल बसू शकेल.

केवळ मुंबईच नव्हे तर बाहेरगावच्या व्यायाम व क्रीडा प्रशिक्षकांशी बोलताना लक्षात आले की, टाळेबंदीच्या सुरुवातीचे थोडे गोंधळाचे दिवस गेल्यावर, आधी दूरध्वनी संपर्काद्वारे, मग ‘व्हिडीओ कॉल’आणि नंतर अधिक अत्याधुनिक  माध्यमांचा उपयोग करून त्यांनी त्यांचे प्रशिक्षण सुरू ठेवले आहे. व्यायामाच्या खूप चित्रफिती आता समाजमाध्यमांवर उपलब्ध आहेत, मात्र करत असलेला व्यायाम बरोबर आहे की नाही हे सांगण्यासाठी प्रशिक्षकच हवा, त्यामुळे ज्या प्रशिक्षकांनी या माध्यमाशी जुळवून घेतले त्यांना चांगली मागणी आहे. मात्र या माध्यमात टिकण्यासाठी प्रशिक्षकांना बोलण्याचे, तांत्रिक बाबी सोप्या करून अचूक व परिणामकारकपणे मुलांपर्यंत पोहोचविण्याचे कौशल्य, त्याचबरोबर कुठला व्यायाम कशासाठी, किती वेळा करायला हवा, याबाबतचे आपले ज्ञानही वाढवावे लागणार आहेच. आपले ‘ग्राहक’ वा नोकरी टिकविण्यासाठी स्वत:चे आनंददायी वाटेल असे व्यक्तिमत्त्व, सकारात्मक दृष्टिकोन, आदी प्रेरणात्मक कौशल्येही वाढवावी लागणार आहेत.  स्वत:ची तंदुरुस्त शरीरयष्टी, योग्य ‘लेसन प्लॅन’, संभाषण चातुर्य या जमेच्या बाजू ठरणार आहेत. बदलत्या परिस्थितीला अनुसरून सहज हाताळता येईल, किमान जागेत बसेल असे क्रीडा साहित्य, आपल्या हवामानाला साजेसे, संपूर्ण कुटुंबाच्या व्यायामाच्या गरजा लक्षात घेऊन निवडलेले कपडे (जसे योगासनांसाठी सैलसर सुटसुटीत— जेणेकरून पंजाबी ड्रेसमध्ये सराव करणाऱ्या महिला याकडे वळतील) आणि या सगळ्याचे समाजमाध्यमांचा वापर करून केलेले चतुर ‘मार्केटिंग’, यामुळे हा व्यवसायदेखील नक्की तरून जाईल.

आजपर्यंत विविध क्षेत्रांत गुणवत्ता दाखविण्याच्या वेगवेगळ्या मोजपट्टय़ा होत्या. शैक्षणिक क्षेत्रात १००% निकाल, ‘कॉर्पोरेट’ जगात उत्पादकता, व्यापार क्षेत्रात नफा. आता क्षेत्र कुठलेही असो, या मोजपट्टीबरोबरच ‘आरोग्याची’ मोजपट्टी महत्त्वाची ठरणार आहे. विविध आस्थापनांनी त्या दृष्टीने तयारीही सुरू केली आहे. काही शाळांमध्ये ‘व्यवस्थापन-पालक-शिक्षक’ या सर्वाच्या या अनुषंगाने सभा-चर्चाही सुरू झाल्या आहेत. ‘सर सलामत तो पगडी पचास’ या अनुषंगाने खेळ, व्यायाम टिकणार आहेतच आणि त्यामुळे त्याच्याशी संबंधित असणाऱ्या सर्व व्यवस्थादेखील टिकणार आहेत हे नक्की. याच्या नवीन स्वरूपाशी/ आव्हानांशी जुळवून घेण्याची तयारी जे करतील ते नक्की यामधून ‘फिनिक्स’सारखी उभारी घेतील.  व्यायाम व क्रीडा क्षेत्रातील एक मोठा भाग आहे खेळाडूंचा व स्पर्धाचा. यामधील बदलांचा आपण वेध घेऊ या पुढच्या लेखात.